परंपरेला ओव्हरटेक करून भटजी बनले हायटेक

अवित बगळे
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

ऑनलाईन पद्धतीने भटजी उपलब्ध करून पूजा करण्याची पद्धत गोव्यात नवी असली, तरी देशात अशी सेवा देणाऱ्या कंपन्या केवळ सुरूच झालेल्या नाहीत तर त्यांनी हातापायही पसरले आहेत.

‘कोविड’ महामारीच्या काळात सध्या चर्चेत असणारा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो थेट हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. श्रावण महिन्यात एरव्ही वातावरण तसे धार्मिकच असते. श्रावण संपल्यावर भाद्रपद चतुर्थीला गणेश चतुर्थी येते. सध्या मंदिरे उघडी असली, तरी समाज अंतर पाळण्याच्या नियमांमुळे बहुतांश मंदिर व्यवस्थापन समित्यांनी धार्मिक अनुष्ठानांवर बंधने आणली आहेत. गणेश चतुर्थीत ऑनलाईन पद्धतीने पूजा सांगण्यापासून यजमानानेच स्वतः गणेश मूर्ती पूजन करण्याच्या पर्यायांवर सध्या विचार सुरू आहे. ठिकठिकाणी पुरोहित वर्गाच्या बैठका होत आहेत. त्यातून हे तोडगे सूचवले जात आहेत.
ऑनलाईन पद्धतीने भटजी उपलब्ध करून पूजा करण्याची पद्धत गोव्यात नवी असली, तरी देशात अशी सेवा देणाऱ्या कंपन्या केवळ सुरूच झालेल्या नाहीत तर त्यांनी हातापायही पसरले आहेत. गोव्यासारख्या छोट्या राज्यात श्रावणात गरज भासली की शेजारील महाराष्ट्र व कर्नाटकातून पुरोहित आणून सेवा दिली जात होती. यंदा अलगीकरणाच्या सक्तीमुळे दोन्ही राज्यातून भटजी आणता येणार नाहीत. त्यामुळे अशी सेवा ऑनलाईन मिळेल का? याचा शोध कित्येकांनी आतापासूनच सुरू केला आहे. त्यातून ही ऑनलाईन भटजी सेवेची माहिती समोर आली आहे.
भटजी आणि यजमान यांचे एक नाते असते. यजमान आणि भटजी यांची भाषाही अनेकदा जुळावी लागते. कुलाचार आणि पूजा पद्धतीत साम्य असावे लागते. कारण, शेवटी हा श्रद्धेचा विषय असतो. या ऑनलाईन भटजी सेवेच्या जन्माची कथाही याच सगळ्या माहिती एवढी रंजक आहे. मुंबईत जे सुंदर सीताराम हे तेलगू भाषक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्ती राहत होते. त्यांना त्यांच्या घरात पूजा करण्यासाठी तेलगू भटजी हवे होते. त्यांचा शोध घेण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. त्यांच्या मनात विचार आला आपण जसा तेलगू भटजींचा शोध घेतला तसा इतर भाषकही मुंबईसारख्या महानगरात आपापल्या भागातील भटजींचा नक्कीच शोध घेत असणार. आपल्या कूळ परंपरेप्रमाणे धार्मिक विधी व्हावेत असे प्रत्येकाला वाटत असणार. त्यामुळे भटजी शोधून देण्याचा व्यवसाय करता येऊ शकतो हा विचार त्यांच्या मनाला स्‍पर्शून गेला. पुढे मीनू शर्मा यांची या कामात त्यांना साथ मिळाली आणि त्यातून ऑलपंडितडॉटकॉम या वेबसाईटचा जन्म झाला. लग्न, वास्‍तुशांती, गणेशपूजन, रुद्राभिषेक, लक्ष्मीपूजन, अभिषेक किंवा सत्यनारायणाच्या पूजेसाठी भटजींचे आरक्षण या वेबसाईटवर करता येते. ही कथा आहे २०१५ मधील आता अशा अनेक वेबसाईट सुरू झाल्या आहेत.
