भाष्य: कोरोना: सावधगिरी हाच प्रभावी उपाय

संजय घुग्रेटकर
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

जगात आतापर्यंत अनेक साथीचे रोग, आजार येऊन गेले. पण कोरोनासारखी साथ ही भयंकर म्हणावी लागेल. कारण संपूर्ण जगाला एकाचवेळी थांबवणारी ही एकमेव साथ असावी. यापूर्वी अनेक साथींमुळे जगात कुठे तरी पडसाद उमटत होते. ती साथ, रोग आपल्यापर्यंत पोचण्यापूर्वीच आपणास सावध केले जात होते. पण कोरोना विमानातून आला आणि गावोगावीसुद्धा पोचला.

विदेशात ये-जा करणाऱ्यांकडूनच ही साथ आपल्या देशात आली. एकूणच श्रीमंताकडून गरीबांकडेही ही साथ पोचली. ही साथ हिवाळ्यानंतर उन्हाळ्यात संपेल म्हणत म्हणत पावसाळाही संपत आला तरीसुद्धा ही साथ संपलेली नाही. टाळेबंदीही संपली. आर्थिकचक्र सुरू करण्यासाठी मोकळीक दिली गेली, सीमा खुल्या केल्या आणि कोरोनामुक्त गोवा कोरोनाबाधित झाला. टाळेबंदीत लोक शहाणे झाले, असा समज सरकार, लोकप्रतिनिधींनी केला. परंतु तसे काहीही घडले नाही. सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर थोडेच लोक वापरतात. इतरांकडून निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली होते. सगळेच मोकाट सुटले तर कोरोना कोणालाच सोडणार नाही, याचीही भीती लोकांना राहिली नाही.

सरकारसह अनेक संस्था, दाते कोरोनापासून बचावासाठी जागृती करीत आहेत. प्रसारमाध्यमांद्वारेही माहिती दिली जात आहे. बाजारात पेट्रोल पंप किंवा अन्य ठिकाणी मास्कशिवाय व्यवहार होत नाहीत. तरीसुद्दा काही महाभाग मास्कशिवाय मोकाट फिरतात. खरे तर नियम पाळा, असे सांगण्याची गरज नाही. कारण टाळेबंदीच्या काळात प्रत्येकाला आर्थिक फटका बसला आहे. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे अनेक चटके सहन केल्यानंतर आता प्रत्येकाने समजूतदारपणे वागायला हवे. या परिस्थितीतून आपण सुजान, समजूतदार व्हायला हवे होते. परंतु अनलॉकनंतर मोकाट जनावरांप्रमाणेच वर्तणूक सुरू झाली. गोव्यात सीमा बंद होत्या तोपर्यंत सर्व व्यवस्थित होते. पण सीमा खुल्या झाल्यानंतर रूग्णसंख्या वाढली. कोविड केअर सेंटर वाढविली तरीसुद्धा रूग्णांना खाटच मिळत नाही. जमिनीवर झोपावे लागते. अनेकांना पणजीहून मडगावला पाठविल जाते, तेथे जागा नाही म्हणून पुन्हा गोमेकॉत बोलावले जाते. अशा भयानक परिस्थितीत आपण कसे वागायचे हे प्रत्येकाने ठरवावे. घरोघरी आपल्या पाल्यांबरोबरच वडिलधाऱ्यांनाही `मास्क वापरा रो बाबांनो`, अशीच हाक द्यायला हवी. घर, कार्यालय, आस्थापनातसुद्धा स्वच्छतेचे नियम पाळलेच पाहिजे.

