थरार संशोधनाचा : शोध खाजन जमिनींच्या निर्मात्यांचा 

डॉ. नंदकुमार कामत
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

माझा जन्म मांडवी खाडीच्या काठावर पणजी शहराच्या सीमेवरील आल्तीनो टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या ‘फोंताईन्यश’ या विभागात झाला. तेथून भरती ओहोटीचा प्रभाव असलेल्या खाजन जमिनी व प्राचीन ‘लघुमोरंबिका’ अथवा पोर्तुगीजांनी नामकरण केलेल्या ‘मोरंबी द पे क्वेनो’ ग्रामसंस्थेची मीठागरे हाकेच्या अंतरावर होती. 

माझा जन्म मांडवी खाडीच्या काठावर पणजी शहराच्या सीमेवरील आल्तीनो टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या ‘फोंताईन्यश’ या विभागात झाला. तेथून भरती ओहोटीचा प्रभाव असलेल्या खाजन जमिनी व प्राचीन ‘लघुमोरंबिका’ अथवा पोर्तुगीजांनी नामकरण केलेल्या ‘मोरंबी द पे क्वेनो’ ग्रामसंस्थेची मीठागरे हाकेच्या अंतरावर होती. 

हिवाळा संपल्यावर या भागातून दुर्गंधी यायची. कारण तिथे शेवाळ कुजून उग्रवास पसरायचा. ‘क्षारजनक’ म्हणजे क्षार वा मीठ असलेल्या जमिनी त्या ‘खाजन’ जमिनी. आयुष्याची तीस वर्षे या खाजन जमिनींच्या संशोधनासाठी, संरक्षणासाठी व संवर्धनासाठी खर्च केली. अजूनही खाजन जमिनींच्या निर्मात्यांचा नेमका शोध चालूच आहे. जवळजवळ संपूर्ण कोकणपट्टीत रत्नागिरी ते मंगलोर व थेट मलबारपर्यंत सखोल भागात ‘क्षारजनक’ जमिनींचे अस्तित्व आढळते. महाराष्ट्रात या जमिनींना ‘खारभूमी’, गोव्यात ‘खाजन’ कर्नाटकात ‘गज्जनी’ तर दक्षिणेत केरळ राज्यात ‘चेम्मीन कटू’ म्हणून ओळखले जाते. या सर्वच क्षारयुक्त शेतजमिनींचे निर्माते कोकणातील पहिले वहिले संघटित शेतकरी होते.

खाजन जमिनींच्या गोव्यातील आदिम निर्मात्यांचा शोध घेताना मला स्पष्ट दिसून आले की अतिशय कष्टकरी व अनुभव समृध्द अशा पुरापाषाणयुगीन (पॅलीओथिलीक) ऑस्टीक मानववंशाकडे नाते सांगणाऱ्या ‘गावडे’ आदिवासींकडे या जमिनींचे सर्व पारंपरिक ज्ञान, तंत्रज्ञान अजूनही शिल्लक आहे. अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील या आदिम रहिवाशांचे महान कार्य म्हणजे अक्षरशः चिखलातून उभे केलेले बांध व त्यांना जोडणाऱ्या लहान मोठ्या खाड्या. वर्षानुवर्षे कष्टत राहून बदलत्या हवामानाला तोंड देत, साप, सुसरींचा सामना करीत अत्यंत चिकट चिखलात गळ्यापर्यंत गाडून घेऊन अनावश्‍यक झाडे-झुडपे नष्ट करून ‘गावडे’ समाजातील प्रज्ञावंत कामगारांनी खाजन जमिनींची निर्मिती केली.

