पडघम बिहार निवडणुकीचे

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. भाजपप्रणीत जनता दलाकडून नीतीश कुमार यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. भाजपप्रणीत जनता दलाकडून नीतीश कुमार यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे. निवडणुकीनिमित्त सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आगपाखड करत आहेत. समर्थकांनीसुद्धा आता यात आपला सक्रिय सहभाग नोंदवून समाजमाध्यमांवर आरोप-प्रत्यारोप करणे सुरू केले आहे. त्यातूनच ट्‌विटरवर दोन्ही पक्षांकडून त्यांचा हॅश टॅग ट्रेंड केला जात आहे. #JDUForDevelopment #BiharRejectsNitish ट्रेंड केले जात आहे. याशिवाय याच बिहार निवडणुकीच्या तोंडावर सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा तापवत ठेवला जात आहे. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीला अनेक कंगोरे लाभले असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होती.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, बेरोजगारीने गाठलेला उच्चांक, ढासळलेली अर्थव्यवस्था याशिवाय देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्‍नांकडे भाजपप्रणीत केंद्र सरकारचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. या पार्श्‍वभूमीवर स्वतःला प्रमुख विरोधी पक्ष म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसकडूनसुद्धा ठोस पर्यायी मुद्दे मांडले जात नाहीत. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक आक्रमक आणि मुद्देसूद मांडणी करण्यासाठी विरोधी पक्ष हवा असतो; पण काँग्रेस यात मागे पडताना दिसत आहे. त्याला पक्षातील अंतर्गत धुसफुस कारणीभूत ठरत असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे देशासमोर प्रभावी राजकीय पर्याय म्हणून डावे पक्षच काम करू शकतात, असा मतप्रवाह उमटू लागला आहे. त्यामुळे डाव्या पक्षांच्या समर्थकांनी #LeftIsTheAlternative हा हॅश टॅग चर्चेत आणला आहे. अभिनेता ईशान खट्टर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘खालीपिली’ या चित्रपटाबद्दल सिनेरसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटातील कुठलीही नवी माहिती आल्यास त्याचा ट्रेण्ड झाल्याचे पाहायला मिळते. आज ‘बियोंसे शर्मा जाएगी’ हे गाणे प्रदर्शित झाले आणि संगीतकार विशाल आणि शेखर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला नेटकऱ्याची चांगलीच पसंती मिळाली. त्यानिमित्त #Beyonce हा हॅश टॅग ट्रेंड होत आहे.

संबंधित बातम्या