गोव्यात सातच्या आत घरात

Dainik Gomantak
रविवार, 3 मे 2020

गोमंतकीयांना राज्यात प्रवेश सकाळी ८, दुपारी १२ व रात्री ८ अशा तीन वेळाच दिला जातो. त्याना सरळ संस्थांतर्गत अलगीकरण कक्षात नेले जाते. तेथे त्यांची चाचणी केली जाते. ती नकारात्मक आली तर घरी १४ दिवस अलगीकरणात राहण्यासाठी हातावर शिक्का मारून घरी पाठवले जाते.

पणजी

कोविड १९ टाळेबंदीच्या तिसऱ्या टप्प्यात उद्यापासून (ता.४) सकाळी सात ते सायंकाळी सात घराबाहेर पडण्यास मुभा असली तरी घराबाहेर सायंकाळी सातनंतर राहता येणार नाही. औषधालये सोडून सर्व दुकाने सायंकाळी सात वाजताच बंद केली जातील. बस, रिक्षा, टॅक्सी वाहतूक सुरु होईल मात्र आसन क्षमतेच्या पन्नास टक्केच प्रवाशांनाच एकावेळी प्रवास करता येणार आहे. या साऱ्यांचे टाळेबंदी टप्पा तीनमध्ये १७ मे पर्यंत सक्तीने पालन करावे लागले. अन्यथा सरकार कारवाई करेल असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, गोवा हरीत विभागात असल्याने येथे दुसरे घर असलेल्या अनेकांना गोव्यात यायचे आहे. अशा तिनेक हजार जणांनी जिल्हाधिकारी कार्यालय पातळीवर संपर्कही साधला आहे. मात्र गोमंतकीय सोडून अन्य कोणालाही १७ मे पर्यंत प्रवेश दिला जाणार नाही. एखाद्या उद्योगाला कुशल कामगाराची गरज असेल तर त्या कामगाराला राज्यात एकट्याने येण्यास परवानगी दिली जाईल, त्याला शुल्क भरून दोन दिवस अलगीकरण कक्षात ठेऊन चाचणी करूनच कामावर जाण्यास परवानगी दिली जाईल. कामावर त्याला अलगीकरण करून राहण्याची सोय त्या कंपनीच्या, उद्योगाच्या व्यवस्थापनाने करावी लागणार आहे. दुचाकीवर दोन व्यक्तींना तर चारचाकी गाडीत चार व्यक्तींना आता प्रवास करता येणार आहे. दोन जहाज कंपन्या सरकारच्या संपर्कात असून त्यावर ८०० गोमंतकीय खलाशी आहेत. त्यांना परत आणले जाणार आहे. त्याविषयी बोलणी सध्या सुरु आहेत.
राज्यभरात सायंकाळी सात ते सकाळी सात यावेळेत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असतील. सकाळी सात वाजण्यापूर्वी केवळ दूध विक्रीची दुकाने, स्टॉल्स उघडता येतील. टाळेबंदीच्या पहिल्या दोन टप्प्यांत गोमंतकीय जनतेने मोठे सहकार्य सरकारला केले. त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो. राज्यात ३ एप्रिलनंतर कोविड १९ विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. शेवटचा रूग्ण १७ एप्रिलला बरा झाला. त्यानंतर कोणालाही लागण झालेली नाही. हीच स्थिती याही पुढे कायम राहण्यासाठी गोव्याबाहेरून येऊन हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेली कोणी व्यक्ती फिरताना आढळली तर त्याची खबर सरकारी यंत्रणेला तत्काळ देणे आवश्यक आहे. गोमंतकीयांना राज्यात प्रवेश सकाळी ८, दुपारी १२ व रात्री ८ अशा तीन वेळाच दिला जातो. त्याना सरळ संस्थांतर्गत अलगीकरण कक्षात नेले जाते. तेथे त्यांची चाचणी केली जाते. ती नकारात्मक आली तर घरी १४ दिवस अलगीकरणात राहण्यासाठी हातावर शिक्का मारून घरी पाठवले जाते.
त्यांनी सांगितले, की राज्यात १७ मे पर्यंत १४४ कलम लागू असेल. जिल्हाधिकारी पातळीवर तसे आदेश जारी केले आहेत. यामुळे जमावबंदी आहे. या काळात धार्मिक स्थळे, मंदिरे, चर्च, मशिदी बंद राहतील. ती उघडता येणार नाहीत. सायंकाळी सात नंतर अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही वाहन आढळल्यास पोलिस कारवाई करतील. कामावरून निघताना म्हणूनच प्रत्येकाने सायंकाळी सात वाजेपूर्वी घरी पोचणार असे नियोजन करूनच निघावे. सर्व उपहारगृहे, शिजवलेले खाद्यपदार्थ तेथे बसून खाण्यासाठी पुरवणारी ठिकाणे, चहाचे गाडे, धाबे, स्टॉल्स, शॉपिंग मॉल किनाऱ्यांवरील शॅक बंद राहतील.  व्यायामशाळा, तरणतलाव, थिएटर्स, कसिनो, सभागृहे, बैठकीची ठिकाणे, स्पा, समाज पार्लर, नाईट क्लब आणि बार बंद राहतील. किरकोळ व घाऊक मद्यविक्रीची दुकाने दिवसभर उघडी राहतील. त्यांनी सात वाजता दुकान बंद करण्यासाठी मद्यविक्री सायंकाळी साडेसहा वाजताच बंद करणे आवश्यक आहे. केस कापण्याचे सलून दिवसभर सुरु राहून ते सायंकाळी सात वाजता बंद करावे लागणार आहे.
सरकारच्या आदेशानुसार ६५ वर्षावरील आणि १० वर्षाखालील व्यक्तींनी घराबाहेर पडू नये. पान, तंबाखू विकणारी दुकाने बंद राहतील. आतिथ्य उद्योग म्हणजे हॉटेल्सही बंद राहतील. घराबाहेर पडताना सर्वांनी मुखावरण म्‍हणजेच मास्क वापरणे आवश्यक आहे. योग्य अंतर राखूनच सर्व व्यवहार केले पाहिजेत.

नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिल्लीला जाण्यासाठी सरकार परवानगी देणार आहे. त्यांनी सलग तीन दिवस प्रवास करू नये यासाठी दीड दिवसाच्या प्रवासानंतर एके ठिकाणी दिवसभर विश्रांती घ्यावी याचे नियोजन करण्यात येत आहे. हे विश्रांतीचे ठिकाण रेड झोनमध्ये नाही याचीही खातरजमा करावी लागत आहे. कदाचित उद्या हे सगळे विद्यार्थी आपल्या गावी जाण्यास निघतील. गोमंतकीय विद्यार्थ्यांचीही अशीच व्यवस्था केली जाणार आहे.

दहावी व बारावी परीक्षेबाबत सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. उद्या सोमवारी याबाबत एक वरिष्ठ पातळीवर बैठक होणार आहे. केंद्र सरकारच्या मर्गदर्शक सुचनेनुसार या परीक्षा कशा घेतील की नाही यावर त्यात चर्चा होणार आहे. यामुळे उदया याबाबत निर्णय होऊ शकतो.

संबंधित बातम्या