सर्वात पुरातन खाजन शेतजमिनी मांडवी खाडीच्या परिसरात आहेत. व इथेच तीन हजार वर्षे पुरातन मृदा संधारणविषयक पारंपरिक तंत्रज्ञान टिकून आहे. मांडवी व झुआरी या क्षारयुक्त खाड्यांना जोडणारा एक चिंचोळा प्रवाह आहे. तो कुंभारजुवे बेटापासून सुरू होतो व आगशी-कुठ्ठाळी परिसरात झुआरी खाडीत विसर्जित होतो. या वेड्यावाकड्या प्रवाहाला दोन्ही काठावर भक्कम बांध-बंदिस्ती करून चिंचोळ्या पण नौकानयनक्षम कालव्याचे स्वरूप देण्याचे काम तिसवाडीतील खोर्ली, करमळी, आजोशी, मंडूर, डोंगरी, नेवरा, मेरकुरी व फोंडा तालुक्यातील भाणस्तारी, भोम, कुंडई, मडकई, सालसेतमधील रासई, कुठ्ठाळी इथल्या आदिम गावडा तंत्रज्ञांनी केले. त्यासाठी वापरल्या गेलेल्या पारंपरिक तंत्रज्ञानात व हत्यारांत कसलाही फरक गेल्या तीन हजार वर्षांत झालेला नाही. यात लोखंडी व लाकडी साधनांचा समावेश होतो.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे खाजन जमिनींच्या या निर्मात्यांकडे असलेले भरती-ओहोटीचे व पर्जन्यमानाचे व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याचे ज्ञान. बांध बांधतानाही सगळीकडे त्यांची उंची सर्वात मोठ्या भरतीच्यावेळी जी पाण्‍याची पातळी असते त्याच्या सहा मीटर्स उंच ठेवण्याची दक्षता घेतली गेली. सुमारे दोन हजार वर्षे म्हणजे गोव्यात कदंब राजवटीची सत्ता प्रस्‍थापित होईपर्यंत सगळीकडे पूर्ण चिखलाचे बांध अंतर्गत खाजन शेतजमिनीचे रक्षण करीत असत. राष्ट्रकुट सम्राटांच्या काळात मोठ्या प्रमाणावर जांभ्या दगडांचा वापर सुरू झाला. हा दगड फोडून ताशीव आकार देण्यात पारशी व अरब तंत्रज्ञ फार कुशल होते. इसवी सनाच्या आठव्या शतकापासून समुद्राच्या लाटांपासून होणारी धूप थांबवण्यासाठी गोव्याच्या किनारी भागात चिऱ्यांचा वापर सुरू झाला. नंतर हे ताशीव दगड खाजन बांधांची बाहेरील बाजू भक्कम करण्यासाठी वापरण्यात येऊ लागले. त्यामुळे इ.स. १००० ते १५१० या काळात पुन्हापुन्हा दुरुस्त कराव्या लागणाऱ्या खाजन बांधांची जांभ्या दगडांचा म्हणजे ताशीव लाल-नारिंगी चिऱ्यांचा वापर करून पुनर्बांधणी झाली. त्‍यामुळे खाजन जमिनींच्या मूळ निर्मात्यांच्या पारंपरिक ज्ञानात भर पडली. 

‘आशियातील एक आश्‍चर्य’ समजला जाणारा तब्बल तीन किलोमीटर लांबीचा ताजमहालाएवढा पुरातन, शिवपूर्वकालीन, पणजी व रायबंदर या दोन बिंदूंना जोडणारा ‘सरदार लिन्हारेस कॉजवे’ (पोंत दे लिन्हारेस) इ.स. १६३२ साली पोर्तुगीज अभियंत्यांनी शेकडो गावडे तंत्रज्ञाच्या मदतीने हाती घेतला व दोन वर्षात पूर्ण केला. गावडा पारंपरिक तंत्रज्ञ खाजन बांध तयार करताना सुपारीचे लांब बळकट सोट व भक्कम बांबू वापरीत. हे वजन टाकून चिखलात खोलवर गाडले जात. मांडवी व झुआरी या दोन्ही खाड्यांच्या प्रवाहात एवढा गाळ आहे की टणक दगड या खाड्यांच्या तळाखाली वीस मीटर्स खोलीवरच सापडतो.

लिन्हारेश पुल तब्बल ४१ चिरेबंदी कमानींवर (रोमन आर्कस) उभा आहे. ही प्रत्येक कमान ज्या खांबापासून सुरू होते तो खांब चिखलात खोल गाडल्या गेलेल्या ‘माट्टी, ‘घोटींग’ व ‘सागवान’ या जातीच्या वृक्षांच्या ओंडक्यांच्या मोळींवर उभा आहे. ही गाडलेली प्रत्येक मोळी लोखंडी साखळदंडाने जखडलेली आहे. ह्या प्रचंड मोळ्या तयार करून त्या खोल चिखलात गाडण्यासाठी पोर्तुगीज अभियंत्यांनी गावडा तंत्रज्ञांची मदत घेतली असावी. कारण फक्त त्यांच्याकडेच हे तंत्रज्ञान होते. आजही खाडीतून एखादी नौका, बार्ज वगैरे वेगाने गेल्यास तयार होणाऱ्या ज्या लाटा खाजन बांधावर धडाधड आपटतात त्यामुळे निर्माण होणारी भगदाडे बुजवण्यासाठी तीन हजार वर्षे पुरातन पारंपरिक तंत्रज्ञान वापरले जाते.

