हरमल पंचायतीचा शहरी भागात समावेश करणारी अधिसूचना

Gram Sabha resolution against the notification of inclusion in urban areas
Gram Sabha resolution against the notification of inclusion in urban areas

हरमल : पंचायतीचा शहरी भागात समावेश करणारी अधिसूचना महसूल खात्याने जारी केली असून ही अधिसूचना हरमल गावासाठी का लागू केली तसेच त्याचे फायदे व तोटे काय, याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध होत नाही, तोपर्यंत हरमल ग्रामस्थांचा विरोध असेल असा ठराव ग्रामस्थ तथा पत्रकार चंद्रहास दाभोलकर यांनी मांडला व तो एकमताने मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याविना कार्यवाही होऊ नये, यासाठी पंचायत आग्रही असल्याचे स्पष्ट झाले.

या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच दीपिका वायगंणकर होत्या. प्रारंभी पंचायत सचिव दशरथ परब यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम केला. पर्यटन स्थळाच्या विकासासाठी किनाऱ्यावरील बजबजपुरी व परप्रांतीय लोकांची वाढती अरेरावी रोखण्यासाठी जागृत नागरिकांची समिती स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. स्थानिक विक्रेत्याच्या तक्रारी वाढल्या असल्याने ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले आहे. समितीच्या अध्यक्षपदी सरपंच दीपिका वायगंणकर तर कार्यकारी अध्यक्षपदी धानियल फर्नांडिस यांची निवड करण्यात आली.

त्यास अनुसरून पंचायत मंडळ व ग्रामस्थांनी समिती नेमून स्थानिकांचे हित व व्यवसायरक्षण करण्यासाठी, त्यांची धरपकड करण्याची मागणी एकमताने केली. पोलिस दंड देऊन सोडून देत असल्याने समितीने त्यांच्याविरोधात जबर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली.पंचायतीने किनाऱ्यावर फिरणाऱ्या विक्रेत्या लोकांना पावणी, सोपो कर लागू केला आहे. या 'सोपो वसुली' नियमात बसत आहे का, त्याची माहिती पंचायतीने देण्याची मागणी नागरिकांनी केली, मात्र पंचायतीने अनभिज्ञता दाखविली.

ग्रामसभेची नोटीस गटविकास खात्याने का काढली, पंचायत मंडळ अकार्यक्षम आहे का, अशी विचारणा पत्रकार विनोद मेथर यांनी केली व सचिवाने त्यावर फेस्त व उत्सव असल्याने ग्रामसभा होऊ शकली नाही, असे स्पष्टीकरण दिले.

बिगर रहिवाशांच्या तक्रारीचा विषय गाजला

देऊळवाडा क्षेत्रांत पंचायतीने पेंव्हर्सचे काम नाला अडवून केल्याची तक्रार काब्राल नामक इसमाने केली होती. त्यावर पंचायतीने आवश्यक ओळखपत्र न घेता,तक्रार दाखल केली व कामाची पाहणी व पंचनामा केल्याचे ग्रामस्थ विनोद मेथर यांनी सांगितले.

'मनरेगा' योजना गेली दोन वर्षे, हरमल भागांत बंदच असल्याने गट विकास खात्यांतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यास पंचायत कामास का जुंपून घेत आहात, बेकायदेशीर कामास पंच मंडळी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप विनोद मेथर यांनी केला व सदर कर्मचाऱ्यांची गटविकास खात्यात बदली करण्याची मागणी वजा ठराव मांडला व त्याची प्रत आपणास देण्याची विनंती केली.

खालचावाडा भागातील रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे गाडी नेणे बरेच कठीण बनले आहे. पाणी पुरवठा करणारा टँकर रस्त्यावरील गाड्यामुळे वासुदेव रेडकर यांच्या घरापर्यंत येत नसल्याने पंचायतीने उपाय करावा, अशी मागणी रेडकर यांनी केली. हा पार्किंगचा ठराव उपजिल्हाधिकारी कार्यालयात पाठविला जाईल, असे पंच डिसौझा यांनी सांगितले. रस्त्यानजीकच्या फुटपाथवर मांडलेली दुकाने, गॅरेज, खुर्च्या तसेच अस्ताव्यस्त पार्किंगमुळे चालणे मुस्किल झाले आहे. फुटपाथचा वापर होत नसल्याने नागरिकांनी पंचायतीस दोष दिला आहे.

नानु रिसॉर्टने रस्त्यावरील अतिक्रमण केलेले पेंव्हर्स बांधकाम आद्यपही न हटविल्याने कायदा नावाची चिजच नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला. सार्वजनिक बांधकाम खात्याला आव्हान देणारा, नानु रिसॉर्ट एकमेवाद्वितीय असल्याचा दावा केला व ग्रामसभेत वारंवार विषय उपस्थित करणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. गावांतील अवघ्याच युवकांना रोजगार दिला म्हणजे रस्त्यावरील अतिक्रमण ग्राह्य मानावे काय, असा सवाल नागरिकांनी केला.

हरमल तिठा येथील हायमास्ट पथदीप व गतिरोधक उभारण्याची मागणी नागरिक संजय नाईक यांनी केली व त्याचा पाठपुरावा पंच अनंत गडेकर यांनी करण्याचे आवाहन नाईक यांनी केले. हरमल तिठा येथील पेव्हर्सचे काम व पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याचे हॉटमिक्स केल्याने मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा जीटीडीसीचे चेअरमन दयानंद सोपटे यांचा अभिनंदन ठराव एकमताने समंत करण्यात आला. एप्रिलपासून जातिनिहायय जनगणना सुरू होणार असून, या अर्ज प्रक्रियेत जसे जनरल,एससी, एसटी कॉलम असतात, तसाच ओबीसींचा कॉलम नागरिकांसाठी असावा, अशी मागणी वजा ठराव ग्रामस्थ महेश वायगंणकर यांनी मांडला व मंजूर केला. त्यांची प्रत संबंधित खात्याकडे पाठवावी, असे त्यांनी सांगितले.

एलईडी पथदीप म्हणजे करोडो रुपयांचा घोटाळा असून त्यांची सेवा दुय्यम दर्जाची असल्याने कित्येक पथदीप गेली सहा महिने तक्रार दिल्या नंतरही पेटत नसल्याने, त्यांचे कंत्राटच रद्द करण्याचा ठराव महेश वायगंणकर यांनी मांडला.

यावेळी उपसरपंच मनीषा नाईक कोरकणकर, पंच इनासियो डिसौझा, प्रवीण वायगंणकर, बेर्नाड फर्नांडिस, अनंत गडेकर, गुणाजी ठाकूर, प्रतीक्षा नाईक व मनोहर केरकर तसेच गटविकास खात्याचे विजय तिळवे निरीक्षक म्हणून उपस्थित होते.

प्रारंभी माजी सरपंच द्वारकानाथ नाईक रामजी व माजी पंच सूर्या वस्त यांच्या निधनाबद्दल तसेच पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत संजय नाईक, रामचंद्र केरकर, धानियल फर्नांडिस, राजन वायगंणकर, कायतु फर्नांडिस, दिलीप वायगंणकर, नरेश नाईक, मारसेलिन फर्नांडिस, लक्ष्मण ओटवणेकर, संतोष कोरकणकर, चंद्रहास दाभोलकर आदींनी चर्चेत भाग घेतला.
शेवटी पंच इनासियो डिसौझा यांनी आभार मानले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com