प्रासंगिक: ऑक्सिमीटर ठरणार ‘आप’चा प्राणवायू

सुहासिनी प्रभुगावकर
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कोविड पॉझिटिव्ह निघाल्यामुळे थोडासा विश्राम वाट्याला आलेला. वाढत्या कोरोना रुग्णांसाठी साधनसुविधा निर्माण करण्याकरीता कसोटीच्या काळात आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची धावपळ सुरू आहे. 

अचूक, बोथट तीर सोडण्यात काँग्रेस पक्ष गुंतलेला असतानाच अजूनही गोव्यात पाय धड न रोवलेल्या आम आदमी पार्टीने ‘गोवन्स अगेन्स्ट कोरोना’ ही मोहीम हाती घेतलेली आहे. या मोहिमेतून आम आदमी पार्टीला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी छोटासा ऑक्सिमीटर प्राणवायू देण्याची चिन्हे आहेत. कोरोनाच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रकारे जागृती झाली, ती योग्यप्रकारे सर्वसामान्यांपर्यंत शिस्तबद्धरित्या पोचली असती तर गणेश चतुर्थीनंतर झालेली रुग्णवाढ, दगावणाऱ्यांची रोखली गेली असती.

लाॅकडाऊननंतर अनलॉक होण्याचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आर्थिक, मानसिक, शारिरीक हानीत होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या वेदनावर फुंकर घालण्याचा हाच कालावधी आहे आणि नेमकी तीच संधी हेरून आम आदमी पार्टीने गोवा अगेन्स्ट कोरोना मोहीम हाती घेतली असावी. चतुर्थीआधीच आम आदमी पार्टीने ऑक्सिमीटर ची ओळख सर्वसामान्यांना करून देण्याचे काम केले असून आता प्रात्यक्षिकांना प्रारंभ करताना भावी राजकारणावर आम आदमी पार्टीचा डोळा असल्यास नवल नको. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाजपच्या लाटांचा सामना करीत, झुंजत आपआपल्या राज्याची धुरा सांभाळत आहेत. दोन्ही राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक पण दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी नव्या वाटांचा शोध घेत कोरोनाशी लढत दिल्यामुळे त्यांना जगातही लोकप्रियता मिळाली आहे. देशाची आर्थिक राजधानी, राजकीय राजधानी कब्जात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न जारी नाहीत असे नव्हे परंतु राजकारणाला शह देत महाराष्ट्र, दिल्लीची वाटचाल सुरू झाली आहे. 

या दोन्ही राज्यांचा आदर्श इतर राज्यांनी घ्यायला हवा, राजकारणापल्याड डोकावायला हवे. ज्यावेळी अन्य राज्यांनी दिल्लीचे चांगले धडे गिरवण्यास नकार दिला त्यावेळी राज्यात अजूनही रांगणाऱ्या आम आदमी पार्टीच्या गोवा शाखेने जनतेपर्यंत पोचण्यासाठी ऑक्सिमीटरचा आसरा घेतला आहे.

ऑक्सिमीटर ची ओळख कोरोना प्रतिबंध, प्रतिकारासाठी काम करणाऱ्या डॉक्टर्सनी, आम आदमी पार्टीने गोमंतकीयांना करून दिली तरी घराघरांत ऑक्सिमीटरद्वारे शरिरातील प्राणवायूच्या प्रमाणाची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्याचे आव्हान मोठे आहे. वास्तवात, सरकारने गेल्या काही महिन्यात केलेल्या जनजागृतीवेळी ऑक्सिमीटर चे महत्त्व नागरीकांपर्यंत पोचवायला हवे होते पण जागृतीच्या नावाने तांदूळ व अन्य शिधा मतदारांपर्यंत त्याही ठरावीक मतदारसंघात पोचवण्याची कामगिरी तेवढी झाली. आम आदमी पार्टीने सरकारचे कच्चे दुवे ओळखून ऑक्सिमीटर लोकांपर्यंत नेण्याचे केलेले नियोजन त्या दृष्टीने कौतुकास्पद म्हणावे लागेल. शिस्तबद्ध नियोजनातून विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिकापर्यंत पाऊल ठेवण्याचा राजकीय हेतू त्यामुळे काही अंशी नक्की साधला जाऊ शकतो.

उच्च शिक्षणाला सध्या महत्त्व आले आहे आणि भविष्यातील महामारीचे इशारे जागतिक आरोग्य संघटनेने देणे चालूच ठेवल्यामुळे ज्ञान, शिक्षण भावी विधानसभेचा गोव्यासारख्या राज्यात आम आदमी पार्टीने कळीचा मुद्दा बनवल्यास पार्टीला दाद देणारेही मिळणारच नाहीत असे नव्हे. श्री. केजरीवाल उच्चशिक्षीत, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करणारे, माजी शासकीय अधिकारी असल्यामुळे प्रशासनाचा अभ्यास असलेले आणि त्यामुळेच त्यांच्याकडे दिल्लीची धुरा दुसऱ्यांदा सोपवणे दिल्लीतील मतदारांना उचित वाटले असावे. गोव्यात आम आदमी पार्टीचे प्रदेश पातळीवरील अध्यक्ष, कार्यकारिणी, सरचिटणीसांपर्यंत बरेच उच्चशिक्षीत कार्यकर्ते आहेत, निस्वार्थीपणे कामकाजाला वाहून घेतलेले नेतेही आहेत. या नेत्यांना, कार्यकर्त्यांना 

ऑक्सिमीटरद्वारे राज्यांतील जनतेत स्थान मिळवायचे असेल तर ऑक्सिमीटर वर प्राणवायू दाखवताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे ‘दो गज दूरी’ तसेच घरातून बाहेर पडतानाच मास्क वापरा, मास्क गळ्यात लोंबकळत ठेवू नका नाकापर्यंत चढवा, परिसर स्वच्छ ठेवा, सॅनिटायझरचा उपयोग करा, हात वारंवार धुवा, डोळे, तोंड, नाकाला हात लावू नका हे न्यू नॉर्मल समजावून द्यावे लागतील. गावागांवात जाताना स्थानिक डॉक्टर्स, युवकांची मदत घेतल्यास आम आदमीपर्यंत पोचणे, त्यांना जिंकणे कठीण नाही.   

सकारात्मक राहून कोरोनावर मात कशी करावी यासंदर्भात व्हिडिओज दाखवता येतील तरच ऑक्सिमीटर ‘आप’चा प्राणवायू ठरेल.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या