इलेक्ट्रॉनिक्स दुकाने उघडण्यास परवानगी द्या!

Dainik Gomantak
मंगळवार, 21 एप्रिल 2020

इलेक्ट्रॉनिक्स दुकाने उघडण्यास परवानगी द्या!

व्यवसायिकांची मागणी ः यूपी, केरळ राज्याप्रमाणे धोरण स्वीकारावे

पणजी

राज्यातील कोरोना संसर्ग वाढण्याची स्थिती इतर राज्यांपेक्षा फारच न्यूनतम आहे. केंद्र सरकारने जे निकष ठरवले आहेत, त्यात गोवा राज्य अत्यंत वरच्या स्तरावर असल्याचे दिसते. एकाबाजूला उत्तर प्रदेश आणि केरळसारखी राज्यं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीला परवानगी देते त्यापद्धतीने गोवा सरकारनेही द्यावी, अशी येथील इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायिकांची मागणी आहे. 
उन्हाळ्याचा हंगाम असल्याने मे महिना पकडल्यास त्यात थोडाफार व्यवसाय होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना उन्हाळ्यात मागणी असते, त्यात फ्रीज, कुलर, पंखे अशा वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. नामवंत कंपन्यांच्या मुख्य वितरकाकडे या वस्तू घेण्याचा अधिक कल असतो. या व्यवसायिकांना पावसाळ्यात चार महिने दुकान उघडून ग्राहकाची वाट पाहावी लागत आहे. टाळेबंदीच्या काळात उत्तर प्रदेश आणि केरळ राज्यांनी ज्याप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीस परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे गोवा सरकारनेही त्यांना परवानगी द्यावी. या व्यवसायात ग्राहकांची मोठी गर्दी होऊ शकत नाही, ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच लोक या वस्तू खरेदी करीत असतात. त्यामुळे सामाजिक अंतर ठेवून या वस्तू खरेदी विक्री करण्यास व्यवसायिकांना काहीच अडचणी येणार नाहीत, याचा राज्य सरकारने विचार करणे आवश्‍यक आहे, असे येथील इलेक्ट्रॉनिक्स नामवंत कंपन्यांच्या वस्तूंची विक्री करणारे आपा तळावलीकर यांनी सांगितले. 
गोव्यात कोरोनाचे संशयित म्हणून लोकांना तपासणीसाठी ताब्यात घेतले जात असले तरी त्यांच्या चाचण्या या निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसत नसल्याचे सिद्ध होत आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्य कोरोनामुक्त झाल्याचे जाहीरपणे सांगितले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विचारांती इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीला परवानगी द्यावी, अशी मागणीही तळावलीकर यांनी केली आहे. 

संबंधित बातम्या