माजी सनदी अधिकारी दौलत हवालदार ‘गोमन्तक’मध्ये आले होते. ‘गोमन्तक सृजन’च्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी डिजीटल युगात माणूस माणसापासून कसा दूर जात आहे. माणूस हा प्रतिक्रियात्मक कसा झाला आहे. आणि शांत राहणे याचीही कशी गरज आहे या ढोबळ आकृतीबंधात आपले विचार व्यक्त केले.
विचार करायला लावणारे, विचार प्रवृत्त करणारे किंवा अस्वस्थ करणारे असे त्यांचे विचार होते. अत्याधुनिक सोयी-सुविधांमुळे माणूस जवळ आला असे जग मानत चालले असताना माणसाच्या एकाकीपणावर त्यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. त्याचमुळे त्यांनी आपल्या म्हणण्याला विराम दिला तेथून पुढे कोणते विचार मनात आले यावर हा लेख बेतलेला आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आजच्या या प्रगत युगात आपले हित साधावयाचे असेल तर इतरांचेही हित साधणे अत्यावश्यक आहे. तरच परस्परांचे हितसंबध जोडता येतील व परस्पर मैत्रीचे संबंध वृद्धिगंत होतील. हाच या युगातील प्रगतीचा महामंत्र आहे. सात-आठशे वर्षांपूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटात ज्ञानेश्वर आणि चोखामेळा हे संत उत्कट प्रेमाने परस्परांना उरी भेटत असत आणि जातिभेदाला निरंतर तडा देत असत. या संतमंडळींनी मांडलेल्या समतेच्या, ममतेच्या व आपुलकीच्या भावनेची आज खरी गरज आहे. आजच्या समाजातली विवेकदृष्टी नष्ट होत चालली आहे. इतरांच्या सुखासाठी झटणे म्हणजेच पर्यायाने आपल्याच सुखाचा मार्ग सुकर करणे होय आणि हेच खऱ्या विवेकशक्तीचे लक्षण होय. त्यातूनच परस्परांचे मैत्रीचे हितसंबध जुळू शकतात. त्यासाठी उचित, विहित, विधिवत व चांगले कार्य केले पाहिजे. आपला उद्धार व प्रगती करावयाची असेल तर सत्कर्माचा, सत्विचारांचा अंगीकार करणे अत्यावश्यक आहे.
हे सारे आठवताना संत ज्ञानेश्वर यांचे पसायदान आठवणे साहजिक आहे. सुमारे सात-आठ शतकांपूर्वी वारकरी संप्रदायाचे संस्थापक व पंढरीच्या विठूरायाचे नि:सीम भक्त संतश्रेष्ठ श्रीगुरू ज्ञानेश्वर माउलींनी "भावार्थदीपिका'' अर्थात श्री ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या १८ व्या अध्यायानंतर विश्वात्मक सद्गुरूला "पसायदान'' म्हणजे मागितले आहे, त्यात ते म्हणतात-
जे खळांची व्यंकटी सांडो।
तया सत्कर्मी रती वाढो।
भूता परस्परे जडो
मैत्र जीवांचे।।
दुष्टांचा दुष्टपणा जावो आणि त्यांच्या ठिकाणी धर्म म्हणजेच कर्म भावनेचा व भगवद्भक्तीचा उदय होवो. सत्कर्माविषयी श्रद्धायुक्त प्रेम वाढो व सर्व भूतमात्रांत ऐक्य भावनेचे, मित्रत्वाचे संबंध निर्माण होऊन सकळांचे हित व कल्याण होवो. डिजीटल युगात एकाकीपण अनुभवणाऱ्यांसाठी हा मार्ग का नसावा. एकाकीपणाला अलीकडची विभक्त कुटुंब पद्धती जबाबदार आहे का याचीही चिकीत्सा झाली पाहिजे.
लहान मूल असो, प्रौढ असो वा वृद्ध, स्त्री असो वा पुरुष; समाजाबरोबर-गटाबरोबर राहताना आपण सर्वांना हवे आहोत, ही भावना माणसाला "आनंदाने'' जगण्यासाठी उपयुक्त ठरत असते. पूर्वी संयुक्त कुटुंबात माणसे भरपूर असत. कमावता पुरुषवर्ग घराबाहेर असला, तरी घरातील स्त्रिया, नातवंडे, नोकर माणसे वृद्धांकडे लक्ष देत असत. हल्ली विभक्त कुटुंबामुळे घरात माणसांची संख्या मोजकीच आणि बाहेरचे ताण वाढलेले. अशा परिस्थितीत नोकरीवरून दमून आल्यावर त्याच त्याच गोष्टी ऐकत बसण्याएवढा संयम मुलगा-सुनेकडे नसतो. सून नोकरी करत नसली; तरी इतर कामे पार पाडताना तिचाही जीव मेटाकुटीला येतो. लहान मुलेही क्लास, शाळा, खेळाचा क्लास, गृहपाठ अशा सज्जड वेळापत्रकात अडकलेली असतात.
थोडक्यात, वृद्धांना देण्याइतकी मोकळीक घरात नसते. त्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिकांची कोंडी होते. आपण थकलो, आपली कोणत्याच कामात विशेष मदत होत नाही, हा वयाबरोबर येणारा स्वाभाविक भाव कदाचित या वातावरणामुळे सल बनतो. ही सल नंतर वेगळे स्वरूप धारण करते. आपला उपयोग नाही म्हणून आपल्याकडे कोणी लक्ष पुरवत नाही, अशी विचित्र संगती लावली जाते. त्यामुळे कुटुंबातील ताण वाढत जातात. एक वेळ अशी येते, की वृद्धांना किंवा तरुणांना स्वतंत्र राहण्याचा निर्णय घ्यावा लागतो. तटस्थपणे पाहिले तर प्रत्यक्षात कोणाचीच चूक नसते. वाढते ताणतणाव, जागेची-माणसांची कमतरता यामुळेच हे घडते.