छोट्या भगदाडांना ‘भोम’ व मोठ्या दोन ते पन्नास वा जास्त मीटर्स लांबीच्या भगदाडांना ‘खांवटे’ म्हटले जाते. जे ‘भोम’ दुरुस्त करण्यात निष्णात होते. त्यांना ‘भोमकार’ म्हटले जायचे. आजही अनेक ‘भोमकार’ कुटुंबात खाजन बांध-बंदिस्तीचे ज्ञान टिकून आहे. बांंधांच्या वार्षिक दुरुस्तीसाठी ‘थोर’, ‘चोनोय’ आणि ‘कुपतो’ या पर्यावरणपूरक पध्दती आजही वापरल्या जातात. बांधांना उभा छेद घेऊन जुना भुसभुशीत चिखल काढून, नवा थर देऊन तो घट्ट चेपून डागडुजी करणे त्याचबरोबर ‘थोर’ (थर) म्हणजे एक थर काळसर चिखलाचा, एक थर गवत अथवा पालापाचोळ्याचा देऊन बांधांची धूप कमी करणे हे सर्व उपाय स्वस्त, बिनखर्ची व पूर्णतः पर्यावरणपूरक होते. आज गोवा सरकारच्या एकाही कंत्राटदाराकडे हे ज्ञान नाही. सिमेंट, कॉंक्रीट ओतून हे खाजन बांध सांभाळता येत नाहीत. कारण लगेच गंज लागून क्षारतेमुळे ठिसूळ होतात.

खाजन जमिनीच्या निर्मात्यांनी परिसरातूनच सगळे निर्माण केले. गोव्यात समुद्रविज्ञान संस्था गेली ५०वर्षे आहे. पण या मान्यताप्राप्त संस्थेलाही खाजन जमिनीची अभियांत्रिकी ज्ञात नाही. या खाजन जमिनीत भरती-ओहोटीचे आत घुसणारे पाणी नियंत्रित करण्यासाठी ‘मानशी’ म्हणजे लाकडी झडपा बसवलेल्या असतात. या झडपा खडकाच्या विशिष्ट कोंदणात बसवतात.

प्रत्येक ‘मानस’ फार विचारपूर्वक अशा जागी तयार केली जाते की तिथून खाडीच्या खारट पाण्याचे व्यवस्थित नियंत्रण होऊन मासेमारीलाही वाव मिळावा. तीन हजार वर्षापूर्वी भातपिकाबरोबरच खाजन जमिनींच्या गावडा निर्मात्यांनी मानशीच्या झडपा उघडतेवेळी बाहेर जाण्यास धडपडणारे काळुंदरे, शेवट्यासारखे चविष्ट मासे पकडण्यासाठी चतुरपणे जाळे लावण्याची व्यवस्था शोधून काढली होती. या मासळीला ‘पावळेचे नुस्ते’ म्हटले जाते तर संथ पाण्यातील मासळीला ‘पोंयचे नुस्ते’ म्हणण्याची प्रथा आहे. गोवा मुक्तीनंतर ग्रामसंस्था मोडकळीला आल्या.

गावडा तंत्रज्ञाची व समुदायाची ‘भौस’ ही संस्था नव्या कायद्यांमुळे निष्प्रभ झाली. सरकारने कुळ-संघटना स्थापून खाजन जमिनीत मासे पिकवायला प्रचंड प्रोत्साहन दिले. त्यामुळे खाजन जमिनींची नासधूस सुरू झाली. मासेमारीचे हक्क १९६५ ते १९७५ काळात काही हजारांची बोली लावून यशस्वी लिलावदार वा मासेमारी ठेकेदार घेत. मासे महागले. लोकसंख्या वाढली, शहरीकरण वाढले, पर्यटन वाढले. १९७५ नंतर मासेमारीचा लिलाव लाखांच्या घरात गेला. आज प्रतिवर्षी बोली लावून १२५ कुळ संघटना ६०० मानश्‍यांच्या मासमारी हक्कांचा लिलाव डिसेंबर- जानेवारीत करतात. या लिलावांची रक्कम आता ५०-६० लाखांपर्यंत गेली आहे. तीन हजार वर्षे ज्यांनी गोव्याच्या १० तालुक्यांतील १०० गावांत तब्बल २० हजार हेक्टर्स खाजन शेतजमिनींची स्वयंपोषित ग्रामीण अर्थसंस्कृती पोसली ते खाजन जमिनीचे मूळ निर्माते भूहीन झाले, परागंदा झाले व मागाहून आलेल्या वसाहतकारांकडून बाजूला फेकले गेले. तीस वर्षे संशोधन केल्यावर आज धक्का बसतो की गोवा सरकारने या जमिनीतील तीन हजार वर्षे पुरातन, क्षारप्रतिरोधक पारंपरिक भाताची बियाणी संपवून टाकली. या बियाण्यांची नावे होती - दामगो, बाबरी, धोडीग, कोचरी, पाटणी, कोरगुट, आसगो, केंदाळ, सोट्टी, गिरसोळ, शिटो, नेरमार, मुडगो, शिरडी, बेलो, नेशवान, डोंगरी, वोलय, चागार, कुसळगो, रुणगा, पाणयो, ओडुस्को, पाणीगो. आज गोव्यातील खाजन जमिनी पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

Edited By - Prashant Patil

संबंधित बातम्या