रिलायन्स इंडस्ट्रीजकडून मिडिया, वितरण व्यवसायाचे नेटवर्क 18 मध्ये एकत्रीकरण 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

प्रसारणाचा व्यवसाय नेटवर्क १८ द्वारे चालविला जाईल, तर केबल आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (आयएसपी) व्यवसाय नेटवर्क १८ च्या मालकीच्या उपकंपन्यांद्वारे चालविला जाणार आहे, अशी माहिती नेटवर्क १८ मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्‌सने दिली आहे. या सर्व कंपन्यांच्या विलीनीकरणाची तारीख १ फेब्रुवारी असणार आहे.

 

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजने माध्यम आणि वितरण व्यवसायाचे एकाच कंपनीखाली एकत्रीकरण करण्याची घोषणा केली आहे. आता टीव्ही १८ ब्रॉडकास्ट, हॅथवे केबल अँड डेटाकॉम आणि डेन नेटवर्क्‍स यांचे नेटवर्क १८ मीडिया अँड इन्व्हेस्टमेंट्‌समध्ये विलीनीकरण केले जाणार आहे.

या सर्व कंपन्यांच्या संचालक मंडळांनी एकत्रीकरण आणि पुनर्रचनेच्या प्रस्तावाला परवानगी दिली आहे. या पुनर्रचनेमुळे कंपनीच्या विविध साखळींच्या व्यवसायात सुधारणा होणार असून, त्यांची व्याप्तीही वाढविता येणार आहे. त्याचबरोबर कंपन्यांची संख्या कमी केल्याने समूहातील कॉर्पोरेट रचनेत सुधारणा होऊन ती सोपी होणार आहे.

महसूल ८ हजार कोटींवर
नेटवर्क १८ च्या अंतर्गत या सर्व व्यवसायांचा महसूल जवळपास 8 हजार कोटी रुपये असणार आहे. या एकत्रीकरणानंतर प्रत्येक १०० समभागांसाठी, टीव्ही १८ ब्रॉडकास्टच्या समभागधारकांना नेटवर्क १८ चे ९२ समभाग, तर हॅथवे केबल अँड डेटाकॉमच्या समभागधारकांना नेटवर्क १८ चे ७८ समभाग आणि डेन नेटवर्क्‍सच्या समभागधारकांना नेटवर्क १८ चे १९१ समभाग मिळणार आहेत. सर्व कंपन्यांचे एकत्रीकरण केल्यानंतर कंपनीवर कोणतेही कर्ज असणार नाही. त्यामुळे भविष्यातील व्यवसायवृद्धीसाठी आणि शेअरधारकांना अधिक परतावा मिळण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे.

 

 

संबंधित बातम्या