बातमीची दखल, कोणाकडून, कशासाठी, कोणासाठी?

अवित बगळे
गुरुवार, 25 जून 2020

संजय घाटे यांनी सुरू केलेल्या दातृत्वाच्या या प्रवासात जॉयदीप भट्टाचार्य, महेश शेटकर, प्रमोद कांदोळकर, शिल्पा कांदोळकर सहभागी होत गेले. कला महाविद्यालयातील डॉ. शिल्पा डुबळे परब यांनी आपल्या घरातील दोन विनावापर मोबाईल दिले, दीपक मणेरीकर यांनीही आपल्याकडील चांगल्या स्थितीतील दोन मोबाईल दिले.

बातमीदाराच्या जीवनात तो अनेक बातम्या देत असतो. अनेक बातम्यांची दखल समाज घेतो, सरकार घेते आणि नंतर सारेकाही विसरले जाते. मात्र एक बातमी अशी येते की ते आयुष्यभर घर करून जाते. असाच काहीसा अनुभव ‘गोमन्तक’चे काणकोणातील प्रतिनिधी सुभाष महाले यांना येत आहे. काणकोणमधील त्यांच्या एका बातमीचे पडसाद राज्यभर उमटले, आणि उमटत आहेत. ‘बातमीदारीच्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.’ हे त्यांचेच उद्‍गार आहेत.
काणकोणमधील या बातमीची सुरवात काणकोण बाजारातील एका घटनेने झाली. एक महिला आपली व्यथा शंकर नाईक या सामाजिक कार्यकर्त्याला ऐकवत होती. ती महिला आपले दागिने विकण्यासाठी आली होती तिला आपल्या नववीतील मुलीसाठी मोबाईल घ्यायचा होता. शाळेतून ऑनलाईन वर्गात सहभागी व्हा, असा आदेश जारी झाला होता. सरकारने कितीही जोरकसपणे ऑनलाईन शिक्षणाची सक्ती नाही असे स्पष्ट केले असले तरी ऑनलाईन शिक्षणासाठी मुले पालकांना मोबाईल घेण्यास वेठीस धरू लागले आहेत हे तेवढेच सत्य आहे.
याच वास्तवाचे दर्शन काणकोणात झाले. महाले यांनी त्या घटनेचे शब्दांकन केले आणि बातमी पाठवली. ती प्रसिद्ध झाली आणि समाजातील संवेदनशीलतेचे दर्शन घडणे सुरू झाले. बातमी वाचल्या-वाचल्या कदंब वाहतूक महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दूरध्वनीवरून त्या मुलाला कोणी मोबाईल दिला आहे का? अशी विचारणा केली. त्यांनी लगेच मी त्या मुलाला मोबाईल पाठवतो, असे सांगितले. त्यांनी मोबाईल तर पाठवलाच शिवाय इंटरनेट रिचार्ज करण्यासाठी पाचशे रुपयेही पाठवले. ‘गोमन्तक’चे काणकोणातील विक्रेते संजय कोमरपंत यांच्या हस्ते तो मोबाईल सेजल वेर्णेकर या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आला. यावेळी हा विषय जाणून घेऊन मदतीसाठी धडपड करणारे शंकर नाईक, बाबू नाईक उपस्थित होते. हा झाला त्या विद्यार्थिनीला मोबाईल मिळण्याचा विषय.
हा विषय एवढ्यापुरता मर्यादित राहिला नाही. स्नेहल वेरेकर या शिक्षिकेने ‘गोमन्तक’च्या बातमीचे कात्रण फेसबुकवर पोस्ट केले होते. त्यांचा सूर सरकारच्या ऑनलाईन सक्तीमुळे विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाबाबात होता. म्हापसा येथील सद्हृदयी दीपक मणेरीकर यांना ते खटकले. मुळात अशा बातम्या देऊच नयेत, समाजाने असे प्रश्‍न आपल्या पातळीवर सोडवले पाहिजेत, असे त्यांचे म्हणणे होते. अखेरीस समाजात असे आणखीन काही विद्यार्थी असतील तर त्यांना मदत करूया असे ठरले. या सगळ्याच्या मुळाशी ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झालेली काणकोणातील बातमी होती.
