भाजप प्रदेशाध्‍यक्षपदी सदानंद शेट तानावडे निश्‍चित

Dainik Gomantak
शनिवार, 11 जानेवारी 2020

भाजपच्या राज्यातील मतदान केंद्र, मंडळ, जिल्हा समित्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने प्रदेशाध्यपदाची निवडणूकही बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

अवित बगळे
पणजी

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सदानंद शेट तानावडे यांची निवड होण्याची शक्यता आहे. या पदासाठी उद्या निवडणूक होणार असून या पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास मतदान होऊन त्याचा निकाल रविवारी कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केला जाणार आहे. भाजपच्या राज्यातील मतदान केंद्र, मंडळ, जिल्हा समित्यांच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने प्रदेशाध्यपदाची निवडणूकही बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड करावी याचा कल जाणून घेण्यासाठी दिल्लीतून निरीक्षकांना गोव्यात पाठवले होते. त्यांनी गाभा समितीचे सदस्य, पक्षाचे पदाधिकारी, आमदार, मंत्री व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मत जाणून घेतले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांचेही म्हणणे त्यांनी जाणून घेतले होते. त्यात मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याला त्यांनी अधिक महत्त्‍व दिले होते. कारण, दोन वर्षांनी राज्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने मुख्यमंत्री ज्यांच्यासोबत अधिक समन्वयाने काम करू शकतील, अशा नेत्याचीच निवड करावी असे ठरवण्यात आले होते. त्याशिवाय पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही आपल्या दौऱ्यात मते आजमावली होती.
तानावडे हे सध्या प्रदेश सरचिटणीसपदी व गोवा आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. मतदान केंद्र, मंडळ समिती, जिल्हा समित्यांच्या निवडींत ते सक्रिय होते. राज्यभरातील मंडळ समितींच्या निवडीवेळी ते उपस्थित होते. त्याचवेळी तानावडे यांच्या नावावर प्रदेशाध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब होईल हे ठरून गेलेले होते. त्यातही मुख्यमंत्र्यांचेही म्हणणे महत्त्‍वाचे ठरल्याने तानावडे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. तानावडे हे थिवी मतदाससंघातून भाजपच्या उमेदवारीवर विधानसभेवर निवडून आले होते.

दहा आमदार, दोन खासदारांसह
५२ जण करणार मतदान

भाजपच्या संघटनात्मक निवडणूक समितीचे प्रमुख गोविंद पर्वतकर यांनी आज पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ते म्हणाले, उद्या दुपारी ते ४ यावेळेत या पदासाठी उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. या पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आले तर त्यासाठी मतदान घेतले जाणार आहे. ४० मंडळ समिती अध्यक्ष, १० आमदार आणि दोन खासदार असे ५२ जण यासाठी मतदान करू शकतात. या मतदानाचा निकाल रविवारी (ता. १२) सकाळी १० वाजता गोमंतक मराठा समाज सभागृहात होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीसाठी पक्षाचे राज्य प्रभारी अविनाश राय खन्ना हे उपस्थित राहणार आहेत.
पर्वतकर म्हणाले, राज्यभरातील १ हजार ६५२ मतदान केंद्रांवर प्रत्येकी ११ जणांची समिती नेमली आहे. थिवी व काणकोण वगळता इतर मतदारसंघात मंडळ समित्या स्थापन केल्या आहेत. सदस्य मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असून आजवर तीन लाख ७५ हजार जणांनी सदस्यत्व घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. अजूनही सदस्यत्व पावती पुस्तके कार्यालयात जमा करण्यात येत असल्याने त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
यावेळी त्यांच्यासोबत माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष सुखाजी नाईक, दक्षिण गोवा जिल्हाध्यक्ष सर्वानंद भगत हे उपस्थित होते.

संबंधित बातम्या