टंगळ-मंगळ: चादर, टुवाल आणि उशी

विजय कापडी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

पण, एक मात्र आहे, ‘चादर, टुवाल आणि उशी’ या तुम्हा आम्हा भारतीयांच्या आत्यंतिक गरजेच्या वस्तू कधीच नव्हत्या. म्हणजे रोटी, कपडा, मकान आणि मोबाईल, तो मात्र हवाच हवा.

असं खात्रीपूर्वक समजत की, आपल्या केंद्रीय रेल्वे मंडळानं सध्या एका गोष्टीबद्दल गंभीरपणे विचार करायला घेतला आहे. सध्याच्या ‘कोविड-१९’चा प्रादुर्भाव कमी झाल्यावर पुन्हा एकदा रेल्वेगाड्या सुरू करायच्या. मात्र, त्यातल्या वातानुकूलित डब्यात एरवी उपलब्ध केल्या जात असलेल्या, ‘चादर, टुवाल आणि उशी’ देण्याच्या सुविधा तात्‍पुरत्‍या का होईना, पण बंद करायच्या. त्यामागचं एकमेव कारण म्हणजे या वस्तूंची कायमस्वरुपी स्वच्छता ठेवणं काहिसं जिकिरीचं काम आहे.

पण, एक मात्र आहे, ‘चादर, टुवाल आणि उशी’ या तुम्हा आम्हा भारतीयांच्या आत्यंतिक गरजेच्या वस्तू कधीच नव्हत्या. म्हणजे रोटी, कपडा, मकान आणि मोबाईल, तो मात्र हवाच हवा. पण, ‘चादर टुवाल आणि उशी’ यांच्या शिवाय प्रवासात तर सोडाच पण एरवीसुद्धा आपलं काही काही अडत नाही. चादर ही वस्तू रात्री झोपी जाण्याच्या आधी अंगावर घेण्याची एक नगण्य वस्तू. चादर अंगावर असली काय वा नसली काय, झोपेत व्यत्यय का बरं यावा? अर्थात हिवाळ्याच्या दिवसात पायाशी चादर असलेली बरी, असा विचार करणारे अनेक असतात. पण, म्हणून काही ते लगेच चादरीत अंग घुसवतील म्हणता? मुळीत नाही. हा आपल्याकडच्या खेडेगावात सकाळच्या प्रहरी काहीजण अंगाभोवती चादर गुंडाळून वावरताना दिसतात नाही, असे नाही. आपल्याकडचा महिलावर्ग नाही का अंगावर नाईटी चढवून सर्वत्र वावरत असतो. तोच प्रकार चादरीचा दुसरा एक उपयोग म्हणजे टुवालासारखा तोंड पुसण्यासाठी करणारेही असतात. अर्थात अशावेळी आपल्याकडं कुणी पाहत तर नाही ना, याची खबरदारी घेतली की झालं.

टुवाल ही केवळ आंघोळ उरकून न्हाणीघरातून बाहेर येण्याच्या वेळच उपयोगी अशीच वस्तू. एरवी पाऊस नसेल तर छत्रीची आठवणसुद्धा होऊ नये तोच प्रकार टुवालाच्या बाबतीतही पाहायला मिळतो. नव्याण्णव टक्के पुरुषवर्ग टुवाल न घेताच न्हाणीघरात प्रवेश करतात आणि आंघोळ उरकल्यावर ‘टुवाल- टुवाल’ म्हणून बायकोला हाका मारत असतात. घरबांधणीच्या वेळी दगड, विटांचं घमेल. डोक्यावर घेणाऱ्या मंजूर बायकांना मात्र टुवालाचा चांगला उपयोग होतो, असं दिसतं. आकारात टुवाल मोठा असेल, तर त्याचा चादरीसारखा उपयोग करणारेही असतात.

आता राहता राहिली उशी. उशीच्या बाबतीतलं एक सर्वमान्य सत्य म्हणजे उशी असली काय वा नसली काय, कसलाच फरक जाणवत नसल्याचं सांगणारे कित्येक असतात. अर्थात काहीचं एका उशीशिवाय भागत नाही, असेही असतात. काहींना डोक्याशी एक उशी दुसरी पायाशी आणि तिसरी पोटाशी घेतल्याशिवाय निद्रादेवी प्रसन्नच होत नाही, म्हणतात. काही घरात उशींची संख्या आणि घरातल्या माणसांची संख्या ही जुळतच नाही. माणशी एक उशी ही सोय काहींच्या घरात नसते. मग अशावेळी शेजारच्या उशीवाल्याला बऱ्यापैकी झोप लागल्याचं दिसताच हळूच त्याच्या डोकीखालील उशी अलगद खेचून आपल्या डोकीखाली ठेवण्याचा प्रकारही घडत असतो. बाकी काहींना उशी म्हणून सार्वजनिक टेलिफोनखात्याची फोन डिरेक्टरीही चालते. घरातल्या लहानग्यांच्या बाबतीतला उशीचा उपयोग म्हणजे आजूबाजूला पालकमंडळी नसलेली पाहून एकमेकांच्या अंगावर उशी फेकून मारण्याचा खेळ सुरू करायचा. या उशीच्या फेकाफेकीचा कडेलोट म्हणजे आतला कापूस बाहेर यायला लागला आणि तो हवेत मस्त तरंगायला लागला की, खेळाला मौज आलीच पाहिजे.

बाकी एक मात्र खरं की, चादर आणि टुवालच्या तुलनेत उशीला पाण्याच्या स्पर्श होणं ही बाब दुरापास्‍तच म्हणावी लागेल. उशीला पाणी लागत नसेलही, पण काहींच्या घरातल्या उशी तेलात बुडवून काढल्यासारख्या काळ्याकुट्ट आणि भयंकर दिसत असतात. पण, अशा उशी डोक्याखाली घेतल्या तर मस्त झोप लागल्याशिवाय राहत नाही. शेवटी उशी आणि झोप यांचा अर्थातर्थी संबंधच नाही, हेच खरं. यापुढं मात्र काहीजण चादर, टुवाल आणि उशी यांचा एक अतिरिक्त सेट हाताशी ठेवतील. अहो, रेल्वेनं सुविधा बंद केली म्हणून अंगात रुळलेली सवय कुठली जाणार?

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या