डेन्मार्कमध्ये स्वयंचलित रोबोटद्वारे ‘स्वॅब’ची चाचणी

dainik gomantak
शनिवार, 6 जून 2020

वास्को-मांगोरहिल येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याने गोव्यात भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी अनेक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आहे

लेखिका - प्राची नाईक

ज्या गतीने जगभरात कोविड १९ रुग्णांची संख्या वाढत आहे ते पाहता पुढील काही महिने मास्क घालणे आणि सुरक्षित सामाजिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विषाणूसोबत जगण्याशिवाय आता पर्याय नसला तरी नवनविन संशोधने हे पुढील काही महिने किंवा वर्षाचे आमचे आयुष्य सहज करेल यात काहीच शंका नाही. सर्व देशांसमोर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्‍न गंभीर आहे. सध्या दिवसाला जास्तीतजास्त लोकांची चाचणी करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. वास्को-मांगोरहिल येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याने गोव्यात भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी अनेक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या लोकांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न उपस्थित झाला आहे. चाचणीवेळीही स्वॅब घेताना आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. यावर उपाय म्हणून डेन्मार्कमधील संशोधकांनी आता पूर्णपणे स्वयंचलित रोबोट विकसित केला आहे जो चाचणीला आलेल्या लोकांचा स्वॅब घेऊ शकतो. जेव्हा एखादा रुग्ण आपले ओळखपत्र सादर करतो तेव्हा हा रोबोट एक सॅम्पलिंग किट तयार करतो आणि त्याची स्वॅब चाचणी करतो. हा रोबोट घश्याचा उजवा भाग शोधण्यासाठी कॅमेऱ्याचा वापर करतो. या रोबोटमुळे आरोग्य कर्मचारी विषाणूच्या संसर्गापासून बचावतोच आणि वरून चाचणीत काही चुकाही होत नाहीत. अशाप्रकारे अनेक कोविड १९ ग्रस्त देशांमध्ये राष्ट्रीय, संस्थात्मक, संघटनात्मक तसेच वैयक्तिक पातळीवर उदयास येणारे विपुल, सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण शोध पाहायला मिळत आहेत. हेच शोध आम्हाला या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास मदत करतील.
या दिवसांत सगळ्यात महत्त्वाचे जे साधन आम्ही वापरायला हवे ते म्हणजे मास्क. प्रत्येक जण आपली सोय आणि ऐपतीनुसार मास्क घेत आहे. काहीजण घरी बनवलेले मास्क वापरत आहेत. मास्क वापरण्याची ही सवय प्रत्येकाने करून घेतली पाहिजे. श्‍वसनास होणारा त्रास यामुळे काहीजण मास्क घालणे टाळतात, हे धोक्याचे आहे. ज्यांना मास्क घालण्याचा कंटाळा आला आहे त्यांच्यासाठी इस्त्रायलमधील इस्तंबूलमध्ये एका थ्रीडी कंपनीने एक आगळा-वेगळा मास्क तयार केला आहे. हे मास्क टूल डोक्याच्या मागे लावले जावू शकते. जेव्हा गरज नसेल किंवा खाते वेळी रिमोटच्या सहाय्याने किंवा आपोआप हा मास्क उघडला जावू शकतो. इतर मास्कमुळे कान आणि नाकास होणारा त्रास अशा मास्कच्या वापराने दूर होऊ शकतो.

 

संबंधित बातम्या