अशीच आणखीन एक वेबसाईट आहे ती ओपंडितडॉटकॉम. मृदला बर्वे यांनी ती सुरू केली. शहरात स्वतंत्र राहणाऱ्या कुटुंबांना एखादा धार्मिक विधी करायचा असल्यास वेळ आणि योग्य माहितीच्या अभावी ते काम फारच अवघड वाटते. अनेकांनी तसा अनुभवही घेतला असणार. लोकांच्या मनातील हा संभ्रम दूर करण्याच्या आणि पुरोहित व्यवसायात सुसुत्रता आणण्यासाठी ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. ई कॉमर्सच्या माध्यमातून भटजींचे आरक्षण करणे शक्य होते. परंतु त्यामध्ये अनेक प्रश्नही होते. भटजी वेळेवर पोहोचले नाहीत तर...दक्षिणा जास्त मागितली तर...या बाबतीत विचार केल्यानंतर ही बेवसाईट तयार केल्याचे बर्वे यांनी एका ठिकाणी नमूद केले आहे.
गोमंतकीय समाजाचा सनातन आर्य संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. सनातन धर्मात माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत १६ संस्कार आहेत. हे सगळे विधी योग्यवेळी करायचे असतात. ब्राह्मणेतर मुलांचा उपनयन (मुंज) विधीही शास्त्रात सूचवला आहे. पण, त्याची माहिती खूप कमी जणांना असते. वैदिक पद्धतीने विवाह विधी करण्यापूर्वी सगळ्यांची नवग्रहशांती करणे आवश्यक असते. घराची वास्तुशांती दर बारा वर्षांनी करायला हवी. उदकशांती नावाचा विधी दरवर्षी दक्षिणायन व उत्तरायण या दोन्ही काळात करायला हवा, अशी नानाविध माहिती याप्रकारच्या वेबसाईटवर मिळत जाते. पूजेसाठी लागणारे साहित्यही पुरवणाऱ्या वेबसाईट आहेत.
गोव्यात हा विषय नवा वाटत असला तरी देशाच्या काही भागात अगदी शेजारील महाराष्ट्रात याचा वापर गेली चार पाच वर्षे होऊ लागला आहे. काळ बदलला तसे ‘लाइफस्टाइल’ही बदलली, आवडी-निवडी बदलल्या, काल नको होते ते आज अत्यावश्‍यक वाटू लागले. अशा परिस्थितीत परंपरेला ‘ओव्हरटेक’ करून पुढे गेलेल्या तंत्रज्ञानाने भटजींनाही ‘हायटेक’ केले. त्यामुळे पूजा सांगण्याच्या पारंपरिक पद्धतीमध्येही आधुनिक काळाची झलक दिसू लागली. तेच मंत्र, तोच विधी, पूजेची पद्धतही तीच...फरक एवढाच की भटजी महाराष्ट्रात बसले आहेत अन्‌ यजमान विदेशात! देशातील मोठ्या शहरांमध्ये सुरू असलेल्या ‘ऑनलाइन’ पूजा पद्धतीने हे चित्र तयार झाले आहे.
गेल्या पंधरा वर्षांमध्ये संगणकीय क्रांतीने बऱ्याच गोष्टी सहज आणि सोप्या करून दिल्या. वेळ वाचविणाऱ्या या साधनाने देश-विदेशातील ‘कम्युनिकेशन गॅप’ भरून काढली. जी-मेल, ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर आदी गोष्टींच्या माध्यमातून चॅटिंग, टेलिफोनीक चॅट सोपे झाले. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असतानादेखील एकमेकांशी संवाद सोपा झाला. हे लक्षात आल्यावर भटजीही कशाला मागे राहतील. देशाबाहेर राहणाऱ्या भारतीय लोकांना शास्त्रशुद्ध पूजा करण्यासाठी भटजी मिळत नाही. अशावेळी थेट भारतात आपल्या शहरामध्ये संपर्क साधून ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’च्या माध्यमातून पूजा करून घेण्याची संधी लोक सोडत नाहीत. अशक्‍य वाटणारी गोष्टदेखील संगणकामुळे सोपी झाली आहे. ज्याठिकाणी ‘वेबकॅम’ची सुविधा असेल त्याठिकाणी भटजींनी ‘इयरफोन’ लावून संगणकापुढे बसावे. यजमान आणि पूजेचे स्थळ संगणकावर दिसतेच. संपूर्ण विधी संगणकापुढे बसून सांगण्यात येते.
ऑनलाइन पूजेसाठी दक्षिणा किती, असा प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. अर्थातच जेवढा इंटरनेटचा वापर तेवढी दक्षिणा जास्त, असे साधे सरळ गणित आहे. प्रत्यक्ष भटजींना बोलावून तीनशे रुपयांमध्ये होणारी पूजा इंटरनेटवर सांगायचे म्हटले, तर दीड तास इंटरनेटचा वापर करावा लागेल. दीड तासात जवळपास एक ते दीड जीबी मेमरीचा वापर होणार. त्यामुळे तीनशे रुपयांची पूजा ७५० रुपयांपर्यंत जाते. हीच पूजा विदेशात सांगायचे म्हटल्यावर इंटरनेटचा वापर तिप्पट होणार. त्यामुळे दक्षिणाही तिप्पट लागणार.
