अनमोल जीवनासाठी वाहतुकीचे नियम पाळा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

 रस्ता सुरक्षा सप्ताह: निष्काळजीपणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले.

पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर : वास्कोत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह

मुरगाव पत्रकार लेखक संघ आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमात वाहतूक नियमासंबंधी माहिती देताना वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर. बाजूस क्‍लाफासिओ डायस, संतोष खोजूर्वेकर, ॲड. दिलेश्‍वर नाईक, मिलिंद काकोडकर.

दाबोळी : मानवी जीवन हे अनमोल आहे. मात्र बेशिस्त आणि निष्काळजीपणे वाहने चालविण्याच्या प्रकारामुळे दिवसेंदिवस रस्ता अपघाताचे प्रमाण वाढत असून, नाहक बळी जात आहेत, अशी खंत वास्को वाहतूक पोलिस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून मुरगाव पत्रकार लेखक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंचावर मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष व कुंकळ्ळीचे आमदार क्‍लाफासिओ डायस, नागोवाचे उपसरपंच ॲड. दिलेश्‍वर नाईक, संघाचे अध्यक्ष संतोष खोर्जुवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

नार्वेकर पुढे म्हणाले की, वाहनचालकांमध्ये शिस्त असल्यास व वाहतूक नियमांचे पालन केल्या अपघातात घट होणार यात तिळमात्र शंका नाही. एक काळ असा होता की, सायकल घ्यावी म्हटली की पालकांना हजारदा विचार करावे लागत होता. महिन्याच्या खर्चाचे नियोजन करून उरलेल्या पैशांची बचत करून सायकल घ्यावी लागत असे. तसेच आपल्या मुलांच्या हातात सायकल दिली की त्याला दहावेळा तरी सायकल हळू चालव, जोरात चालवू नको, असा सल्ला द्यायचे. पण जसा काळ बदलत गेला, तशी परिस्थिती पालटली.

तरुण रस्त्यांवर शर्यत करताना दिसतात. आज मुलांना पालक चार हजार रुपयांपासून अत्यंत महागड्या किमतीची सायकल घेऊन देतात. दारात दोन दोन दुचाक्‍या, कारगाड्या अशी परिस्थिती आहे. मुलांवर पास होण्याच्या अगोदरच बक्षिसांची खैरात केली जाते. आठवी पास हो, तुला दुचाकी लागू , दहावी पास झाला की चार चाकी गाडी घेऊन देतो. अशी आश्‍वासने आज पालकच मुलांना देत असतात. आईवडील कामावर असल्याने दिवसभर मुले, कॉलेजबाहेर असतात. शाळेच्या नावाखाली स्कूटर, मोटरसायकल चालवण्याचे प्रशिक्षण आपल्या मित्रांकडूनच घेतात. मग धूम स्टाईलने ते वाहने हाकताना दिसतात. पालकांना वाटत असते आपला मुलगा शाळेत, कॉलेजात जातो. पण पालकांना याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वेळ नसतो. कारण पालक पैशाच्या मागे लागलेले असतात.
वाहतूक नियम म्हणा किंवा इतर अनेक विषयात मुले अपरिपक्व असतात. त्यामुळे पालकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करावयाचे असते. तरच अपघातांना आळा बसणार आहे.

जनतेने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करून अपघातावर आळा घालण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन नार्वेकर यांनी केले. त्यासाठी स्थानिक नागरिकांचे सहकार्य आवश्‍यक असून तसे प्रयत्न होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची आवश्‍यकता असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. कडक कायदे करूनही वाहतूक नियमांचे सर्रासपणे वाहन चालक उल्लंघन करताना दिसतात. त्यामुळेच रस्ता अपघातांना निमंत्रण ठरत असते. पादचाऱ्यांना ठोकरण्याचे प्रमाणात वाढ होत आहे. प्रत्येक वाहनचालकाने शिस्तीसहित मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकाचे त्यांनी निरसन केले. यावेळी मोटरसायकल पायलट मोठ्या संस्थेने उपस्थित होते. तसेच माजी नगराध्यक्ष फियोला रेगो, मनोज वळवईकर, अनंत नाईक, बाबूश बांदोडकर यांनीही आपली उपस्थिती दर्शवून वाहतुकीसंबंधी श्री. नार्वेकर यांना प्रश्‍न विचारले व शंकांचे निरसन करून घेतले. सूत्रसंचालन मिलिंद काकोडकर यांनी केले. सुभाष राव यांनी आभार मानले.

 

 

केरी-दोनमाड येथे शिवजयंतीदिनी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

संबंधित बातम्या