मुरगाव बंदरात विदेशी पर्यटकांची लूट

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

चोरांकडून पर्यटकांचे स्वागत- लुटीचा प्रकार थांबवावा

सागरमाला योजनेअंतर्गत मुरगाव बंदरात सागरी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यासाठी खास पर्यटक जहाजांसाठी केंद्र सरकारच्या पर्यटन खात्याच्या आर्थिक सहाय्याने क्रूझ टर्मिनल उभारले आहे.

 

मुरगाव : सागरी पर्यटनाचा डिंगोरा पिटविणाऱ्या गोव्यात मुरगाव बंदरात येणाऱ्या पर्यटक जहाजावरील पर्यटकांचे पेट्रोल आणि मंदिरातील फंडपेटी चोरणाऱ्यांकडून स्वागत केले जात आहे. हेच काय भारत सरकारचे ‘अतिथी देवो भव’, असा खोचक सवाल मुरगाव युनायटेडचे नेते बालन चोडणकर यांनी विचारला आहे.

वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विशांत नाईक, सर्वेश होबळे, महादेव कवळेकर व सचिन होन्नावरकर उपस्थित होते. याचा लाभ पर्यटकांना होण्याऐवजी त्यांना लूटमारीचा सामना करावा लागत आहे. मुरगाव बंदरात एमपीटी टॅक्सी संघटनेने बेकायदेशीर काऊंटर सुरू करून देश विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू केली आहे. या प्रवाश्यांच्या स्वागतासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये इंधन चोरी प्रकरणात पकडलेले संजय कानोजी(सडा) आणि वास्को येथील श्री साईबाबा मंदिराची फंडपेटी फोडणारे भूसो नावेलकर(बोगदा) हे लूटारू तैनात असतात. अशा प्रकारच्या लूटारुंकडून ‘अतिथी देव भवो’ची संकल्पना साकार होईल का असा सवाल श्री.चोडणकर यांनी उपस्थित केला. तसेच या लूटारूंना आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक पाठीशी घालत आहेत असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, सडा टुरीस्ट टॅक्सी युनियनचे अध्यक्ष विशांत नाईक यांनी सांगितले की, मुरगाव बंदरात पर्यटकांना प्रचंड प्रमाणात लुटले जाते. बंदरातून जुने गोवा येथे जाण्यासाठी चार हजार रूपये आकारले जात आहे. तसेच पाळोले (काणकोण) येथे जाण्यासाठी २५ हजार रूपये घेतले जातात, असा आरोप त्यांनी केला. करत आपल्या युनियनला कायदेशीररीत्या एमपीटी, पर्यटन महामंडळ, वाहतूक खाते यांनी काऊंटर सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार सर्व काही सुरळीत चाललेले असताना राजकीय हस्तक्षेपामुळे बंदरात टॅक्सीचालकांत वाद निर्माण झाल्याचे पत्रकारांना सांगितले.

चालक सर्वेश भोसले यांनी, मुरगाव बंदरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची लूट आणि वाहन चालकांकडून संजय कान्होजी आणि भूसो नावेलकर खंडणी उकळीत असल्याचा आरोप केला. टॅक्सी चालकांकडून प्रती भाडे २०० रूपये आकारले जात आहे, त्यासंदर्भात हिशोब सादर करा अशी आपण मागणी केली म्हणून आपल्याला मुरगाव बंदरातील क्रूझ टर्मिनल येथून भाडे मारण्यास मज्जाव केल्याचे श्री.होबळे यांनी सांगितले.

मुरगाव बंदरात टुरीस्ट टॅक्सी चालक प्रामाणिकपणे पर्यटकांना सेवा देत नाहीत. मोठ्या प्रमाणात पर्यटकांना लुटले जात आहे अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. त्यामुळे गोव्याची बदनामी झाली असून याला सर्वस्वी मुरगाव बंदरात टॅक्सी व्यवसाय करणारे जबाबदार आहेत, असे मत दाबोळी विमानतळावरील टॅक्सी चालक महादेव कवळेकर यांनी व्यक्त केले. लुटीचा प्रकार सरकारने थांबवावा अन्यथा गोवेकरांचा एकमेव शिल्लक असलेला पर्यटन व्यवसायही धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

विधानसभेचे कामकाज विरोधकांनी दुसऱ्यांदा रोखल्याने पुन्हा काढले सभागृहाबाहेर

संबंधित बातम्या