पणजीतही तयार व्हायचे कधी काळी मीठ

dainik gomantak
सोमवार, 30 डिसेंबर 2019

अवित बगळे
पणजी

अवित बगळे
पणजी

गोव्याची राजधानी असलेल्या पणजी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या सांतिनेज खाडीतील प्रदूषण दूर करण्यासाठी राज्य सरकार व पणजी महापालिका नव्याने प्रयत्न करणार आहे. आता या खाडीचे रुपांतर नाल्यात झाले असले तरी एकेकाळी या खाडीच्या पाण्यावर मिठही तयार केले जायचे. पणजीत मिठागरे होती हे कोणाला सांगूनही आज खरे वाटणार नाही.
सांतिनेज खाडीचे पाणी एकेकाळी एवढे खारट होते, की त्या पाण्यावर मीठही तयार केले जायचे. पोर्तुगीजकालीन जुन्या कागदपत्रांत शहरात मिठागरे होती याचा उल्लेख सापडतो. याविषयी चौकशी केली असता आताच्या ला कांपाला कॉलनीच्या मागे एक तळे होते, त्या तळ्याच्या ठिकाणीच ही मिठागरे होती, अशी माहिती मिळाली.
सांतिनेज खाडीत भरतीचे पाणी येत होते. ते शहरात किती खोलवर जात होते याच्या नोंदी तपासताना ही रंजक माहिती हाती आली. या मिठागरांबाबत तपशिलाने माहिती मिळणे कठीण होत असले तरी पणजीतील मीठ विदेशातही पाठविण्यात येत होते, अशी माहिती मिळाली आहे. सांतिनेज खाडीत भरतीचे पाणी पार करंझाळेपर्यंत जात होते अशी माहिती मिळाल्याने त्याच्या नोंदी तपासल्या असता ला कांपाला परिसरात मासेमारी चालायची, असा उल्लेख सापडला. त्या तळ्याच्या जागी पूर्वी मिठागरे होती असेही आढळून आले.
हा मीठ व्यवसाय फार पूर्वीपासून चालत होता. १८७६ मध्ये तिसवाडी तालुक्‍यात १०४ मिठागरे होती, तर २६० हेक्‍टर जमीन मिठागरांखाली होती, त्यातून वार्षिक १८ हजार टन मिठाचे उत्पन्न घेण्यात येत असे. पणजीत नेमकी किती मिठागरे होती याची माहिती मिळत नसली तरी एकंदर तालुक्‍यात विचार करता त्यापैकी ५० टक्के मिठागरे पणजीत होती असे मानले तरी या व्यवसायाचा तेव्हाचा आवाका लक्षात येतो. नंतर या व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे आकडेवारीवरून दिसते. १८८१ मध्ये ८३ मिठागरे, २३० हेक्‍टर जमिनीत होती आणि मीठ १६ हजार ८०० टन, १८९१ मध्ये ८० मिठागरे २२४ हेक्‍टर जमीन आणि १६ हजार ५०० टन मीठ, तर गोवा मुक्तीच्या वर्षी ७० मिठागरे १९७ हेक्‍टर जमिनीवर होती आणि त्यातून १५ हजार टन मीठ उत्पादन व्हायचे, अशी माहिती मिळाली. त्यामुळे मिठागरांची रोडावलेली संख्या ही पणजीतील मिठागरे बंद पडल्यानेच झाल्याचे अनुमान काढता येते. अलीकडे १९९१ मध्ये तिसवाडीत फक्त ४५ मिठागरे शिल्लक होती.

 

संबंधित बातम्या