कोरोनाचा विळखा घट्ट होताना...!

Narendra Tari
मंगळवार, 2 जून 2020

राज्यात अख्खं कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने चिंतेची बाब बनली आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर हा मोठा फटका राज्याला बसला आहे. आता आणखी अशी किती कुटुंबे कोरोना आपल्या कवेत घेईल, हे सांगता यायचे नाही.

राज्यात अख्खं कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने चिंतेची बाब बनली आहे. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर हा मोठा फटका राज्याला बसला आहे. आता आणखी अशी किती कुटुंबे कोरोना आपल्या कवेत घेईल, हे सांगता यायचे नाही.

आतापर्यंत सारं काही आलबेल होतं. राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडले होते, पण ते बरे होऊन घरी परतले होते. पण नव्याने वास्कोत कोरोनाग्रस्त कुटुंब सापडल्याने आता चिंतेत भर पडली आहे. हा कोरोनाचा विषाणू कुठपर्यंत जाणार आणि कुणाकुणाला घेऊन जाणार? हे कळायला मार्गच नाही. कोरोनावर अजूनही लस आलेली नाही. संशोधन चालूच आहे, लस सापडल्याच्या अधूनमधून वार्ता येतात, पण त्यात काही तथ्य नाही. जोपर्यंत कोरोनावर प्रभावी लस बाजारात येत नाही, तोपर्यंत काही खरं नाही.
देशातील इतर राज्यातील कोरोनाचा विळखा पाहता गोव्यात कोरोनासाठी प्रभावी नियोजन हे महत्त्वाचे ठरले आहे. काही दिवसांपूर्वी गोवा ग्रीन झोनमध्ये होता, पण वाहतूक व्यवस्था थोडी ढिली झाल्यानंतर मुंबई, दिल्लीहून आलेल्यांमुळे गोव्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे खुद्द गोव्यात कुणी कोरोना रुग्ण नव्हता. हे आयात कोरोना रुग्ण मर्यादित असल्याने धोका काही अंशी तसा कमीच होता, पण डोक्‍यावरील टांगती तलवार काही हटली नव्हती. आणि आता तर खुद्द अख्खं कुटुंबच कोरोनाच्या विळख्यात आल्याने पुढे काय, हा उत्तर न मिळणारा प्रश्‍न समोर आ वासून उभा आहे.
देशातील लॉकडाऊन चार घोषित झाल्यानंतर परिस्थिती काय आहे, त्याचे चित्र समोर आलेच होते. देशातील बहुतांश राज्यांना कोरोनाचा विळखा बसला असल्याचे निदर्शनास आले असतानाही आपण नेमके कोणत्या दिशेने चाललो आहोत, त्याचे अवलोकन करण्याची खरी गरज आहे. आज महाराष्ट्रातील स्थिती काय आहे, दिल्लीत काय चाललेय, गुजरात, मध्यप्रदेशमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण थांबण्याचे नाव घेत नाहीत. महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर कोरोनाचे आगरच बनले आहे. एकट्या मुंबईत दिवसाकाठी किमान हजारभर नव्याने कोरोना रुग्ण सापडत आहेत. मुंबईहून सुटका मिळवण्यासाठी आपापल्या राज्यात परतलेल्या लोकांकडून कोरोनाची लागण त्या त्या भागात झाली आहे. गोव्याच्या शेजारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची बाधा झाली नव्हती. पण मुंबईहून कोरोनाच्या भीतीने गावी परतणाऱ्या चाकरमान्यांकडून कोरोनाची भेटच सिंधुदुर्गला मिळाली आहे. कर्नाटकातील कारवार, बेळगाव आदी जिल्ह्यांतील स्थितीही समाधानकारक नाही. मात्र बेळगाव, कारवार आणि सिंधुदुर्गमधून गोव्यात येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. या लोकांना कसा काय प्रवेश दिला जातो, ते आधी पहायला हवे. नियम शिथिल केले असले तरी धोका काही टळलेला नाही. त्यामुळे ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असे म्हणून गोव्याची वाट लागण्याची परिस्थिती आहे.
या ठिकाणी आपण दोषाचे खापर सरकारवर फोडून उपयोगाचे नाही. आपण किती सजग आहोत, आपण किती बेपर्वा आहोत, ते आधी पहायला हवे. सरकार आपल्या पातळीवर काम करणारच. पण आमची काय जबाबदारी आहे? कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सुरवातीला जी दहशत लोकांच्या मनात होती, ती आता राहिलेली नाही. कोरोनासोबत आता जगायला शिकले पाहिजे, हे खरे आहे. कारण ज्याप्रमाणे मलेरिया व तत्सम संसर्गजन्य रोगांचा नायनाट अजून झालेला नाही, लस येऊनही मलेरिया व इतर तत्सम रोगांचा प्रादुर्भाव सुरूच आहे, त्याच धर्तीवर कोरोनाचेही बस्तान बसण्याची शक्‍यता आहे. भले लस येईलही, पण कोरोनाचा समूळ नायनाट होईल काय, हा खरा प्रश्‍न आहे.
