बिंब-प्रतिबिंब: पडसाद चीनच्या कुरापतीचे...

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (ता. १४) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून सुरू झालेला अमली पदार्थांचा मुद्दा गाजला. भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपचे खासदार रवीकिशन यांनी लोकसभेत हा मुद्दा मांडला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून (ता. १४) सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून सुरू झालेला अमली पदार्थांचा मुद्दा गाजला. भोजपुरी सुपरस्टार आणि भाजपचे खासदार रवीकिशन यांनी लोकसभेत हा मुद्दा मांडला. सुशांतसिंह आत्महत्येचा तपास अमली पदार्थांच्या तस्करीपर्यंत येऊन पोहोचला असून एनसीबीकडून योग्यरीत्या तपास सुरू आहे. केंद्राने या प्रकरणात लक्ष घालून बॉलीवूडसह देशभरातील अमली पदार्थाचे रॅकेट उद्‌ध्वस्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर जया बच्चन यांनी ‘चित्रपटसृष्टीतील काही लोक बॉलीवूडविषयी वाटेल ते बोलत आहेत. ज्या बॉलीवूडमध्ये राहून तुम्ही नाव कमावले, त्याच बॉलीवूडला तुम्ही नाव ठेवताय. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण बॉलीवूडचे नाव खराब होत आहे’, असे सांगितले. जया बच्चन यांच्या बोलण्याचा रोख कंगना राणावतकडे होता. कंगनानेही त्यावर ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले. त्यामुळे हा मुद्दा समाजमाध्यमावरही चर्चेत होता.

भारत आणि चीन यांच्यात सीमा रेषेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत भाष्य केले. लडाखमधील भारताची तब्बल ३८ हजार चौरस किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीनने बळकावली आहे. १९६३मध्ये पाकिस्तानने पाकव्याप्त काश्‍मिरातीलही ५,१८० चौरस किलोमीटरचा भूभाग बेकायदारीत्या चीनकडे सोपवल्याची धक्कादायक माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. सीमा प्रश्‍नाच्या माध्यमातूनच या मुद्द्यावर तोडगा निघू शकतो, असे ते म्हणाले. राजनाथ सिंह यांच्या या भाषणाची समाजमाध्यमांवर चर्चा सुरू होती. 

१५ सप्टेंबर हा भारतरत्न एम. विश्‍वेश्‍वरय्या यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभरात ‘अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने अभियांत्रिकी कौशल्य, त्यातून निर्माण झालेला देश, देशाचा झालेला विकास हे सर्व काही देशातील अभियंत्यांच्या प्रयत्नांचे आणि कार्याचे फलित आहे. अभियंता दिनाच्या पार्श्‍वभूमीवर समाज माध्यमांवर नेटकरी एकमेकांना शुभेच्छा देत होते. त्यानिमित्ताने #EngineersDay हा हॅशटॅग चर्चेत होता.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या