चाहुल कधीच लागली होती.

dainik gomantak
मंगळवार, 16 जून 2020
कोविडचे एक दोन रुग्ण सातत्याने आढळता कामा नयेत, एका दोघांमुळे संपूर्ण मार्केटवर टाळेबंदीची पाळी येऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी नियोजनाला महत्त्व आहे. किमान महिनाभरासाठी हा प्रयोग महापौरांनी करावा, अंमलबजावणीआधी व्यापारी, विक्रेत्यांची बैठक घ्यावी, पणजीच्या लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांनाही विश्वासात घ्यावे.

प्रासंगिक

सुहासिनी प्रभुगावकर

टाळेबंदी घोषीत केल्यानंतर घराबाहेर अत्यावश्यक कामकाजाशिवाय जाणे बंद झाले आहे. गोव्यात ‘ग्रीन झोन’ झाल्यानंतर मोकळेपणा थोडा लवकर आल्यानंतर हळुहळू बाजारातील व्यवहार सुरू झाले. पणजीत विस्तृत मार्केट संकुल असताना आधी नियोजन नसल्यामुळे भाजी, फळ विक्रेत्यांना आयनॉक्स प्रकल्पातील मागील बाजूच्या रस्त्यावर मालाची विक्री करण्यास परवानगी मिळाली. सकाळी आठ वाजल्यापासून विक्रीला मान्यता होती. परंतु बाजाराचा बाडबिस्तारा सकाळी सहा वाजताच सुटलेला असायचा, आजही सुटतो. कारण तो सुटताना स्वस्तात भाजी विक्री होते, ग्राहकही असते. या बाडबिस्ताऱ्याभोवती होणाऱ्या गर्दीचे दर्शन मला सुमारे वीस दिवसांआधी म्हणजे मे महिन्याअखेरीस घडले. त्याच दिवशी मला मार्केटमधील विक्रेत्यांत कोरोना शिरकाव करणार याची चाहुल लागली होती. असे काय वातावरण होते, असते मार्केटमध्ये जे कोरोनाच्या शिरकावासाठी पूरक आहे?
गोव्याबाहेरील राज्यातून येणाऱ्या भाजीचा पसारा सकाळच्या प्रहरी सोडताना विक्रेते एकत्र जमतात. त्यावेळी अर्ध्या विक्रेत्यांच्या तोंडावर मास्कही नसतात. विक्रेत्यांत सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही. तेथेच कोरोनाच्या शिरकावाला वाव मिळतो. मार्केटमधील भाजी विक्री सुरू झाल्यानंतर बऱ्याच महिला मास्क घालत असल्याचे आढळून आले आहे. महिलांच्या तुलनेत पुरुष बेफिकीर, त्यांच्या गळ्यात मास्क लोंबकळतो. परंतु नाका, तोंडाला लागत नाही. तोंडाला लागल्यास नाकापर्यंत जात नाही अशा स्थितीत कोविड सूचक न सापडल्यास नवल. माझ्या ओळखीच्या काही विक्रेत्यांना, महिलांना आवर्जुन मास्क का घालावा, कसा वापरावा याची माहिती महिनाभरापूर्वी बाजारात पोचले त्याचवेळी दिली होती. दुसऱ्या वेळी गेल्यास ये रे माझ्या मागल्या. मग मी त्यांना स्पष्टच सांगितले तुम्ही योग्यरित्या सतत मास्क वापरणार नसाल, तर मला नाईलाजाने दुसऱ्याकडे खरेदीसाठी वळावे लागेल.
वीस दिवसांपूर्वी ज्यावेळी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मी मार्केटला पोचले. त्यादिवशी काही विक्रेत्यांना सर्दीची लक्षणे असल्याचे मी पाहिले आणि त्याक्षणी निर्णय घेतला मार्केटमध्ये जायचे नाही. आणखी एक गोष्ट माझ्या नजरेत गेली ती म्हणजे स्थानिक विक्रेत्या महिलांच्या हाती गुटखा, तंबाखूची चिमूट ठेवून पैसे गोळा करणारी व्यक्ती. मागावर राहील्यास मार्केटचे निरीक्षक त्या व्यक्तीला सहज पकडू शकतात फक्त गरज आहे सुधारण्याची. मार्केटमध्ये पोलिसांचा फौजफाटा तसा जेमतेमच तैनात असायचा. तोही वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी, नियमभंग करणाऱ्यांना दंड कोणी ठोठावायचा? त्यानंतर कांही दिवसात भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर मार्केटच्या पूर्वीच्या जागेत झाले.
रस्त्यावरील बाहेरचा भाग मोकळा होता. परंतु मार्केटचा आतील परिसर गजबजल्यास कोंदट होतो याची जाणीव मार्केटची ए बी सी डी जाणणाऱ्या पणजीच्या महापौरांना असायला हवी होती. त्या जाणीवेतून व्यवस्थित नियोजन केले असते, तर चिंबलचे रहिवासी असलेल्या पणजी मार्केटातील विक्रेत्यांना कदाचित कोरोनापासून दूर ठेवता आले असते. अर्थात चिंबलमधून पणजीत येणाऱ्या विक्रेत्यांचा एखाद्या कोविड रुग्णाशी संपर्क आला असेल तर संसर्गातून कोरोना शिरला असेल.
