नदी परिवहन खात्यावर महालेखापाल चे ताशेरे

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

दोषींवर कारवाई होणार..!

नदी परिवहन खात्याच्या सचिवांचे सूतोवाच

नदी परिवहन खात्याच्या आर्थिक गफलतींवर नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या तपासणीत स्वतः महालेखापालांनी ताशेरे ओढले आहेत. त्याशिवाय अनेक ठिकाणी या खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या बंदर कप्तान आणि अकाऊंट विभागाने त्या-त्यावेळी दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट अहवालातून दाखवून दिले आहे.

पणजी : नदी परिवहन खात्यातील आर्थिक घोटाळ्यांवर दै. ‘गोमन्तक’ने प्रकाश टाकल्यानंतर त्या वृत्तांची दखल या खात्याच्या सचिवांनी घेतली आहे. खात्यांतर्गत या प्रकरणाचा तपास सुरू असून, काही दिवसांत दोषींवर कारवाई करण्याचे संकेत सचिव पी. एस. रेड्डी यांनी ‘गोमन्तक'शी बोलताना दिले आहेत.

व्यवसायिकांचे, काही सरकारी जावई बनलेल्या कामगारांचे हित जोपासण्याचे काम या खात्यात अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्याबाबत दै. ‘गोमन्तक’ने दि. २४ जानेवारीपासून या खात्यातील गैरकारभार उजेडात आणला आहे. विशेष बाब म्हणजे राज्यभरात या खात्यातील गैरकारभाराची चर्चाही सुरू आहे. अनेक वाचकांनी दैनिक गोमन्तकचे याबाबत कौतुक केले आहे.

‘गोमन्तक’च्या वृत्ताची दखल
‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तांची दखल नदी परिवहन खात्याचे सचिव पी. एस. रेड्डी यांनी घेतली असून, त्याची त्यांनी चौकशी सुरू केली आहे. काही दिवसांत या प्रकरणातील दोषींवर कारवाई होईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी ‘गोमन्तक'शी बोलताना दिले आहेत. त्यामुळे खात्यातील दोषींना कारवाई होईल, अशी आशा वाटू लागली आहे. लाखो रुपयांच्या घोटाळ्यात अनेकांनी आपले खिसे भरून घेतले असणार हे निश्‍चित आहे. काही अधिकारी निवृत्तही झाले आहेत, परंतु जे पदावर आहेत त्यांनी या घोटाळ्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले काय, असा संशय निर्माण होत आहे.

मंत्र्यांच्या खासगी सचिवाची लुडबूड..!
नदी परिवहन खात्यातील घोटाळ्यांनी काही अधिकारी, कर्मचारी जबाबदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घोटाळ्यात अडकलेल्या अनेक महाविभुतींनी खात्यात कार्यरत असल्याने कारवाईचा फास आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे नदी परिवहन खात्याच्या मंत्र्याचे खासगी सचिव म्हणून काम पाहणाऱ्या ‘सावंत' नामक व्यक्तीने काही अधिकाऱ्यांना सोडविण्यासाठी लुडबूड सुरू केली आहे. विशेष म्हणजे या खासगी सचिवाने सरकारी नोकरीत असताना काय ‘प्रकाश' पाडलाय, हे सर्वज्ञात आहेत. त्यामुळे या खात्याचे सचिव किती धिराने हे प्रकरण हाताळतात हे लवकरच कळेल.

 

संबंधित बातम्या