अजब कारभाराची अनुभूती; सत्‍य उघड होण्‍याबाबत संशय

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

 नदी परिवहन

ज्‍या खात्‍याचा घोटाळा, ‘त्‍या’
खात्‍याचा प्रमुख करणार चौकशी?

नदी परिवहन खात्यातील बंदर कप्तान विभागाच्या अधिपत्याखाली अकाऊंट विभाग येतो, त्या अकाऊंट विभागात झालेल्या घोटाळ्यांविषयी ‘दैनिक गोमन्तक’ने मागील जानेवारी महिन्यांपासून ‘नदी परिवहनचा पाय खोलात' अशी वृत्तमालिका प्रसिद्ध केली.

पणजी : नदी परिवहन खात्यातील अकाऊंट विभागात झालेल्या घोटाळ्यांचा तपास करण्यासाठी चौकशी अधिकारी म्हणून बंदर कप्तान विभागाचे कॅप्टन जेम्स ब्रागांझा यांची नियुक्ती केली असल्याची माहिती या खात्याचे सचिव पी. एस. रेड्डी यांनी ‘गोमन्तक'ला दिली.

नदी परिवहन खात्यात झालेल्या घोटाळ्यांवर महालेखापालांनी ताशेरे ओढले आहेत. शिवाय या घोटाळ्यांविषयी बंदर कप्तान विभागाच्या कॅप्टननी अद्याप त्यावर कोणतीही पावले उचलली नसल्याचे महालेखापालांनी आपल्या अहवालात दाखवून देऊनही त्याच घोटाळ्यांचा तपास अधिकारी म्हणून कॅप्टनची नियुक्ती केली गेली आहे.

अकाऊंट विभागातील घोटाळ्यासह नदी परिवहन खात्यातील अनागोंदी लोकांसमोर आणली. त्याविषयी या खात्याचे सचिव पी. एस. रेड्डी यांनी मागील आठवड्यापूर्वी या घोटाळ्यांविषयी तपास सुरू असल्याचे ‘गोमन्तक'ला सांगितले होते. तत्पूर्वी नदी परिवहन खात्याच्या अकाऊंट विभागातर्फे फेरीबोटीवरील तिकिटांना व्हाईटनर लावून जुना क्रमांक घालवून पैसे घेतल्याचा प्रकार ‘गोमन्तक'ने उघड केला.

 हेही वाचा : म्हादई साठी परवानगी घेऊनच काम करावे.

नदी परिवहन खात्यातील अनागोंदीविषयी ‘गोमन्तक'ने अनेक प्रकार उघडकीस आणल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री कडक भूमिका घेतील, अशी अपेक्षा होती. ज्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा होती, त्यांचीच भूमिका संशयास्पद वाटू लागली आहे. त्यामुळे मराठीत ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ या म्हणीचा प्रत्यय यातून येऊ लागला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळे होऊनही मुख्यमंत्र्यांनी खरे तर हे प्रकरण दक्षता आयोगाकडे देणे आवश्‍यक होते, पण तसेही झालेले नाही. ज्यांच्या अधिकाराखाली येणाऱ्या खात्यातील घोटाळ्यांचा तपास त्याच अधिकाऱ्याकडे दिला असल्याने खरोखरच ‘सत्य' उघड होईल का, असा सवाल आता लोकांकडून उपस्थित केला जात आहे.
 

संबंधित बातम्या