विधानसभेचे कामकाज विरोधकांनी दुसऱ्यांदा रोखल्याने पुन्हा काढले सभागृहाबाहेर

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

विरोधकांचा पुन्‍हा सभात्याग
खंवटे, सरदेसाई यांना पुन्‍हा मार्शलमार्फत काढले सभागृहाबाहेर

पणजी : माजी महसूलमंत्री व अपक्ष आमदार रोहन खंवटे यांच्या अटकेसाठी सभापतींनी परवानगी दिल्याने आज संयुक्त विरोधकांनी पुन्हा प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी न्याय देण्याची मागणी करीत कामकाज रोखले. खोटी तक्रार दिलेल्याविरुद्ध सभापतींनी तक्रार दाखल करण्याची मागणी करून त्यांनी हौदात धाव घेतल्यावर सभापतींनी तासाभरासाठी कामकाज तहकूब केले.

शून्यतासाचे कामकाज सुरू झाल्यावर पुन्हा विरोधकांनी गोंधळ निर्माण केल्याने सभापतींनी आमदार विजय सरदेसाई व आमदार रोहन खंवटे यांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढल्यावर उर्वरित विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या अनुपस्थितीत सर्व कामकाज पूर्ण करण्यात आले.
अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाचे कामकाज संयुक्त विरोधकांनी रोखून व त्यांना सभातींनी सभागृहाबाहेर काढल्यानंतर आज पाचव्या दिवशी प्रश्‍नोत्तराचा तास सुरू झाला. यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व इतर विरोधकांनी सभापतींना काल करण्यात आलेल्या मागणीवर न्याय देण्याची मागणी केली. यावेळी सभापती राजेश पाटणेकर यांनी सभागृहाचे कामकाजात अडथळे न आणण्याची विनंती केली. आमदाराला अटकेचा निर्णय पोलिस अहवालानुसार घेतल्याचे पुन्हा त्यांनी सांगितले. काल सभातींनी बैठक घेऊन विरोधकांच्या मागणीवर तोडगा काढू, असे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी स्पष्टीकरण करावे अशी मागणी कामत यांनी केली.
 

‘मार्शल’ कारवाईनंतर कामकाज सुरू
विधानसभा कामकाजावेळी विरोधकांनी सभापतींच्या निर्णयाचा निषेध म्हणून काळ्या फिती बांधल्‍या होत्‍या. सभापतींनी प्रश्‍नोत्तराचे कामकाज सुरूच ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रश्‍नोत्तरास सुरुवात करण्याचे पुकारले. त्यामुळे विरोधकांनी सभापतींसमोरील हौदात जाऊन ‘शेम शेम’ अशा घोषणा देत कामकाजात अडथळे आणले. ११.४० वाजता सभापती राजेश पाटणेकर यांनी कामकाज दुपारी १२.३० वाजेपर्यंत तहकूब केले.

शून्यतासाचे कामकाज दुपारी १२.३० वाजता सुरू झाले. विरोधी पक्षनेते यांनी सभापतींना विरोधकांचा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणी केली. सभापती इजिदोर फर्नांडिस यांनी शोक प्रस्ताव मांडून दिवंगत व्यक्तींची नावे वाचण्यास सुरवात केली. यावेळी विरोधकांनी पुन्हा सभातींसमोरील हौदात जाऊन कामकाज रोखण्याचा प्रयत्न केला, तरीही सभातींनी कामकाज सुरूच ठेवले. त्यांनी शोक प्रस्ताव मांडलेल्या दिवंगत व्यक्तींसाठी एक मिनिट श्रद्धांजलीची सूचना केली. ही श्रद्धांजली संपल्यानंतर विरोधकांनी ‘शेम शेम’ अशा घोषणा देणे सुरूच ठेवले. सभापती इजिदोर फर्नांडिस यांनी आमदार विजय सरदेसाई व त्यापाठोपाठ आमदार रोहन खंवटे यांना ताकीद दिली. तरीही गदारोळ सुरूच होता. अखेर त्‍या दोन्‍ही आमदारांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर काढले. त्यानंतर उर्वरित विरोधी आमदारांनीही सभात्याग केला.

विरोधक सभागृहाबाहेर गेल्यानंतर विधानसभेचे पटलावर असलेले कामकाज सभातींनी सुरू ठेवले. यावेळी आमदार प्रवीण झांट्ये यांचा अभिनंदनाचा ठराव, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी त्यांच्या खात्याशी संबंधित असलेले दस्तावेज विधानसभेच्या पटलावर ठेवले. आमदार प्रसाद नाईक यांच्या लक्ष्यवेधी सूचना, लेखा अनुदान विधेयक मांडून व मंजूर करण्याचे कामकाज पूर्ण करण्यात आले व सभापतींनी विधानसभा कामकाज अनिश्‍चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आली.

पोलिस कारवाई अयोग्‍य
आमदारांना अर्थसंकल्पावेळी सभागृहाबाहेर काढण्याची तसेच कोणतीही प्राथमिक चौकशी न करता पोलिसांनी केलेल्या चौकशीवर विश्‍वास ठेवून सभापतींनी अटकेची परवानगी दिली, ती कृती योग्य नव्हती, असे कामत म्हणाले.

विधानसभा संकुलात आपल्याविरुद्ध धमकी व मारहाणीचा जो आरोप करण्यात आला आहे. त्याचे सीसीटीव्ही फुटेज सभापतींनी द्यावे. अटकेसाठी दिलेल्या परवानगीसंदर्भात विरोधकांनी केलेल्या निवेदनावर त्यांनी स्पष्टीकरण द्यावे. सभापतींवर दबाव आल्याने ते त्यांच्यासमोर झुकले असावेत. जेथे खून यासारख्या गंभीर गुन्ह्यात तत्पर कारवाई व्हायला हवी, तेथे काही होत नाही मात्र, अशा क्षुल्लक खोट्या गुन्ह्यात पोलिस तत्पर कारवाई करतात, अशी टीका खंवटे यांनी केली. यापुढे जिल्हा पंचायत, पंच तसेच सर्वसामान्य लोकांवर तक्रार दाखल करून अटक करण्याचा पायंडा पडेल, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या