दीपक मणेरीकर यांनी फेसबुकवर वापरलेले पण चांगल्या प्रकारे चालणारे मोबाईल ज्यांच्याकडे विनावापर आहेत त्यांनी ते अशा मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करावेत, असे आवाहन केले. केपे महाविद्यालयाचे प्राचार्य जॉयदीप भट्टाचार्य यांनी ५० हजार रुपये देण्याचे मान्य केले. स्नेहल वेरेकर यांनी समन्वयाची जबाबदारी घेतली आणि मोबाईल वितरणाचा हा प्रवास सुरू झाला. गरजू विद्यार्थी शोधण्यापासून त्या विद्यार्थ्यांपर्यंत मोबाईल पोचवण्याची जबाबदारी ‘गोमन्तक’च्या यंत्रणेने पेलली. डिचोलीत, सांग्यात मोबाईल वितरण झाले, काणकोणातही होईल, दाते पुढे आले तर म्हापशातील गरजू विद्यार्थ्याला मोबाईल मिळू शकेल.
संजय घाटे यांनी सुरू केलेल्या दातृत्वाच्या या प्रवासात जॉयदीप भट्टाचार्य, महेश शेटकर, प्रमोद कांदोळकर, शिल्पा कांदोळकर सहभागी होत गेले. कला महाविद्यालयातील डॉ. शिल्पा डुबळे परब यांनी आपल्या घरातील दोन विनावापर मोबाईल दिले, दीपक मणेरीकर यांनीही आपल्याकडील चांगल्या स्थितीतील दोन मोबाईल दिले. आणखीनही दाते पुढे यावेत आणि येतील अशी अपेक्षा आहे. सर्व गोष्टींसाठी सरकारकडे डोळे लावून बसण्यापेक्षा समाजातील सर्वांनी एकमेकांना मदत करत राहत पुढे जात राहिल्यास सामाजिक क्रांतीच्या आजवर केवळ ऐकत आलेल्या गोष्टी प्रत्यक्षात येण्यास वेळ लागणार नाही. म्हापशाच्या दीपक मणेरीकर यांनी फेसबुकवर आवाहन केले म्हणून हे एवढे सारे आकाराला येऊ लागले, स्नेहल वेरेकर यांनी आपला वेळ खर्ची घातला म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत मोबाईल पोचू शकले. असाच मदतीचा विचार प्रत्येकाने केला तर?
पर्वरी येथील क्रीडा शिक्षक अमेय बेतकेकर यांनी वैयक्तीक पातळीवर मोबाईल संकलनाचा प्रयत्न केला होता. मात्र आजवर सावनी शेटये हिने आपला नोटबुक त्यांच्याकडे सुपूर्द केला, तो नोटबुक आणि आपल्याकडील विनावापर मोबाईल अमेय यांनी दोन विद्यार्थ्यांना पुरवले आहेत. असे समाजात वैयक्तीक पातळीवर काहींचे प्रयत्नही असू शकतील मात्र त्यातून एक एकत्रित आणि संघटनात्मक प्रयत्न आकाराला आला पाहिजे. संस्था संघटनांची राज्यात कमी नाही. मात्र संवेदनशीलतेने समाजातील घडामोडींकडे पाहण्याची गरज आहे. तशी नजर असणाऱ्यांची वानवा नाही मात्र अशांचे संघटन होत नसल्याचे दिसते.
स्वतःच्या सुख-दुःखाप्रती आपण नेहमीच जागरूक असतो. स्वतःला त्रास झाला तर आपल्या मनाला वाईट वाटते. याउलट आनंद झाला तर तो व्यक्त होतो. स्वतःच्या दुःखाने होणारी वेदना व सुखाने होणारा आनंद आपण अनुभवतो. इतरांच्या आनंदात, दुःखात सहभागी होणे म्हणजे संवेदना आहे.
