रशियन पर्यटकांना गोव्‍याचा आधार

Dainik Gomantak
सोमवार, 27 एप्रिल 2020

आठवड्यातून चार विमाने दाबोळी विमानतळाहून रशियातील विविध शहरांत जात आहेत.

पणजी

‘कोविड-१९’ टाळेबंदीमुळे केरळमध्ये अडकलेल्या रशियन नागरिकांना रशिया सरकारने दाबोळी विमानतळावरून विशेष सेवा सुरू केली आहे. दाबोळी येथून मॉस्कोसह पाच ठिकाणी सुरू केलेल्या विमानसेवेचा लाभ रशियन पर्यटकांना मिळाला आहे. आठवड्यातून चार विमाने दाबोळी विमानतळाहून रशियातील विविध शहरांत जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आजवर सातशेहून जास्त रशियन नागरीक दाबोळी विमानतळावरून खास विमानांनी मायदेशी रवाना झाले आहेत. आणखी तीनशे ते साडेतीनशे नागरीक मायदेशी जाणार आहेत. शनिवारी ९ रशियन नागरीक विशेष विमानाने मायदेशी गेले, तर १२ जण केरळ येथून दाबोळीत दाखल झाले असून ते लवकरच जाणार आहेत. टप्‍प्‍याटप्‍प्‍याने सुरक्षित अंतर राखत पर्यटक मायदेशी रवाना होत आहेत.
रशियात जाण्यासाठी केरळहून रस्ता मार्गे गोव्यात आलेल्या २२० रशियन नागरिकांना समावेश आहे. दिल्लीतील रशियन दुतावासाने मुंबई, गोवा, बंगळूर, दिल्ली आदी ठिकाणांहून रशियाला जाण्यासाठी खास विमाने सोडण्यास सुरवात केल्यास १० दिवस झाल्यानंतर आता रशियनांची राज्यातील संख्या घटू लागली आहे. हरमल, केरी, मांद्रे, मोरजी, पाळोळे, कोलवा, बाणावली परिसरात काही रशियन नागरीक अद्याप असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात युक्रेनच्या नागरिकांचाही समावेश आहे. रशियाने आपल्या देशात आंतरराष्ट्रीय विमाने येण्यास बंदी घातली आहे. केवळ रशियन सरकारने या रशियन नागरिकांना नेण्यासाठी पाठवलेलेच विमान परत जाऊ शकते. विमानातही समाज अंतर पाळून प्रवाशांना बसवले जाते. त्यामुळे एका विमानातून ७० ते ११० प्रवासी एकावेळी जाऊ शकत आहेत.
 

संबंधित बातम्या