टाळेबंदीनंतर अर्थचक्राला गती देण्यासाठी म्हणून उद्योग, व्यवसाय सुरू केले. पण आवश्यक काळजी मात्र कुठेच घेतली जात नाही. त्यामुळेच कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. टाळेबंदीत जे नियम आपण पाळत होते, ते किती नियम आपण पाळतो, याचे उत्तर स्वतःलाच प्रत्येकाने दिले पाहिजे. स्वतः चुकत असाल तर स्वतःच आपल्या गालावर आपल्या हातानेच चापट मारून घ्या, पण नियमांचे पालन करा. या शिवाय दुसरा पर्याय नाही. इतरांना दोष देण्यापेक्षा आपण स्वतः नियम पाळा आणि त्यानंतर इतरांना शिकवा. पोलिसांनी फक्त रिकव्हरी क्लार्कप्रमाणे पावत्या फाडण्यापेक्षा अशा मोकाट फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. पर्यटकांनाही चांगली अद्दल घडेल अशी शिक्षा करावी, तरच येणारे पर्यटक नियमांनुसार वागतील. आज अनेक ठिकाणी गोवा सुरक्षित म्हणून पर्यटक येत आहेत. त्यांचा धिंगाणा समुद्र किनारे, इतर पर्यटन स्थळी सुरू आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत का? मागील काही महिन्यांत जबाबदारीने सांभाळलेला गोवा सीमा खुल्या झाल्यानंतर येणाऱ्यांमुळे प्रवाशी, पर्यटकांमुळे काही प्रमाणात कोरोनाबाधित झाला आहे. भविष्याच्या दृष्टीने हे लक्षण ठिक नाही. सीमा पुन्हा बंद करणे शक्य नाही, टाळेबंदीही लागू होणार नाहीच. तेव्हा निश्चित केलेल्या नियमांची  अंमलबजावणी व्हावी. यासाठी शासाकीय यंत्रणेबरोबरच प्रत्येक नागरिकानेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जाब विचारायला हवा. 

घराबाहेर पडताना मास्क लावणे, दुचाकीवर (पायलट) बसतानाही सुरक्षित अंतर ठेवावे, सॅनिटायझरचा वापर करणे, बस प्रवासातही काळजी घेतला पाहिजे. कारण कोणत्याही बस सुरक्षित नाहीत. आता आंतरराज्य बसेस गोव्यात येत आहेत. या बसेस केव्हा निर्जंतुकीकरण केल्या आहेत, हे त्या चालकांनाही माहित नाही. तेव्हा अशा बसेसमधून प्रवास करताना आपण आपली काळजी घ्यावी. आपल्याबरोबर राहणाऱ्या ज्येष्ठ लोकांसाठी, लहान मुलांसाठी आपण काळजी घेतली पाहिजे. प्राप्त परिस्थितीत धोका मोठा आहे. तेव्हा प्रत्येकाने निर्बंध पाळावेत. तरच काही प्रमाणात आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल. ही साथ पसरू न देण्यासाठी खोकताना, शिंकताना चेहरा झाकून घ्यायला हवा. मास्कचा वापर करा. कुठेही हस्तांदोलन करू नका, कितीही आनंद झाला, तरी चुकूनही कोणाला मिठी मारू नका. काहींना तशी सवय असते. पण आता सवयी बदलायला हव्यात.

हॉटेल सुरू झाली, मद्यालये उघडली म्हणून तेथे जायलाच पाहिजे का? गरज नसताना बाजारातसुद्धा जाऊ नका. निर्बंध आहेत, असे समजूनच वागा. कोरोनालाच्या काळात परिस्थितीबरोबरच राहाण्याची सवय प्रत्येकाने करावी. कारण कोरोनाची लागण झाली तर कोणीही आपल्याला सोडवायला येणार नाही. स्वतःलाच लढावे लागेल. कार्यालय, आस्थापनातूनसुद्धा पुरेशा सोयी नाहीत, स्वच्छता नाहीच. तेव्हा तेथेही काम करताना अधिकजण एकत्र येऊच नका. काही कामचुकार, रिकाम टेकड्यांना सवय असते. आपले टेबल सोडून दुसऱ्यांच्या टेबलाकडे झुकण्याची. अशांनाही वेळीच सक्त ताकीद द्या, जवळ न येण्याची. कितीही चांगला मित्र, सहकारी असेल तरीसुद्धा ठराविक अंतरानेच बोला, व्यवहार करा. आजच्या परिस्थितीत असेच जगावे लागणार आहे. कोरोनाकाळात शक्य होईल, तेवढे नियमांचे पालन करा, प्रत्येकवेळी, प्रत्येक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवा. वैद्याच्या सल्ल्याने काही काढे, औषधेही घ्या. पण, बाहेर जाताना, बोलताना सावधगिरी बाळगाच!

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या