‘वेदना जाणावया जागवू संवेदना,
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना’
असे उगाच म्हटले नाही. स्वतःच्या वेदना आपल्याला चटकन कळतात, पण दुसऱ्यांच्या वेदना जाणावयासाठी दृष्टी आणि हृदय विशाल लागते.
पारंपरिक जगण्यामध्ये आपण अनेकदा या गोष्टींना विसरून जातो. संवेदनेची गरज मानवी जीवनात नेहमी भासते. लहान मुलंही संवेदनशीलतेचे मोठे उदाहरण. निष्पाप असणाऱ्या या मनांवर कुठलेही खडे-ओरखडे ओढलेले नसतात. बालमन हे अधिक संवेदनशील असते. समोरच्या प्रत्येक सुख-दुःखाशी ते पटकन एकरूप होते. त्यात आपला सहभाग नोंदविण्याचा प्रयत्न करते. हळूहळू मोठा होऊ लागला की त्याला भान येते. संवेदनशीलता संपते असे नाही; मात्र तो पडताळून पाहतो आणि मग त्याची त्यावरची प्रक्रिया सुरू होते.
भुकेलेल्याला अन्न व तहानलेल्याला पाणी देणे ही आपली संस्कृती. त्याची रूपे आपल्याला आजही पाहावयास मिळतात. अगदी पक्षी, प्राण्यांसाठी आपली संवेदना जागी असते. आणि म्हणूनच उन्हाळ्यात मानवांबरोबरच पक्ष्यांसाठी, प्राण्यांसाठीसुद्धा आपण पिण्याच्या पाण्याची सोय करतो. आपल्या परिसरात एखादा नवखा माणूस कोणाचे घर शोधत असताना आपण त्याला मदत करतो. अचानक पावसात सापडलेल्या व थंडीने घरासमोर कुडकुडणाऱ्या अनोळखी व्यक्तीलासुद्धा आपण घरात बसवून त्याची मदत करतो. संध्याकाळच्या वेळी घरात एखादी चिमणी आढळली तर रात्री फिरणाऱ्या पंख्याच्या पातीला अडकून गतप्राण होईल या जाणिवेने आपण तिला सुरक्षितपणे बाहेर काढतो. प्रवासात भूक लागल्यावर आपण काहीतरी खात असताना अनोळखी शेजाऱ्याला खाण्याचा आग्रह करतो, आपल्या जवळचे वर्तमानपत्र सहप्रवाशाला देतो. आपली नंतर कधीही भेट होणार नाही हे माहीत असतानादेखील हे करतो. याच्या मुळाशी असते संवेदना. आपण जे देतो ते आपल्याला परत मिळते, असे म्हटले जाते. हा अनुभव आपण नेहमी घेतो. आपणास दुसऱ्याकडून संवेदनशीलतेचा अनुभव येऊ लागतो.
संवेदनेची अनेक रूपे आपणास पाहावयास मिळतात. समाजातील विधायक कार्याचा पाया ही संवेदनाच असते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या सामाजिक संवेदनेतूनच मोठमोठी विधायक कार्ये उभी राहतात. संवेदनेची ही बेटे मग सामाजिक कार्याचा महामेरू होतात. एका कार्यातून संवेदना जागृत होऊन हजारो कार्ये व कार्यकर्ते घडतात. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या आयुष्याची दिशा बदलावीच असे नाही. संवेदनेचा मनातील कप्पा खुला राहिला की आपण निश्‍चितपणे विधायक मार्गावर राहतो. माझ्या पायात काटा मोडल्यानंतर माझ्या डोळ्यांतून येणारे पाणी ही वेदना, तर दुसऱ्याच्या पायात मोडलेल्या काट्यामुळे येणारे पाणी ही संवेदना. संवेदनेच्या या पाण्याने समृद्ध होणे हे सामाजिक स्वास्थ्यासाठीचे उत्तम लक्षण आहे. त्याचीच जोपासना आपण सारे करूया!

 

 

संबंधित बातम्या