मुळात हे भटजींना हे शक्य होणार आहे का? अशी विचारणा केली जाऊ शकते, पण हाताच्या बोटावर चालणाऱ्या वेगवान इंटरनेटच्या जमान्यात आता पौरोहित्यालाही आधुनिकतेचा साज चढला आहे. पोथी पुस्तके हातात घेऊन भिक्षुकी करणारे अनेक भटजीकाका अलीकडे अँड्रॉइड मोबाईलचा वापर करत पूजा सांगताना दिसत आहेत. यात वावगे काहीही नसले तरी जीवनातील प्रत्येक क्षेत्रच मोबाईलने व्यापून टाकल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.
सोशल मीडियाच्या जमान्यात घर, गाडी, कपडे, जिन्नस अशा गोष्टी आजकाल मोबाईलवरून आरक्षित केल्या जातात. अलीकडील काळात तर खाणे घरपोच होण्यासाठी मोबाईल इंटरनेटचा वापर वाढला आहे. सोशल मीडियाने जीवनातील बरे-वाईट प्रसंग व्यापून टाकले. गुगल प्ले स्टोअरवर विविध ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला जे हवे ते ऑनलाईन-ऑफलाइन उपलब्ध आहे. मग, पौरोहित्य क्षेत्र याला अपवाद कसा ठरेल. गोव्यात आजही पूजा, धार्मिक विधी, उत्तरकार्य विधी असोत सर्वांना तेवढेच महत्त्व असून यासाठी भटजी लागतात. हंगामात तर भटजींची कमतरता जाणवते. नियमित सरावामुळे बहुतांश भटजीकाकांची स्तोत्र, विधी आदी तोंडपाठ असली तरी गडबडीत काहीही विसरायला झाले तर अडचण नको म्हणून आजकाल सर्रास काका चक्क अँड्रॉइड मोबाईल वापरताना दिसतात.
ग्रामीण भागात नेटवर्कची सोय नसली, तरी काकांची अडचण होत नाही, कारण आजकाल गुगल प्ले स्टोअरवर सर्व प्रकारचे पूजा विधी ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध आहेत. एकदा का जाणकारांकडून ते डाउनलोड करून घेतले की कायमचा प्रश्न मिटतो. त्यामुळे आजकाल गावागावांत लग्न असो वा धार्मिक कार्य, पूजा असो वा होमहवन उपस्थित भटजी काकांनी मोबाईलचा आसरा घेतला, तर कुणालाही नवल वाटत नाही. त्यामुळे त्यांना या सगळ्याची सवय आहे त्याला फक्त संयोजनाची जोड दिली गेली पाहिजे.
मूळ विषय आहे तो ‘कोविड’ महामारीच्या काळात श्रद्धेचे पालन करण्याचा. त्यावर तंत्रज्ञानाने सहज मार्ग काढता येणेही शक्य आहे. सध्या जमाना आहे तो स्टार्टअपचा. भटजींची ऑनलाईन पद्धतीने सेवा पुरवणारी वेबसाईट विकसीत करून त्या माध्यमातून सेवा पुरवणारी वेबसाईट तयार करून सेवेच्या या नव्या क्षेत्रात पाय रोवण्याची संधी नव उद्योजकांना खुणावत आहे. राज्यात आस्थेची मोठी बाजारपेठ आहे, धार्मिक पर्यटन आज ना उद्या सुरू होईल त्यामुळे ‘कोविड’ महामारीच्या संकटासोबत आलेल्या या संधीकडे अधिक डोळसपणे पहायला हवे. आता १६ दिवसांवर गणेश चतुर्थी आली आहे. त्यानंतर पितृपक्ष आहे. या काळात भटजींना मोठी मागणी असते. त्यानंतर नवरात्रही अर्थात आहे. त्यामुळे भटजींची सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा स्टार्टअप कोणी सुरू केला तर निदान दोन तीन महिन्यांचा व्यवसाय ठरून गेलेला आहे. माटोळीचे साहित्‍य, करंज्या घरपोच पोचवण्याची सेवा आता अनेकांनी केली आहे. त्याच्या भरीला या नव्या व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’ कोणीतरी करावा आणि लोकांच्या श्रद्धेची गरज भागवावी असे सूचवावेसे वाटते.
 

संबंधित बातम्या