ऑनलाईन पौरोहित्य, चतुर्थीही घरगुती

Suhasini Prabhugaokar
बुधवार, 22 जुलै 2020

व्यावसायिकांच्या तयारीत भटजीपासून महिला स्वयं सहाय्य गटापर्यंत यंदा बदलाला सामोरे जावे लागणार आहे. त्या बदलातून ऑनलाईन पौरोहित्याचे धडे देण्यास प्रारंभ झाला आहे. चतुर्थीत गोव्यात भटजीना महत्त्व अधिक असते. भटजींविना चतुर्थीची पूजा आटोपणाऱ्यांची संख्या वाढती असली तरी भटजींची पुजेसाठी संध्याकाळी उशिरापर्यंत उपाशीपोटी वाट पाहाणारेही कमी नाहीत

लेखिका - सुहासिनी प्रभुगावकर

श्रावण महिना म्हणजे सणा-व्रतांचा मास. गोव्यात गांवोगावी सणा-व्रतांच्या परंपराही आहेत. श्रावण उगवतानाच गोमंतकीयांना यंदा चतुर्थीचे (चवथी) वेध लागले आहेत. चतुर्थी म्हणजे आनंदाचा सण कोविडच्या धास्तीत तो यंदा साजरा करावा लागणार असल्यामुळे गावी कसे जायचे? साफसफाई कशी करायची? भटजींना बोलवायचे का? विसर्जन एकएकट्याने करायचे की गटागटांतून जायचे? इत्यादी प्रश्‍न जनसामान्यांसमोर आहेत. प्रामुख्याने, मागील चार महिने घरीच असलेल्या ज्येष्ठांना गावातल्या घरच्या गणपतीची चिंता लागलेली आहे. सरकारने आतापर्यंत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असती तर नियोजन करता आले असते असा सूरही व्यक्त होत आहे. सरकार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांवर अवलंबून राहीले तर मागील तीन महिन्यांचा अनुभव पाहाता चतुर्थी झाली तरी ती येण्याची चिन्हे नाहीत. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र चांगली आगेकूच करीत आहे, सावधानतेने आधीच पाऊल टाकल्यामुळे मार्गदर्शक तत्त्वांची परिपत्रके गावागांवात पोचणेही शक्य झाले आहे. अर्थात, गोव्यातही वैयक्तिक, व्यावसायिक पातळीवर चतुर्थीच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे.
व्यावसायिकांच्या तयारीत भटजीपासून महिला स्वयं सहाय्य गटापर्यंत यंदा बदलाला सामोरे जावे लागणार आहे. त्या बदलातून ऑनलाईन पौरोहित्याचे धडे देण्यास प्रारंभ झाला आहे. चतुर्थीत गोव्यात भटजीना महत्त्व अधिक असते. भटजींविना चतुर्थीची पूजा आटोपणाऱ्यांची संख्या वाढती असली तरी भटजींची पुजेसाठी संध्याकाळी उशिरापर्यंत उपाशीपोटी वाट पाहाणारेही कमी नाहीत. तर यंदा भटजीही आॅनलाईन होणार म्हणजे तुमच्या मोबाईल, लॅपटाॅवरून पूजा सांगताना दिसणार आहेत. एकापेक्षा अनेक घरी पूजा करणारे कोविडच्या संसर्गाचे ‘सुपरस्प्रेडर’ होऊ शकतात. त्याची कल्पना त्यांना व भक्तांना आली आहे. अशा परिस्थितीत आॅनलाईन होणे कठीण नाही. भटजी मोबाईल वापरत असल्यामुळे काम सोपे होऊ शकते. ज्यांच्याकडे पूजा करायची असते त्यांची यादी भटजींकडे असते, त्यांचे मोबाईल क्रमांकही असतात. भटजीनी आपल्या आवाजात पूजेचा व्हिडिओ, आॅडिओ तयार करून पूजेला जाणाऱ्यांकडे पाठवायचा, खुलेआम दक्षिणा, गणेश पूजनासंदर्भात सल्ला द्यायचा.
भटजी आॅनलाईन पूजा सांगणार असल्यास भक्तांना त्यांच्या सोयीनुसार ती करता येईल. घरी न आलेल्या भटजींना व्हिडिओ मिळाला की दक्षिणा चतुर्थीआधीच त्यांच्या खात्यावर जमा केल्यास त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणीत होऊ शकतो. गणेशपूजन भटजींना नेता येणार नसल्यामुळे त्याऐवजी दक्षिणेची ज्यादा रक्कम देणे शक्य आहे.
कोविडने पुरोहित, भटजींच्या व्यवसायावर संकट आणले असल्यामुळे त्यांना चतुर्थीपूर्वी आधार करणे योग्य होईल.
श्रावणातील गोकुळाष्टमी तसेच अन्य व्रतांवेळीही भटजीना आॅनलाईन पौरोहित्याचा आपल्या यजमानांसाठी लाभ देता येईल. कमी ठिकाणी जाणाऱ्या भटजींनासुद्धा स्वतःच्या, कुटुंबियांच्या व यजमानांच्या सुरक्षेसाठी आॅनलाईन पूजा सांगणे उपयुक्त ठरेल.

चतुर्थीही सबुरीने
चतुर्थी म्हटले की गोव्यात घरोघरी गणपती. गणेशमूर्ती आणण्यापासून तिचे विसर्जन करेपर्यंत, बाजारहाट व अन्य कारणांसाठी सार्वजनिक ठिकाणी जावेच लागते. चित्रशाळांतून गणेशमूर्ती घरोघरी पोचवण्याची योजना राबवता येईल का? बाजारहाट आता आॅनलाईन होऊ शकते, फुले, दुर्वा, माटोळी, पूजासाहित्याचा त्यात समावेश व्हायला हवा. युवकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, सरकारने त्यांना सहाय्य करता येईल म्हणजे बाजारातील गर्दी कमी होईल.
घरोघरी चतुर्थी साजरी करताना मर्यादा येणार आहेत. चौघांचा एक गणपती असल्यास सर्वांना एकत्र राहाता येईल का, तेवढे मोठे घर आहे का? याचा विचार व्हावा व त्यातून घरगुती गणेश चतुर्थीच्या नियोजनाला आकार द्यावा. गावोगावी चतुर्थीत होणाऱ्या स्पर्धा आॅनलाईन पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात, आरतीचे फडही आॅनलाईनवर रंगणे शक्य आहे. चतुर्थीत एकमेकांच्या घरी गणपती पाहायला जाणे टाळलेले बरे शिवाय विसर्जनावेळी समुहाने एकत्र येण्याच्या प्रथा, परंपरांना फाटा देऊन वैयक्तिकरित्या विसर्जनाची जबाबदारी घेता येईल.
चतुर्थी शिस्तीत घरगुती व्हावी यावर जास्त भर द्यावा, चतुर्थीतील फराळ, प्रसाद देण्याघेण्याच्या प्रथेला मुरड घालणेही गरजेचे. फटाके तर बासनातच गुंडाळून ठेवावे म्हणजे श्वसनाचे त्रास होणार नाहीत. जेवढे चतुर्थीत आपण शिस्तबद्धरित्या वागणार आहोत तेवढे कोविड रुग्ण संख्येवर नियंत्रण येऊ शकते.

संपादन हेमा फडते

संबंधित बातम्या