हवामानबदल: सागर नि किनाऱ्यांना ‘ओहोटी’

संतोष शिंत्रे
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

मासेमारीत आपला क्रमांक आशियात तिसरा, तर जगात सातवा आहे. हवामान-बदलाचा फार मोठा विनाशकारी परिणाम या अत्यंत महत्त्वाच्या मूलस्त्रोतावर होतो आहे. नेहमीप्रमाणेच माणसाचे बेजबाबदार वर्तन त्यासाठी मुख्यत्वे कारणीभूत आहे. 

सागरी सृष्टी-व्यवस्था आणि किनारे यांच्यावर हवामान-बदलाचा परिणाम तपासणे अनेक कारणांनी गरजेचे ठरते. जगभरातले २.४ अब्ज लोक समुद्राच्या किनाऱ्यापासून १०० किलोमीटरच्या आत रहातात. आपल्या लोकसंख्येपैकी २५ कोटी लोक सागरी किनारपट्टीपासून ५० कि.मी.च्या आत राहतात आणि त्यातलेही एक पंचमांश मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्ये राहतात. ७५१६ कि.मी. लांबीचे किनारे, आपली सुमारे १७ टक्के लोकसंख्या सांभाळतात. २०१७मधले संशोधन सांगते, की भारत प्रतिवर्ष ३.६३ टन इतके मासे आणि जलचररूपी खाद्यान्न आपल्या मालकीच्या सागरी भागातून (विशेष आर्थिक क्षेत्र) मिळवतो. मासेमारीत आपला क्रमांक आशियात तिसरा, तर जगात सातवा आहे. हवामान-बदलाचा फार मोठा विनाशकारी परिणाम या अत्यंत महत्त्वाच्या मूलस्त्रोतावर होतो आहे. नेहमीप्रमाणेच माणसाचे बेजबाबदार वर्तन त्यासाठी मुख्यत्वे कारणीभूत आहे. 

यातील प्रमुख परिणाम असे: १) समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढणे. २) समुद्राची पातळी उंचावणे. ३) समुद्रातील प्रवाह आणि त्यांचे वहन बिनसणे. ४) समुद्राचे आम्लीकरण होणे. ५) हवेसंबंधित अनैसर्गिक अरिष्टांची (वादळे इत्यादी) वारंवारिता आणि तीव्रता वाढणे. हे सर्वच परिणाम अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेने एकमेकांबरोबर मिसळतात, वर्धित होतात आणि एकमेकांचा परिणाम वाढण्यास मदत करतात. या सर्वांचा थेट परिणाम विविध प्रजातींच्या शरीररचना, संख्या, स्थलांतराचे मार्ग, प्रजातींमधील परस्परसंबंध आणि अधिवास यांच्यावर होतो. प्राथमिक उत्पादक असे सूक्ष्म वहिवाटीचे जीव म्हणजेच ‘फायटोप्लॅनक्‍टन’ भारतीय सागरांमधून गेल्या ६० वर्षांत समुद्र उष्ण झाल्यामुळे २० टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. हा अन्नाचा सर्वात प्राथमिक प्रकार. ‘एल निनो’ प्रवाह दक्षिणेकडे वळतो तेव्हाही बरेच नुकसान होत असते आणि गेल्या काही वर्षांत असे होण्याचे प्रमाण वाढले आहे. १९९०पासून हा प्रकार चार वेळा झाला. विषुववृत्तीय भागातील प्रवाळभिंती त्यामुळे सतत नष्ट होत आहेत. जगभरातील समुद्रांमधील प्रवाळभिंती जगभरातील २५ टक्के मत्स्यान्न तगवतात. मासे आपले आश्रयस्थान त्यामुळे गमावून बसतात. विशेषतः लक्षद्वीप या ‘एल निनो’चा सामना गेली अनेक वर्षे करते आहे. तिथे हा प्रवाह आणि अन्य कारणांनी होणाऱ्या प्रवाळांच्या ‘ब्लीचिंग’ पूर्वी साधारण दर दहा वर्षांनी होत असे, तो कालखंड आता चार वर्षांवर आला आहे. प्रवासी कंपन्यांच्या आकर्षक माहितीपत्रकांमुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांची लक्षद्वीपबद्दल, ती मालदीवसारखी निर्मनुष्य, अत्यंत शांत जागा आहे अशी गैरसमजूत झालेली असते. वास्तव असे आहे की ही भारतातली एक सर्वाधिक गजबजलेली जागा आहे आणि तिथे प्रत्येक चौरस कि.मी. मध्ये सुमारे २००० लोक राहतात. असो.

समुद्राच्या वाढत्या पातळीबद्दल संशोधन असे सांगते, की भारतीय किनाऱ्यांवरील समुद्रसपाटीची पातळी सरासरी प्रती-वर्ष ३.२ मिलिमीटर इतकी वाढती आहे. त्यातही बंगालचा उपसागराची ती पातळी गेल्या दोन दशकांमध्ये सुमारे पाच मिलिमीटर प्रती-वर्ष इतकी वाढली आहे. याचा संबंध वैज्ञानिक कमकुवत होत चाललेल्या मॉन्सूनशी जोडतात. त्यामुळेच अत्यंत विध्वंसक वादळे आताशा अधिक नुकसान करू लागली आहेत. (मुराकामी, वेचची आणि अंडरवुड, २०१७) वस्तुतः समुद्र हा हवामानाचे नियमन करण्यातील एक सर्वाधिक महत्त्वाचा घटक. पण या नियमनाच्याच कार्यात सततचा मानवी हस्तक्षेप त्या व्यवस्थांच्या आणि त्या पुरवत असलेल्या सेवांच्याच मुळावर येतो आहे. समुद्र ही एक अभिसरण व्यवस्था आहे. हलती, जग जोडणारी, ऊर्जेचे वहन करणारी आणि अन्नघटक एकीकडून दुसरीकडे पोहोचवणारी. तिची काळजी घेणे आवश्‍यक आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या