‘ऑनलाइन’ शिक्षणाच्या छायेत दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

‘ऑनलाइन’ शिक्षणाच्या छायेत दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर
Dates of 10th and12th examinations in Maharashtra have been announced

यंदाचे अख्खेच्या अख्खे शैक्षणिक वर्ष कोरोनाच्या सावटाखाली आणि ‘ऑन-लाइन’ शिक्षणाच्या छायेत कसेबसे पार पडत असतानाच अखेर महाराष्ट्रातील दहावी तसेच बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यंदा हे वर्ष शून्य शैक्षणिक वर्ष म्हणून जाहीर करावे आणि नवे शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरू करावे, असा विचार कोरोनाचे सावट गडद असताना मांडला गेला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून सरकारने होता होईल तसे हेच वर्ष पुढे रेटले आणि आता दहावी-बारावीच्या परीक्षांबरोबर मुंबई वगळता राज्याच्या अन्य भागात पाचवी ते आठवीचे वर्गही सुरू करण्याचे ठरवले आहे. एकीकडे कोरोनामुळे जारी केलेली ठाणबंदी हळूहळू शिथिल होत असतानाच, शाळा-कॉलेजे मात्र ओसाडच होती. त्या निष्प्राण वास्तूंमध्ये आता प्रजासत्ताक दिनाचे ध्वजवंदन झाल्यानंतर पुन्हा एकदा गजबज आणि विद्यार्थ्यांचा किलबिलाट जाणवू लागणार आहे. त्याचवेळी दहावी, बारावीच्या परीक्षा आणि निकालांचेही वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे पुढचे शैक्षणिक सत्रही जूनऐवजी किमान १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनापासून सुरू होईल, अशी आशा त्यामुळे करता येऊ शकते.

अर्थात परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असले तरी या विद्यार्थ्यांसमोर आणि परीक्षा घेणाऱ्या मंडळांसमोर अनेक आव्हाने आहेत. राज्यात आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास न करण्याचे आणि नववीपर्यंत सत्रांत परीक्षा घेण्याचे धोरण आहे. आताच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या नववीत असतानाच्या ठाणबंदीच्या काळातील परीक्षा कोणी मान्य करो, अथवा न करो; कशाबशा उरकल्या गेल्या. त्यानंतर दहावी, बारावीत असलेल्या या विद्यार्थ्यांना साधारण दिवाळीपर्यंत ऑनलाईन आणि त्यानंतर संस्थांतर्गत शिक्षण सुरू झाले. शिक्षण ऑनलाईन झाले तरी सुमारे चाळीस टक्के विद्यार्थ्यांना इंटरनेटला रेंज नसणे, मोबाईल उपलब्ध नसणे, कनेक्‍टिव्हिटीतील अडचणी अशा समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे पूर्ण केला गेलेला अभ्यास खरेच पुस्तकातून विद्यार्थ्यांच्या मस्तकात गेला का, हा संशोधनाचा विषय आहे. तसेच ठाणबंदीने विद्यार्थ्यांची अभ्यासाची बैठक, त्यातले सातत्य, शिक्षकांकडून थेट मार्गदर्शन, अभ्यासक्रम हव्या त्या प्रकारे पूर्ण न होणे अशा समस्यांचा सामना करावा लागला, लिहिण्याचा सरावदेखील खूपच कमी झाला. अनेक शाळा, कॉलेजांमध्ये दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग होतात, त्यालादेखील ते मुकलेच आहेत. शिवाय, त्यांची विज्ञानाची प्रात्यक्षिके आणि त्यातील सातत्य सगळीकडे तेवढ्या प्रकर्षाने झाले असेल असेही नाही. या सगळ्यांचा परिणाम बोर्डाच्या परीक्षांमध्ये जाणवू शकतो. हे लक्षात घेवून परीक्षांचे वेळापत्रक बनवले असले तरी अभ्यासक्रमाची पूर्तता, प्रात्यक्षिकांचा सराव आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, तसेच पुढील वाटचालीतही ते कमी पडणार नाहीत ना, हे पाहावे लागणार आहे. त्या दृष्टीने उपाययोजना हव्यात. यंदाच्या वर्षभरात प्रामुख्याने स्वत:च्या जीवावरच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सारे अवघड जाईल, असा निष्कर्ष लगेचच काढणे योग्य ठरणार नाही. 

येत्या काही दिवसांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्गही भरवणे सुरू होणार आहे. त्या दृष्टीने घोषणेनंतर प्रशासन आणि शैक्षणिक संस्था यांनीही विद्यार्थ्यांची स्वागताची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या कोरोनाविषयक चाचण्या कराव्या लागणार आहेत. यापूर्वी ज्यांच्या चाचण्या झाल्या होत्या, त्यांच्याही चाचण्या पुन्हा करणे क्रमप्राप्त आहे. शिवाय, शाळेत येणारी मुले, त्यांचे आरोग्य आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी, शाळेत मुलांची आसन व्यवस्था, सुरक्षित अंतर ठेवून त्यांना वर्गात बसवणे, त्याच्या शाळांत येण्यातले सातत्य किंवा दिवसाआड सुरवातीला शाळेत यायचे असेल तर त्याचे सूत्र ठरवणे, अशा सगळ्या बाबींसाठी विहीत अशी मार्गदर्शक कार्यपद्धती शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासन यांना अंमलात आणावी लागणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांची वाहतूक हा कळीचा मुद्दा आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना व्हॅन, रिक्षात कोंबून आणले जायचे, ते आता कोरोनाच्या छायेत परवडणारे नाही. अशा वाहतुकीसाठी नियमावली तयार करून तिची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. तिचे पालन होते की नाही, हे डोळ्यात तेल घालून तपासावे लागणार आहे. शिवाय, आता सगळीकडेच खासगी शिकवणी वर्ग सुरू झालेले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे एकमेकांच्या संपर्कात येणे, एकत्रित बसणे-उठणे वाढणार आहे. कोरोनाबाबत सूचना सर्वांपर्यंत पोहोचल्या असल्या तरी त्या प्रत्यक्ष कृतीत उथरता आहेत, की नाही, हे पाहायला हवे. ‘त्यामुळेच सामाजिक जबाबदारीचे भान आणि स्वतःची काळजी स्वतः घेणे व आपला स्वतःसह इतरांनादेखील उपद्रव होणार नाही, अशी काळजी घेत राहणे आवश्‍यक आहे. कोरोनाची साथ ओसरत असली तरी ती पूर्णपणे गेलेली नाही, हे विसरता कामा नये.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com