परिस्थितीची जाणीव हवी

dainik gomantak
बुधवार, 8 जुलै 2020

कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. पण हे जोखड आता अनेकांसाठी त्रासदायक ठरू लागले आहे. सरकारला सर्वांचे रक्षण करायचे आहे.

किशोर शां. शेट मांद्रेकर

कोरोनाने अनेकांना उघड्यावर आणले आहे. अनेकांचे काम गेले आहे. कोरोनाचा पसार जेवढा अधिक होणार तेवढे लोक आणखी संकटात सापडणार. जीवन जगण्यासाठीही संघर्ष करावा लागणार आहे. यापुढे आम्हाला कोरोनाला सोबत घेऊनच वाटचाल करावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या भवितव्याकडे पाहताना समोर उद्‍भवणाऱ्या परिस्थितीची कल्पना करायला हवी. अनेक बंधने आपल्यावर येणार आहेत. कितीही इच्छा असली तरी आपण बिनधास्तपणे जीवन जगण्याला पुढील काही काळ मर्यादा येणार आहे. सध्या राज्यात काही भागात कोरोनाने कहर माजवल्याने तेथील हालचालींवर निर्बंध आले आहेत. कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. पण हे जोखड आता अनेकांसाठी त्रासदायक ठरू लागले आहे. सरकारला सर्वांचे रक्षण करायचे आहे. त्यामुळे जिथे रुग्ण वाढतात तिथे कन्टेन्मेंट झोन जाहीर केले जातात. या विभागात लोकांनी घरातच थांबणे आवश्‍यक असते. अन्यथा कोरोनाचा प्रसार झपाट्याने होण्याचा धोका असतो. असे असूनही काही भागात लोक कंटाळले आहेत. आपल्याला पुरेसा धान्यसाठा मिळत नाही. मिळाला तर तो निकृष्ट असतो. पैशांची चणचण भासते, औषधे मिळत नाहीत, अशा अनेक तक्रारी येऊ लागल्या आहेत. राज्यात कोरोनाचा प्रसार गतीने होण्यास जे मांगोरहिल कारणीभूत होते तेथील लोकही संतप्त बनले आहेत. सरकार आपल्यासाठी काहीच करीत नाही, अशी त्यांची भावना बनली आहे. घरात बसून चरितार्थ कसा चालेल? असा प्रश्‍न लोक करू लागले आहेत. दोन वेळा त्यांनी आक्रमकपणा धारण केला. रस्त्यावर आले. कोरोनाचा धोका असतानाही हे लोक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात हे भयानक आहे. यातून ते आणखी अडचणीत येतील आणि इतरांनाही अडचणीत आणतील. त्यांचे हाल होतात, त्यांना अनेक समस्या आहेत हे समजण्यासारखे आहे. त्यासाठी ते सरकारला दोष देत आहेत. सरकारी यंत्रणा काहीच करत नाही, असा त्यांचा आरोप आहे. यात काही बाबतीत तथ्य असेलही पण सरकार तरी कसे आणि कुठे कुठे लक्ष देणार, धावपळ करणार. कोरोनाचा राक्षस वाढतच आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारला धडपड करावी लागत आहे. सरकारने काही कोरोनाचे विषाणू आणून सोडलेले नाहीत. त्यामुळे केवळ सरकारलाच दोष देऊन चालणार नाही. सरकारने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी लॉकडाउन केले तेव्हाही लोक वैतागले होते. नंतर अनलॉक केले तर कोरोना सुसाट सुटला आहे. अनेक गावांमध्ये रुग्ण सापडताहेत. सरकारने नियंत्रणासाठी पावले उचलली तरी ती तोकडी पडत आहेत. लोकांनी स्वत:ची काळजी स्वत: घ्यायला हवी. कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून दक्षता घेतली असती तर कोविड रुग्ण मोठ्या संख्येने सापडले नसते. लोक धोका माहीत असूनही स्वैरपणे फिरत आहेत. कोरोनाची बाधा झाली की सरकारला दोष देत फिरायचे आणि आपल्यासाठी सरकार काहीच करीत नाही, असा कंठशोष करायचा, ही काहीजणांना सवयच झाली आहे. सध्याची स्थिती पाहता कोणत्याही पक्षाचे सरकार असते तरीही या परिस्थितीवर मात लागलीच करता येणे शक्य नाही. समोर येणाऱ्या संकटाचा सामना निर्भिडपणे करणे आणि शक्य तेवढी काळजी घेणे, यातूनच आपण सावरू शकतो. लोकांना कोरोना कोठूनही आपल्यापर्यंत येऊ शकतो हे माहीत असूनही बिनधास्तपणे फिरण्याचे काही कोणी सोडत नाही. आवश्‍यकता असेल तरच बाहेर पडायचे. परंतु नाहक बाहेर फिरणारेही बरेच आहेत. कोणी पार्ट्या करतोय, तर कोणी बर्थडे धूमधडाक्यात साजरे करीत आहेत. कोणालाही संयम राखायचा नाही. यातून आपण काय करतो? स्वत:बरोबर इतरांचाही जीव धोक्यात घालतो. आतापर्यंत राज्यात कोविडमुळे आठ जणांचे बळी गेले आहेत. तरीही लोकांमध्ये भीतीचा लवलेशही दिसत नाही. जे लोक घरात थांबले आहेत, सुरक्षिततेचे उपाय योजत आहेत, त्यांनाही आपण त्रासात घालत आहोत याचा विचार हे लोक का करीत नाहीत? ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ होण्याचे नाव काही ते घेत नाहीत. हे असेच सुरू राहिले तर प्रत्येक घरात कोरोनाचा रुग्ण असण्याची भीती आहे. हे कोठेतरी थांबले पाहिजे. मांगोरहिलमधील लोकांची समस्या सरकारला माहीत आहे. मुबलक धान्यसाठा, औषधे उपलब्ध करण्यासाठी सरकारनेही प्रयत्न चालवले आहेत. पण या भागात जोपर्यंत कोरोनाचा प्रसार थांबत नाही तोपर्यंत कन्टेंन्मेंट झोन काही बदलता येत नाही. २८ दिवस पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही तरच असा भाग बदलता येतो. तेथील बंधने शिथिल करता येतात. अन्यथा काहीच करता येणार नाही. आपण राहत असलेल्या भागात काय धोका आहे याची जाणीव असूनही लोक आंदोलन करतात. रस्त्यावर येतात. यातून अजून धोका वाढत आहे. ज्या तऱ्हेने हे लोक एकत्र आले होते तिथे सोशल डिस्टन्सिंगवगैरे धाब्यावर बसवले गेले. सुरक्षिततेचे नियम कोणी पाळले नाही. त्यांना काम हवे आहे. चरितार्थ चालवायचा आहे. याची सरकालाही कल्पना आहे. म्हणून जीव धोक्यात घालायचा का? जीव असला तर सर्व काही करता येते हे त्यांना माहीत नाही असे नाही. पण रोजीरोटीसाठी बाहेर मोलमजुरी करणारे हे लोक पैसे नसल्याने, मिळकत बंद झाल्याने अस्वस्थ आहेत. हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांना उद्याच्या दिवसाची नव्हे तर आजच्या दिवसाची चिंता असते. अठरा विश्‍व दारिद्य्र असल्याने मिळेल ते काम करणारे आणि जे काही पदरात पडेल ते घेणारे हे लोक म्हणूनच संतप्त बनले आहेत. सरकारने त्यांना मदत करायला हवी. पण सुरवातीला काही जणांनी सरकारने पुरवलेले धान्यही रस्त्यावर फेकून दिले होते. मग त्यांच्याबाबत सहानुभूती कशी निर्माण होणार? कोरोनामुळे प्रत्येकावर कमीअधिक प्रमाणात संकट आलेले आहे. त्यातू्न सावरण्याची धडपड सुरू असताना आपल्या घरापर्यंत कोरोना पोचतो तेव्हा तर डोळ्यासमोर अंधारच दिसतो. तसेच या लोकांचे झाले आहे. या लोकांची अगतिकता आणि अस्वस्थता पाहून सरकारही पर्याय शोधत असले तरी धोका असताना सरकारही कोणाला मोकळे सोडू शकत नाही. ज्यांना मांगोरहिलच्या जोखडातून बाहेर पडायचे आहे, कामाला जायचे आहे त्यांना मोकळीक सरकार देणार आहे. पण त्यांनी एकदा बाहेर पडले की पुन्हा लवकर तिथे येता येणार नाही. जिथे जाणार तिथेच त्यांनी आपली राहायची व्यवस्था करायची आहे. सरकार आणखी धोका पत्करू शकत नाही. या अटीसुध्दा काहीजणांना जाचक वाटतात. पण काही जणांसाठी बहुसंख्य लोकांचे जीव कोणतेही सरकार धोक्यात आणू शकत नाही. ही ‘बंद’ स्थिती काही एकाच मांगोरहिलमध्ये नाही. मोतीडोंगर असेल, चिंबल असेल की गंगानगर खोर्ली असेल किंवा अन्य गावे जिथे कोरोनाबाधित रुग्ण सापडले तिथे तिथे निर्बंध आले आहेत. त्यामुळे कोणी बिथरून जाऊ नये. धोका टळला की सर्व काही सुरळीत होणार आहे. या भागांमध्ये सेवा देणारे आरोग्य कर्मचारी असोत किंवा पोलिस, अग्निशमन दलाचे जवान किंवा अन्य सेवक, त्यांना कोरोनाची बाधा कोणामुळे झाली? गांभीर्याने ज्यांनी कोरोनाकडे पाहिले नाही आणि कोरोनाला आमंत्रण दिले अशा काही लोकांमुळे अत्यावश्‍यक सेवा बजावणारे आज कोरोनाचा सामना करीत आहेत. त्यांनी अशी सेवा बजावली नसती तर आणखी कितीतरी जण कोरोनाबाधित होऊन इस्पितळात असते, याचे भान ठेवायला हवे. या सेवा बजावणाऱ्यांना खेद वाटत नाही, त्यांच्या कुटुंबियांना धास्ती वाटत नाही? हे सर्वजण इतरांचे आरोग्य जपण्यासाठी काम करीत असताना निर्बंधांमुळे सगळे काही संपल्यागत काही जण आक्रोश करतात हे योग्य नाही. परिस्थिती काय आहे हे पाहून प्रत्येकाने वागले पाहिजे. या सरकारी सेवकांनाही अन्न, पाण्यावाचून काम करण्याची वेळ येते. त्यांची आबाळ होते. लोकांच्या हितासाठी त्यांनी सारे सहन करायचे आणि आम्ही थोडेही सहन करू नये? आपल्यापेक्षा समाज महत्त्वाचा. समाजात सारे काही सुरळीत असेल तर आपणही सुरक्षित असू, याचा विसर पडता कामा नये. कोरोनाने अशी स्थिती निर्माण झाली आहे की सगळीकडेच छिद्रे पडली आहेत. सरकार तरी किती ठिकाणची छिद्रे बुजवणार..? आपणच त्यासाठी शक्य तेवढा हातभार लावला पाहिजे. स्वत:साठी आणि इतरांसाठीही आपण काळजी घ्यायला हवी.

 

 

संबंधित बातम्या