राज्यातील उर्वरित फुटबॉल मोसम अनिश्चित

duler-stadium-mapusa-goa-stadiums
duler-stadium-mapusa-goa-stadiums

पणजी,

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे परिस्थितीचे भान राखत, कोरोना विषाणू संसर्गाचा धोका ओळखून २०१९-२० मधील देशांतर्गत फुटबॉल मोसम अकाली संपविला. हीच परिस्थिती आता गोवा फुटबॉल असोसिएशनवरही ओढवू शकते. त्यांच्या उर्वरित मोसमाबाबत अनिश्चितता आहे.

देशव्यापी लॉकडाऊनमुळे जीएफएचा राज्यस्तरीय मोसम ठप्प आहे. २० मार्चनंतर जीएफएने सारे सामने स्थगित केले आहेत. ते पुन्हा सुरू होण्याबाबत साशंकता आहे. लॉकडाऊन ३ मे रोजी संपल्यानंतर लगेच फुटबॉल सामने सुरू करण्याबाबत अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने जीएफएला अधिकृत कळविलेले नाही, तसेच राज्य प्रशासनाच्या परवानगीची आवश्यकता भासेल. ``राज्य प्रशासनाने परवानगी दिली, तर सामने पुन्हा खेळविणे शक्य होईल, पण मोसम संपविण्यासाठी बाकी असलेला कालावधी पुरेसा नाही,`` असे जीएफएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दरमोसमात जीएफएचा राज्यस्तरीय मोसम मे महिनाअखेरीस संपतो. मात्र सध्या एकही स्पर्धा पूर्ण झालेली नाही. प्रतिष्ठेची प्रो-लीग स्पर्धा अर्धवट आहे. विजेता अजून निश्चित नाही. दोन सामने बाकी असलेल्या स्पोर्टिंग क्लब द गोवाचे सध्या सर्वाधिक ४४ गुण आहेत. एक सामना बाकी असलेल्या धेंपो स्पोर्टस क्लबच्या खाती ४१ गुण असून पाच सामने बाकी असलेल्या चर्चिल ब्रदर्स संघाचे ३७ गुण आहेत. याशिवाय पदावनतीचा प्रश्नही जीएफएसमोर आहे. वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लब १५ गुणांसह तळाच्या बाराव्या क्रमांकावर आहे. त्यांचे अजून दोन सामने बाकी आहेत.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने मोहन बागानला आय-लीग विजेते घोषित केले आहे, कारण कोलकात्याच्या संघाने चार फेऱ्या राखून विजेतेपद निश्चित केले होते. मात्र यंदाच्या मोसमात त्यांनी आय-लीगमधील पदावनती रद्द केली आहे, त्यामुळे जीएफए प्रो-लीगबाबत कोणता निर्णय घेते याकडे संघांचे लक्ष आहे. पदावनतीबाबतचा अंतिम निर्णय जीएफएची व्यवस्थापकीय समिती घेणार आहे. प्रो-लीगमध्ये नव्या संघाला संधी देणारी प्रथम विभागीय स्पर्धा सुरूही झालेली नाही. प्रो-लीग, प्रथम विभागीय, तसेच अन्य स्पर्धा वेळेत संपविणे जीएफएला शक्य होण्याबाबत संघटनेचे अधिकारीच साशंक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com