विखार विलसिते

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

विधानसभा निवडणुकीच्या काळातील विविध घडामोडींमुळे निर्माण झालेली कोंडी भेदण्याचा प्रयत्न अखेर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात अल्पसंख्याकांना साद घालून केला! मात्र, त्यामुळेच ज्या भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाने त्यांना ही निवडणूक लढवणे भाग पडले, त्याच पक्षाबरोबरचे त्यांचे मतभेदही उघड झालेत!

विधानसभा निवडणुकीच्या काळातील विविध घडामोडींमुळे निर्माण झालेली कोंडी भेदण्याचा प्रयत्न अखेर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात अल्पसंख्याकांना साद घालून केला! मात्र, त्यामुळेच ज्या भारतीय जनता पक्षाच्या आश्रयाने त्यांना ही निवडणूक लढवणे भाग पडले, त्याच पक्षाबरोबरचे त्यांचे मतभेदही उघड झालेत! हा ‘काव्यगत न्याय’च म्हणावा लागेल. बिहारमधील शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवारी होत आहे. महिनाभराच्या प्रचाराच्या रणधुमाळीवर पडदा पडलाय. मात्र, त्याचा शेवटचा अंक रंगला तो प्रचारात हिरिरीने उतरलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नितीश यांच्यातील खणाखणीनेच. अर्थात, निवडणुकीच्या या शेवटच्या प्रहरात नितीशकुमार कसे आणि किती हतबल झाले आहेत, ते त्यांच्या देहबोली आणि भाषेवरून दिसत होते! त्यामुळे सलग चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत उतरलेल्या नितीशकुमार यांनी मतदारांना भावनिक आवाहन करणे अपेक्षित होते. ‘ही माझी शेवटची निवडणूक!’ असे सांगत एका अर्थाने ते मतदारांची आळवणी करत असल्याचेच चित्र उभे राहिले. अर्थात, नितीशकुमारांनी आपली ही अवस्था स्वत:हूनच करून घेतली आहे. अवघ्या पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत त्यांचा चेहरा केवळ ‘सेक्‍युलर’ म्हणूनच नव्हे तर विकासपुरुष म्हणूनही गाजत होता. पाच वर्षांपूर्वी कट्टर विरोधक लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला सोबत घेऊन त्यांनी बाजी मारली; तेव्हा तर मोदी यांच्या विरोधात हाच मुख्य चेहरा २०१९ मध्ये असणार, असे वातावरण निर्माण झाले होते.मात्र, त्यांनी अचानक ‘राजद’ची साथ सोडून भाजपसमवेत २४ तासांत सरकार उभे केले. त्यामुळे सगळेच राजकारण बदलले. त्याच मुद्याच्या आधारे तेजस्वी यादव त्यांच्यावर टीकेची झोेड उठवत आहेत. हे घुमजाव हीच त्यांच्या राजकारणातील सर्वांत मोठी चूक ठरणार की काय, असे चित्र प्रचारात लालूप्रसादांचे पुत्र आणि ‘महागठबंधना’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यांनी उभे केले आहे; तेदेखील बिहारी तरुणांना आकर्षित करू पाहणाऱ्या रोजगाराच्या प्रश्‍नावरून. बिहारचे राजकारण तीन दशकांनंतर का होईना बदलतेय, याचीच साक्ष निकाल काहीही लागला, तरी ही निवडणूक देत आहे.

नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांच्या हातात भाजपची सूत्रे आल्यापासून गेल्या पाच-सात वर्षांत त्यांच्या प्रचाराची दिशा ठरून गेली आहे. पाकिस्तानचा बागुलबुवा उभा करायचा, रामनामाचा गजर करायचा आणि विरोधकांना देशद्रोही ठरवायचे, अशी ती ‘संहिता’ आहे. मात्र, तेजस्वी यांनी यापैकी कोणत्याच मुद्द्याला प्रचाराच्या रिंगणात ठाण मांडू न देता रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर आणला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जारी कराव्या लागलेल्या ठाणबंदीनंतर पोटाची खळगी भरण्यासाठी बिहारमधून काढता पाय घेत अन्यत्र स्थलांतर करणे भाग पडलेल्या बिहारी कामगारांची दुर्दशा चव्हाट्यावर आली होती. या स्थलांतरितांच्या ‘घरवापसी’साठी मुख्यमंत्री या नात्याने नितीशकुमार यांनी काहीच केले नाही, हे दाखवून देतानाच तेजस्वी यांनी मुळात गेल्या १५ वर्षांत बिहारमध्ये रोजगारनिर्मितीच कशी झाली नाही, हा मुद्दा ऐरणीवर आणला. त्यामुळे त्यांच्या सभांना चांगली गर्दी व्हायची. तेजस्वी यांच्या मुद्द्याला ना नितीश यांनी कधी उत्तर दिले, ना भाजपच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतलेल्या मोदींनी. मोदी यांनी आपली सर्व भाषणे ही लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांच्या १५ वर्षांच्या राजवटीची संभावना ‘जंगलराज’ म्हणून करण्यात आणि तेजस्वी, तसेच राहुल गांधी यांची ‘डबल युवराज’ म्हणून खिल्ली उडवण्यात खर्ची घातली. शिवाय, ‘ये लोग राम नाम नहीं लेते और भारतमाता की जय भी नहीं कहते...’ एवढेच ते सांगत राहिले. मात्र, नितीशकुमार यांची खरी पंचाईत योगी आदित्यनाथ यांनी केली! लालूप्रसादांच्या ‘राजद’बरोबर जाणारी मुस्लिम मते आपल्याकडे वळवण्याचा ते कसोशीने प्रयत्नात असतानाच, योगींनी ‘लव्ह जिहाद’ आणि सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) वगैरे बाबी प्रचारात आणल्या. अखेर देशातील घुसखोरांना देशाबाहेर फेकून देण्याची भाषा योगींनी करताच नितीशकुमार यांचा संयमच सुटला; त्यांनी ‘ये तो फालतू बातें है!’ अशा शब्दांत योगींना सुनावले. मोदी असोत की योगी; मतांचे ध्रुवीकरण हाच त्यांचा एकमेव अजेंडा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. भाजप आणि नितीशकुमार यांच्यातील तीव्र मतभेदच त्यामुळे अधोरेखित झाले. शिवाय, लोक जनशक्‍ती पार्टीचे चिराग पासवान यांचीही ‘डबल ढोलकी’ वाजवत मोदींना पाठिंबा आणि नितीशकुमार यांच्या विरोधाची प्रचार मोहीम, ही भाजपचीच रणनीती असल्याचे लपून राहिलेले नाही. अर्थात, मोदी यांना मानणारा मोठा वर्ग अजूनही देशात आहे. त्यामुळे लगेच नितीश-भाजप यांना पराभव स्वीकारावा लागेल, असे भाकीत करणे कठीण आहे. तरीही, या निवडणुकीने देशात नवा अजेंडा उभा केला आणि त्यामुळे नितीशकुमार यांना ‘बॅकफूट’वर जावे लागले, हे निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले. बिहारी जनता आता कुणाला कौल देते, ते लवकरच 
कळेल.

संबंधित बातम्या