कोरोना आता आपल्या पंगतीला येऊन बसला आहे. त्यामुळे कोरोनासोबत जगण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, हे प्रत्येकाने मनात ठामपणे बिंबवायला हवे. आणि कोरोनाला आपण काही हरवू शकत नाही हे जाणूनच जगातील प्रत्येक देशातील व्यवहार आता गतिमान होऊ लागले आहेत. पूर्णतः लॉकडाऊन करून काही देश चालवू शकत नाही, हे प्रत्येकाला ठाऊक आहे, त्यामुळेच आता औद्योगिक स्तरासह इतर सर्व क्षेत्रातील व्यवहार गतिमान होऊ लागले आहेत. मात्र हे व्यवहार गतिमान होताना आपली नेमकी काय जबाबदारी आहे, हे प्रत्येकाने जाणून घ्यायला नको का. सरकार दोषी असेलही, पण अशा आपत्तीच्या काळात प्रत्येकाने सहकार्याचा हात पुढे करायला नको काय, केवळ दोषारोप करून चालणार नाही, नागरिकांच्या हितासाठी नेमके काय करता येईल, संयुक्तरित्या कशाप्रकारे उपाययोजना काढता येतील. नागरिकांचे आरोग्य अबाधित कसे राहील, याकडे कटाक्ष ठेवायला हवे, हे सरकार आणि विरोधातील पक्षांनीही जाणून घ्यायला हवे.
टाळेबंदीच्या काळात जे काही घडले त्याला सर्वचजण जबाबदार आहेत, असेही नव्हे. पण आपल्या समाजातील काही महाभाग असे आहेत, ज्यांना कोरोनाचे काही देणंघेणंच नाही, असा या लोकांचा व्यवहार आहे. कोरोना असेना का, पण कुठून तरी पैसा कमवायचा हे तंत्र काही लोकांनी अवलंबले. सर्व नियम धाब्यावर बसवून व्यवहार सुरू केले. अव्वाच्या सव्वा दर आकारला गेला. आधीच खिशात पैसा नाही, अशांवर आर्थिकदृष्ट्या एकापरीने अत्याचारच झाले. कठीण प्रसंगी खरे म्हणजे माणूसच माणसाच्या कामी यायला हवा, पण येथे तर...!
कोरोनाच्या धास्तीमुळे वीस हजारपेक्षा जास्त मजूर व कामगार आपापल्या गावी गेले. राज्यातील विकासकामांसाठी या लोकांची कमतरता भासणार आहेच, पण जे गावी गेले त्यातील बहुतांश हे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आपापल्या गावी परतत होते, आणि पुन्हा चतुर्थीनंतर गोव्यात यायचे, त्यांचा त्यात सहभाग जास्त आहे. परप्रांतीय गावी गेले, आता गोमंतकीयांना रोजगार मिळणार असल्याची आवई उठवण्यात आली. पण कसचे काय हो...! खरे म्हणजे प्रत्येक औद्योगिक वसाहतीत आता रोजगाराची काय स्थिती आहे, त्याचा आढावा उद्योग खात्याबरोबरच श्रम व रोजगार खात्याने घ्यायला हवा. औद्योगिक वसाहतीत या मजूर व कामगारांच्या जाण्याने काही फरक जाणवला काय, कोरोनामुळे आपापल्या गावी अडकलेल्या कामगारांमुळे रोजगारावर परिणाम झाला आहे काय, परिणाम झाला असेल तर गोमंतकीय युवकांना अशा उद्योग प्रकल्पात नोकऱ्या उपलब्ध करायला हव्यात. प्रत्येक उद्योग प्रकल्पाची झाडाझडती ही आताच घ्यायला हवी. सरकारी नियम धाब्यावर बसवून स्थानिक लोकांना रोजगार नाकारणाऱ्यांना चपराक बसायला हवी. त्यादृष्टीने उद्योग व श्रम आणि रोजगार मंत्रालयाने काम हाती घ्यायला हवे. शेवटी रोजगार हा महत्त्वाचा आहे. खिशात पैसाच नसेल तर...!
आताच्या घडीला प्रत्येकाने सावध रहायला हवे. वास्कोत अख्ख्या कुटुंबाला कोरोनाची लागण होते, या कुटुंबातील प्रमुख मासेविक्रीचा व्यवसाय करतो, त्याला कशी काय कोरोनाची लागण झाली, कुणापासून झाली, त्याचा शोध घ्यायला हवा. कोरोनाच्या काळात मासेविक्रीतून कधी नव्हे एवढा पैसा काही लोकांना कमावला. मासळीची टोपली वाहून नेणाऱ्या मजुरांनी तर काही वाहने भाडेपट्टीवर घेऊन जागा मिळेल तेथे मासे विकले. कोरोनामुळे स्वच्छतेला अधिक महत्त्व आहे, पण येथे मासळीचे घाण पाणी सबंध रस्ताभर, दुर्गंधी सबंध गावभर, त्यावर कुणाचे नियंत्रणच नाही. मूळात गोमंतकीयांची जिभच चवचाल. जिभेचे चोचले पुरवताना उद्या कोरोनाची लागण झाली तरी बेहत्तर. पण मांस, मच्छी खाऊनच मरणार ही जीद्दच गोमंतकीय बाळगून आहे. वास्कोचे हे पहिले उदाहरण. उद्या आणखी एखादे कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडले तर? हा आकडा वाढत गेला तर? काहीही होऊ शकते. त्यामुळेच तर मागच्या काळात गोव्याच्या सीमा सील करण्याची खरी गरज होती. जाऊदे...काय होईल ते बघूया, आणखी काय बोलणार...!

संबंधित बातम्या