या संदर्भात फार काही करता आले नाही, तरी नात्याच्या किंवा ओळखीच्या तीन-चार कुटुंबांनी शेजारी घरे घेऊन राहणे, हा उत्तम पर्याय होऊ शकतो. हा झाला दुसरा मार्ग.
एकाकीपण झुगारण्यासाठी इतरही मार्ग आहेत. पण एकूणच समाजात देशात एकप्रकारची घुसळण सुरू आहे. राग, द्वेष, हिंसक वृत्ती, स्वार्थ, कुरघोडी, संघर्ष या वृत्ती वाढीला लागल्या आहेत. आजचं युग संगणकाचं, स्मार्ट फोनचं आहे. या नवगॅझेट साक्षरतेमुळे जग जवळ आलंय आणि माणसं दूर गेली आहेत. परस्परांतील नातेसंबंध दुरावलेत. माणसांच्या गर्दीत असूनही आपण एकटे एकाकी निराधार असतो. प्रचंड वेग आणि महत्त्वाकांक्षा असणाऱ्या आजच्या २१ व्या शतकात नैराश्य, तणाव, औदासीन्य वाढले आहे. आजचे युग भले तंत्रज्ञानाच्या महत्त्वाचे असेल, पण ते न संपणाऱ्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे, निसर्गापासून दूर जाण्याचे डायबेटीस, कॅन्सर, आत्झायमरच्या रोगांचेही आहे. इकडे लक्ष द्यावे. कारण समाज धारणेसाठी राष्ट्रनिर्मितीसाठी भारतीयांच्या प्रगती उत्कर्षासाठी चांगल्या आचार-विचारांचीही गरज आहे, हे ध्यानात असू दे.
साने गुरुजींनी खरा तो एक ची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असा संदेश सर्वांना दिला. रवींद्रनाथ टागोरांनी विश्वभारतीचे स्वप्न मांडले. बाबा आमटेंनी भारत-जोडोची हाक दिली. संत ज्ञानेश्वर "भूता परस्पर जडो, मैत्र जीवाचे'' म्हणतात. माणूस घर बांधून राहायला लागल्यानंतर त्याच्या जीवनाला स्थैर्य आले. त्याच्या विकासाबरोबर संस्कृती निर्माण झाली. समाज स्थिर झाला आणि सामाजिक संस्था निर्माण झाल्या. व्यक्ती जीवनात कुटुंब या संस्थेला खूप मोठे स्थान आहे. यातूनच पुढे मानवाचा आजपर्यंतचा विकास झाला. भाषा, वंश, धर्म इ. बरोबर राष्ट्रांची निर्मिती झाली. विश्वाचा पसारा वाढला.
अलीकडच्या शे-दोनशे वर्षांत मानवी जीवनावर अनेक आघात होऊ लागले. परस्परातील संघर्ष, लढाया, अवर्षण, अतिवृष्टी, भूकंप, ज्वालामुखी, महापूर, अपघात, हिंसक कारवाया इत्यादीमुळे मानवी जीवन घुसळून निघाले. परस्परांतील सामंजस्य, प्रेमभाव कमी झाला. अहंकार, महत्त्वाकांक्षा, स्वार्थ, आत्मकेंद्रीपणा यामुळे मानवी समूहावर हल्ले होऊ लागले. मानवी जीवन उद्ध्वस्त होऊ लागले. निरागस, निरपराध लोकांचा बळी जाऊ लागला. प्रेम, अगत्य कमी होऊन माणुसकीला काळिमा फासणारी कृत्ये घडू लागली. सीरियातील आयसिस ही जिहादी संघटना अत्यंत क्रूरपणे लहान मुले-स्त्रियांना मारू लागली. लोक भीतीपोटी घर-दार, जमीन-जुमला सोडून शेजारच्या राष्ट्रांकडे स्थलांतरित होऊ लागले. आपला देश, मायभूमी, घरदार सोडताना त्यांना किती यातना झाल्या असतील! बरं. ज्या देशाच्या आश्रयाला जायचे ते देश तरी सहजासहजी कुठे सामावून घेत होते. स्थलांतरित, निर्वासितांचे स्वागत कोणताच देश राजीखुशीने करत नाही. जीवावर उदार होऊन सीरियन नागरिक हवाईमार्गे रेल्वेने आणि समुद्रमार्गे देश सोडून जात होते. प्रवास धोक्याचा, जीवावर उदार होऊन केलेला, संकटांनी भरलेला. प्रवासात सुविधा, सुरक्षितता कोणतीच नाही. असाच एक बालजीव आयलान कुर्दिश नावाचा दोन वर्षाचा बालक आपले आई-वडील, छोट्या भावाबरोबर छोट्या होडीतून प्रवास करत असताना होडी उलटून सर्व प्रवासी बुडाले. काही वाचले. छोटा आयलान तुर्कस्तानच्या समुद्रकिनाऱ्यावर मृतावस्थेत सापडला. सारं जग या घटनेने हादरलं. माणुसकी जागी झाली.
जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी आपल्या देशाच्या सीमा सीरियन नागरिकांसाठी खुल्या केल्या. त्यांचे कर्तृत्व, मनाचा मोठेपणा निश्चितच कौतुकास्पद. आपण म्हणतो, "हे विश्वची माझे घर, भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे'' खरे ना! मग त्याचे आचरण आपण कधी करणार?
(लेखक हे दै. ‘गोमन्तक’चे मुख्य प्रतिनिधी आहेत.)
Edited By - Prashant Patil