पणजी मार्केटचा महत्त्वाचा, उलाढालीचा भाग आहे तो तळमजल्यावरच. मुख्य मार्केट संकुलाबाहेरील जुन्या मार्केटच्या कट्ट्यावर दुकाने थाटलेले काही व्यापारी चांगले बस्तान बसवून आहेत. परंतु त्याच कट्ट्यावरील एका कोपऱ्यात अन्य कोणते व्यवसाय जोरात असतात त्याची महापौरांना पूर्ण कल्पना आहे. आव्हान स्वीकारून त्या व्यवहाराचा बिमोड केल्यास विद्यमान महापौरांचे नाव पणजीवासीयांच्या कायम स्मृतीत राहील.
पणजी मार्केटमधील तळमजला, पहिला मजला, जुन्या मार्केटातील विक्रेत्यांना, व्यापाऱ्यांना चोवीस तास ग्राहक असतात का? महापालिकेच्या मार्केट समितीने अभ्यास केल्यास या प्रश्नाचे उत्तर नाही असे मिळेल. मार्केटमध्ये तळ ठोकणाऱ्या बिगर गोमंतकीय बेकायदेशीर किरकोळ, घुसखोर विक्रेत्यांची संख्या काही वेळा ग्राहकांपेक्षा अधिक असते. या निष्कर्षाप्रत समिती येईल याची खात्री आहे. या घुसखोरांना हाकलून लावण्याचे दुसरे आव्हान महापौरांसमोर आहे.
मार्केटमधील दुकानदार, व्यापाऱ्यांचा एक गट, भाजी फळ, नारळ विक्रेत्यांचा दुसरा गट, फुले, विड्याची पाने सुपारी तसेच अन्य साहित्य विकणाऱ्यांचा तिसरा गट असे ढोबळपणे तळमजल्यावरचे चित्र आहे. कदाचित आणखी एक दोन गटही होतील. या गटांची वेगवेगळी वर्गवारी करून संख्येनुसार प्रत्येक गटाला वेळेचे बंधन घालून मार्केट सकाळी सहा ते रात्री सात, आठ वाजेपर्यंत खुले ठेवण्यास हरकत नसावी. प्रत्येक गटातील पाच सहा व्यापाऱ्यांना, विक्रेत्यांना एका वेळी विक्रीची संधी मिळेल. प्रत्येकाला पाच तास देता येतील असे नियोजन होऊ शकते का याचा अभ्यासही होण्याची गरज आहे. कोविडचे एक दोन रुग्ण सातत्याने आढळता कामा नयेत, एका दोघांमुळे संपूर्ण मार्केटवर टाळेबंदीची पाळी येऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी नियोजनाला महत्त्व आहे. किमान महिनाभरासाठी हा प्रयोग महापौरांनी करावा, अंमलबजावणीआधी व्यापारी, विक्रेत्यांची बैठक घ्यावी, पणजीच्या लोकप्रतिनिधींना, नगरसेवकांनाही विश्वासात घ्यावे.
इतर मजल्यांवर काही ठरावीक दुकाने वगळता सहा ते आठ तासांचे बंधन दुकानदारांना घालण्यास हरकत नसावी. मार्केटसाठी आणखी निरीक्षकांची नियुक्ती व्हायला हवी. पणजी मार्केटचा आदर्श असा नमुना काही वर्षांपूर्वी देशभरात गाजला होता. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी मार्केटला शिस्त आणण्याच्या हेतूने पणजीवासीयांना नीटनेटके मार्केट मिळावे या विचारातून मार्केट संकुल अल्पावधीत उभारले होते. भविष्यात महामारीवेळी कडक शिस्तीचा बडगा दाखवावा लागेल हे त्यांच्या दूरदृष्टीने हेरले असावे का? घोटाळ्यांच्या भोवऱ्यात अडकलेल्या या मार्केटमध्ये हजारो गुपितेही आहेत. त्या गुपितांतून मार्केटचा दुसरा टप्पा रेंगाळला, करारांचा गोंधळ अजूनही घातला जात आहे आणि या सगळ्याला साक्षीदार आहेत मार्केटशी दीर्घकाळ जवळून संबंध असलेले पणजीचे महापौर उदय मडकईकर. त्या संबंधातून मार्केटचे भले करायचे असेल, मार्केट पणजीवासीयांना सुरक्षीत वाटावे अशी त्यांची अपेक्षा असेल तर नियोजन हाच पर्याय आहे. नियोजनाविना मार्केटमधील तावेर्नमध्ये जे घडले त्याची पुनरावृत्ती होऊ शकते. पणजी बंदिस्त होऊ शकते अशी भीती वाटते. कोणी म्हणेल चाहुल लागली त्यावेळी का तक्रार केली नाही? तक्रारी केल्यास अंमलबजावणी करणारी, चौकशी तडीस नेणारी यंत्रणा अस्तित्वात यायची आहे, त्यावर उपाय एकच शिस्त, नियोजन.

संबंधित बातम्या