प्रासंगिक: तरुणांकडे दुर्लक्ष केल्याची किंमत

महेश बर्दापूरकर
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

कमलनाथ आणि अशोक गेहलोत या काँग्रेसच्या बुजूर्ग  नेत्यांच्या गळ्यातच मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आणि इथेच असंतोषाची ठिणगी पडली.

‘निर्नायकी अवस्था संपणार कधी?’ हे अनंत बागाईतकर यांचे वार्तापत्र वाचले. १३५ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केलेल्या काँग्रेस पक्षाची दयनीय स्थिती का झाली, याचे मुख्य कारण निर्नायकी अवस्था हेच आहे आणि याला जबाबदार आहे पक्षातील घराणेशाही. 

गेली अनेक वर्षे काँग्रेसचे राजकारण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याभोवतीच फिरते आहे, नव्हे घुटमळते आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक जिंकल्यावर राज्य नेतृत्वाची धुरा तरुण पिढीकडे सोपविली जाईल, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. कमलनाथ आणि अशोक गेहलोत या काँग्रेसच्या बुजूर्ग  नेत्यांच्या गळ्यातच मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आणि इथेच असंतोषाची ठिणगी पडली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेत्याकडे केलेले दुर्लक्ष काँग्रेसला महागात पडले आणि मध्य प्रदेश पक्षातील सत्ता पक्षाच्या हातून निसटली. याच नाट्याची पुनरावृत्ती राजस्थानात होणार होती;  पण सचिन पायलट यांची समजूत घालून तात्पुरती डागडुजी करण्यात पक्षाला यश आले असले, तरी असंतोष पूर्णपणे संपलेला नाही. तात्पर्य, पक्षातील तरुण पिढीकडे होत असलेले दुर्लक्ष आणि एका घराण्याभोवती घट्ट झालेले सत्ताकेंद्र हीच पक्षाच्या सद्यःस्थितीची कारणे आहेत. त्यामुळे सक्षम तरुण नेत्यांवर जबाबदारी सोपविणे ही काळाची गरज आहे, तरच पक्षाला उभारी येईल.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कुठलेही पद नसताना विंगेत बसून अधिकार गाजविण्याचा उद्योग काँग्रेसला परवडणारा नाही, हे राहुल गांधींना समजत नसेल, तर त्याची जाणीव श्रेष्ठींनी करून दिली पाहिजे. पक्षातील काही बुजूर्ग मंडळींची नाराजी हे संकट नव्हे, तर संधी समजून पक्षाची नव्याने फेरबांधणी केली पाहिजे आणि नवे चेहरे पुढे आणले पाहिजेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या