सभागृहाबाहेर काढण्याची प्रथा लोकशाहीस घातक

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

 सभागृहात मागणीसाठी आंदोलन आजही सुरूच

गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना, विरोधकांचा सभापतींवर निशाणा

हा चुकीचा पायंडा सभापतींनी घातला आहे. ही वाईट प्रथा लोकशाहीस घातक आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया संयुक्त विरोधकांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या.

पणजी :  गोवा मुक्तीपासून ते आजपर्यंत गोवा विधानसभेत पहिल्यांदाच सभापतींनी विरोधकांना सभागृहाबाहेर काढण्याची तसेच त्यांच्या अनुपस्थितीत अर्थसंकल्प मांडण्याची घटना पहिल्यांदाच गोव्याच्या इतिहासात घडली आहे.

राज्याच्या विधानसभेत गेली ४९ वर्षे आमदार असलेले प्रतापसिंह राणे यांच्या ज्येष्ठतेचा विचार न करताही त्यांना सभागृहाबाहेर काढणे ही गंभीर बाब आहे. सभागृह हे लोकशाहीचे मंदिर आहे. ज्या घटना विधानसभा संकुलाच्या आवारात घडतात त्याची सभापतींनी दखल घेऊन चौकशी करायला हवी.

सभापतींकडे विरोधकांनी केलेली मागणी रास्त होती व त्यावर त्यांनी चर्चा करून त्यावर तोडगा काढायला हवा होता. माझ्या राजकारणातील कारकीर्दीत सभापतींनी माझे नाव पुकारून सभागृहाबाहेर काढले त्याचे मला दुःख झाले आहे. सभापती जी पद्धत अवलंबित आहेत ती दुःखदायक आहे. सभापतींनी पोलिसांना कायदा हातात घेण्यास परवानगी द्यायला नको होती व त्यांनी स्वतःचे अधिकार आमदारांच्या संरक्षणासाठी वापरायला हवे होते, अशी प्रतिक्रिया आमदार लुईझिन फालेरो यांनी व्यक्त केली.

घडलेला प्रसंग सभापतींनी
विचारायला हवा होता....

विरोधकांची बाजू न ऐकून घेता सभापतींनी सभागृहाबाहेर जाण्यास सांगणे हे योग्य नव्हे. माझ्या राजकीय कारकीर्दीत आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते तसेच सभापतीचे पद भूषविले आहे. मात्र, कधीही कठोर निर्णय घेतला नाही. अधिवेशन काळात कोणताही निर्णय देताना तटस्थ राहून देण्याची गरज आहे. विरोधकांचे म्हणणे मांडण्यास त्यांनी संधी दिली असती तर ही पाळी आमच्यावर आली नसती. संपूर्ण राजकीय कारकिर्दीत पहिल्यांच अर्थसंकल्पावेळी सभागृहाबाहेर जाण्याची वेळ सभापतींनी आणली हे दुर्दैव आहे, अशी खंत आमदार प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केली.
आमदार पळून जाणार नव्हते. दुसऱ्या दिवशी ते विधानसभेत येणार होते. त्यामुळे रात्रीअपरात्री अटक करण्याची गरज नव्हती. त्यांना बोलावून घडलेला प्रसंग सभापतींनी विचारण्याची गरज होती, असेही प्रतापसिंह राणे म्हणाले.

नेत्रावळी अभयारण्य क्षेत्रातील जंगली जनावरांचा उपद्रव

दुसरी बाजूही सभापतींनी
ऐकून घ्यायला हवी होती...

विरोधकांनी न्याय मागणीसाठी विधानसभा कामकाज रोखून धरल्याने त्यांना सभागृहाबाहेर काढण्याची पद्धत सभापतींनी पहिल्यांदाच अवलंबिली आहे. सभापतींनी विरोधकांच्या मागणीवर चर्चा करायला हवी व त्यातून मार्ग काढायला हवा होता. आमदाराच्या अटकेस परवानगी दिली तर दुसरी बाजूही त्यांनी ऐकून घ्यायला हवी. मात्र, तसे न करता सरळ सभागृहाबाहेर काढण्यात आल्याबद्दल आमदार रवी नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.

तक्रार व अटक ही पूर्व योजना...
अधिवेशन सुरू असताना आमदारांना अटक करण्याची परवानगी देण्याची प्रथा या सभापतींनी सुरू केली आहे. त्यामुळे यापुढे एखाद्या कोणत्याही आमदाराविरुद्ध तक्रार झाल्यास परवानगी देण्याची प्रथाच सुरू होईल. सध्या मुख्यमंत्री हे ‘टी२०-२०’ खेळत आहे. ते नेहमीच मुख्यमंत्री राहतील असे नाही. ज्या व्यक्तीने आमदार खंवटे यांच्याविरुद्ध खोटी तक्रार दिली आहे, त्याच्यावरही कारवाई व्हायला हवी. ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे हे खंवटे यांच्यासोबत होते व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. त्यामुळे तक्रार व अटक करणे ही योजना अगोदरच तयार केली होती, असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

हा लढा सुरूच राहणार....
मी मुख्यमंत्री असताना राज्यात माझ्या कार्यक्रमावेळी भाषा, प्रश्‍न तसेच प्रादेशिक आराखड्यावरून विरोधक काळे झेंडे दाखवून निदर्शने करायचे. मात्र, कधी कोणाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले नाहीत. पोलिसांनी अनेकवेळा कारवाई करण्याची परवानगी मागितली. मात्र, ते विरोधकही आमचेच आहेत असे सांगून पोलिसांना कायदा हातात घेण्यास दिला नाही. उलट निदर्शकांबरोबर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा हा विधानसभेतील लढा उद्याही सुरूच राहणार आहे, असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ठामपणे सांगितले.

गोव्यातील लोकशाही
बदनाम होईल...

गोव्याच्या इतिहासात विरोधी आमदारांना सभापतींनी सभागृहाबाहेर काढण्याची घटना घडली आहे. अर्थसंकल्प मांडताना विधानसभेत त्यांच्याकडे २९ जणांचे बहुमत आहे. मात्र त्यातील १२ जणांविरुद्ध आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी प्रलंबित आहे. सभापती राजेश पाटणेकर यांनी विरोधकांना सभागृहाबाहेर काढून वाईट प्रथा घातली आहे, हे लोकशाहीस घातक आहे. हे असेच सुरू राहिले तर गोव्यातील लोकशाही बदनाम होईल अशी तीव्र नाराजी आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केली.

 

संबंधित बातम्या