टिप्पणी: झळाळत्या पडद्यामागील ‘कटू सत्य’

नरेंद्र तारी
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

सिनेसृष्टीत सध्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लखलखत्या सिनेसृष्टीत पडद्यामागे बरेच काळे व्यवहार होत आहेत. मागच्या काळात ‘मी टू’ प्रकरण झाले आणि आता तर सुशांतसिंहच्या आत्महत्येवरून ड्रग्ज आणि व्यभिचारच वेशीवर टांगला गेला आहे. चित्रपटांप्रमाणे हे निव्वळ मनोरंजन नव्हे तर पांढरे फटफटीत सत्य आहे.

चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला आता तीन महिने होत आले तरी चौकशी अजून थांबलेली नाही. सुरवातीला आत्महत्येच्या प्रकरणावरून सुरू झालेली ही चौकशी आता ड्रग्ज कनेक्‍शनपर्यंत पोचली आहे आणि या ड्रग्ज कनेक्‍शनमुळे एकमेकांवर चिखलफेक करण्याचे प्रकार सिनेसृष्टीतील नटनट्यांकडून होत असल्याने चित्रपट सृष्टीचे वाभाडेच निघाले आहेत. सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू आणि ड्रग्ज कनेक्‍शनचा प्रश्‍न थेट संसदेत उपस्थित करण्यात आला. रवी किशन या नटाने हा प्रश्‍न संसदेत उपस्थित केल्यानंतर जया बच्चन यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. जया बच्चन यांच्यानंतर अन्य काही नटनट्यांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची संधी सोडली नाही. यामुळे सर्वसामान्यांना कायम भुरळ पाडलेल्या या सिनेसृष्टीत पडद्यामागे काय घाणेरडे प्रकार चालतात, त्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री कंगना राणावतने तर धमाल उडवून दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि कंगनाची हमरीतुमरी आणि कंगनाला एका राजकीय पक्षाने दिलेले महत्त्व, प्रसारमाध्यमांकडून जीव तोडून आणि घसा फाडून केलेली मखलाशी यामुळेच हा विषय नको तेवढा ताणून धरण्यात आलेला आहे.  

मागच्या काळात सिनेसृष्टीतील ‘मी टू’ प्रकरण बरेच गाजले होते. या ‘मी टू’मुळे अनेक भल्याभल्यांची प्रकरणे बाहेर पडल्यामुळे छी थू तर झालीच, पण सोज्वळ चेहऱ्याआड लपलेला घाणेरडा चेहराही त्यामुळे समोर आला होता. केवळ चित्रपटसृष्टीतील नटनट्या आणि इतर कलाकारांसोबतच राजकीय क्षेत्रातील काही बड्या धेंडांचीही ‘पतलून गिली’ झाली होती. त्यामुळेच तर बराच धसका या सिनेसृष्टीतील लोकांनी घेतला होता. हा वाद शमतो न शमतो तोच आता सुशांतसिंह राजपूतचे आत्महत्या प्रकरण, नटनट्यांना सोसावा लागणारे "नेपोटिझम'', आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी खेचले जाणारे पाय, ड्रग्ज, दारूच्या पार्ट्या, व्यभिचार आणि लिव्ह इन रिलेशनचा प्रकार रूढ होत चालल्याने त्यातून चाललेला स्वैराचार यामुळे सिनेसृष्टी खऱ्या अर्थाने बदनाम झाली आहे. लिव्ह इन रिलेशन ठेवून पती-पत्नीप्रमाणे वागायचे आणि उपरती झाली की सोडून द्यायचे. काय चालले आहे हे? समाजाला काय संदेश देत आहात तुम्ही? सिनेसृष्टीत येण्यासाठी धडपडणाऱ्यांना कोणत्या दिव्यातून जावे लागते, त्याचे रसाळ वर्णनही आता सोशल मीडियावरून गाजत आहे. अर्धसत्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठीही सोशल मीडियाचा मोठा हातभार लागतो आहे. अर्थातच, सोशल मीडियावर कुणाचा चाप नसल्याने कुणाच्या घरात काय शिजते याचे साद्यंत दर्शन आणि वर्णन सर्वसामान्यांना एका चपट्या डबीवर मिळत आहे. 

‘मी टू’ प्रकरणापूर्वीही अशी अनेक प्रकरणे गाजली आहेत. एखाद्या नटाने किंवा नटीने केलेला व्यभिचार, बलात्कार प्रकरण, खुनाचा प्रकार अशा अनेक प्रकरणांमुळे सोनेरी झालर लाभलेली चित्रपट सृष्टी आणि अर्थातच नाट्य सृष्टीही गाजली आहे. अशी प्रकरणे पोलिस आणि न्यायालयापर्यंतही गेली आहेत. पण अलीकडच्या काळात मात्र थेट एकमेकांवर आरोप करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुढे काय होते, कुणास ठाऊक पण कमरेचे सोडून गुढघ्याला बांधण्याच्या या प्रकारामुळे सर्वसामान्यांचे मात्र बरेच मनोरंजन होते. मूळात सर्वसामान्य रसिक प्रेक्षकाला सिने आणि नाट्य सृष्टीबद्दल कुतूहल आहे. काही रसिक प्रेक्षक तर आपापल्या आवडीच्या कलाकारांना देवाच्या जागी मानतात. हा अतिरेक असला तरी ते सत्य आहे, कारण अमिताभ बच्चनसारख्या एखाद्या नटाचे त्याचे चाहतेच जेव्हा मंदिर उभारतात, त्यावेळेला आणखी काय बोलायचे. 

चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात आतापर्यंत बरेच दिग्गज कलाकार झाले आणि होऊन गेले. या सर्वांनाच एकाच तराजूत तोलणे ईष्ट ठरणार नाही. कारण काही कलाकारांनी तर आपल्या अभिनयाच्या जोरावर आणि तंत्राच्या बळावर आपले वेगळे अस्तित्व टिकवून ठेवले आहे. भलेही या कलाकारांचे वागणे विक्षिप्त असो वा वेगळे, पण रसिकांनी अशा काही कलाकारांनाही डोक्‍यावर घेतले आहे. त्यामुळेच तर कोट्‍यवधी रुपये कमावणारा हा व्यवसाय आज चाहत्यांच्या जीवावर चालतो आहे. चित्रपटातील कथा फसवी असली, खोटी असली तरी अशा चित्रपटातील आपल्या आवडत्या कलाकाराची भूमिका पाहताना प्रेक्षक त्यात समरस होऊन जातो. खिशात पुरेसे पैसे नसले तरी चालतील, मात्र आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट पाहण्यासाठी रोजंदारी करणारा एखादा चाहताही असा चित्रपट पाहताना मागे पुढे करीत नाही. मात्र अशा कलाकाराची एखादी गुन्हेगारी बाजू जेव्हा समोर येते, त्यावेळेला मात्र या चाहत्याचा भ्रमनिरास होतो. मूळात भ्रमनिरास होण्याचे कारणच नसते. कारण ही चमचमणारी सृष्टीच आधी फसवी आहे. करोडो रुपये कमावणाऱ्या या सृष्टीतून सकारात्मक असे काही दृष्टीस पडले आहे काय, याचा आधी विचार व्हायला हवा. कलाकार आणि तंत्रज्ञ आपले नाव व्हावे, बक्कळ पैसा कमावण्यासाठी या क्षेत्रात जीवतोड मेहनत करतात, मात्र आपले चाहते हे मनावर घेतात. त्यामुळेच तर या चमचमणाऱ्या सृष्टीच्या पडद्यामागील सत्यही बाहेर यायला हवे. 

सुशांतसिंग काय नी कंगना काय, सगळे एकाच माळेचे मणी. समाजासाठी या लोकांचे योगदान काय आहे ते आधी तपासून घ्यायला हवे. या ठिकाणी सर्वच नटनट्यांना किंवा अन्य कलाकारांना वाईट म्हणण्याचे कारण नाही. काही गुणी कलाकारही या क्षेत्रात होऊन गेले आणि आहेतही. कोरोनाच्या काळात काहीजणांनी आपल्यापरीने मदतही केली आहे, तेही नाकारून चालणार नाही. पण अब्जावधी रुपयांची उलाढाल होणाऱ्या या सिनेसृष्टीतून समाजासाठी म्हणावा तसा फायदा झालेला नाही. केवळ मनोरंजन एके मनोरंजन एवढ्या पुरतीच ही सृष्टी मर्यादित राहिली आहे. विशेष म्हणजे स्वैराचाराचा आणि व्यसनाचा विळखा या सृष्टीला पडला आहे, हेही कुणी नाकारू शकत नाही. चार दोन चित्रपट हिट झाले की किंमत वाढलेले हे कलाकार एखाद्या चित्रपटासाठी लाखो नव्हे तर कोट्‍यवधी रुपये घेतात, एखाद्या चित्रपटावर चाहत्यांच्या उड्या पडल्या की पैशांचा छनछनाट सुरू होतो आणि या छनछनाटात नाचणाऱ्या कलाकारांचा स्वैराचार त्यामागून येतो, ही उदाहरणेही काही कमी नाहीत. आज ड्रग्जचा शिरकाव चित्रपटसृष्टीत झाला आहे. नाट्यक्षेत्रही व्यसनांपासून मागे राहिलेले नाही. आता एकच गोष्ट आहे, ती म्हणजे चित्रपट क्षेत्रासारखी कमाई नाट्यक्षेत्रात होत नाही, त्यामुळे नाट्य क्षेत्रातील थेर चित्रपट सृष्टीपेक्षा थोडे कमी आहेत. 

चित्रपटसृष्टीच्या वलयात गुरफटलेल्या आणि कलाकार म्हणून शिरकाव करण्यासाठी अनेकजण धडपडतात. चित्रपट सृष्टी सोडूनच द्या, दूरचित्रवाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या मालिकातही शिरकाव करण्यासाठी युवा युवती कशाप्रकारे जीवाचा आटापिटा करतात, हेही आपल्याला ठाऊक आहे. त्यात काहींना यश मिळते, तर काही निराशेच्या गर्तेत जातात, काहीजणांना काम मिळते, तर काहीजणांचे शोषण होते. गेल्याच आठवड्यात मालिकांत काम करणाऱ्या एका तामिळ नटीने आत्महत्या केली. या आत्महत्येला तिघेजण कारणीभूत होते. या तिघांनीही तिचे शोषण केले. आत्महत्येनंतर हे स्पष्ट झाले, आणि तिघेही पोलिसांना शरणही आले. अशा लोकांना थेट फासावरच का नाही लटकवले जाते, त्याचे आधी उत्तर शोधायला हवे. कारण पुढच्यांना हा धडा मिळायला हवा. 

असो. जेवढे उगाळाल तेवढे काळेच निघेल. विषय तो नाही, चांगले लोकही या क्षेत्रात आहेत, पण मांगल्यावर मात करणारे अमंगलही असते, तसाच प्रकार या लखलखत्या दुनियेत आहे, आणि हे अमंगल याच लोकांच्या तोंडून ऐकायला मिळते, याहून या सोनेरी सृष्टीचे दुर्दैव ते कोणते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या