हवी तत्परता

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

रुग्ण वाढले त्याचा दोष लोकांना देऊन सरकार मोकळे. परंतु कोरोना आटोक्यात आणण्याच्या उपाययोजना सरकार किती गतीने आणि गांभीर्याने योजत आहे त्याची योग्य माहितीही मिळणे कठीण झाले आहे. 

राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या तीनशेच्या पार गेली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरीही सरकार म्हणते सावध राहा आणि काळजी घ्या. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकार काय करतेय, असा प्रश्‍न आता लोकांना पडला आहे. रुग्ण वाढले त्याचा दोष लोकांना देऊन सरकार मोकळे. परंतु कोरोना आटोक्यात आणण्याच्या उपाययोजना सरकार किती गतीने आणि गांभीर्याने योजत आहे त्याची योग्य माहितीही मिळणे कठीण झाले आहे. 

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री अधूनमधून सेवासुविधा पुरवल्या जातील याविषयीच्या घोषणा करतात. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी किती होतेय त्याचीही माहिती त्या त्या वेळी मिळायला हवी. सरकारवर अविश्‍वास दाखवण्यात आम्हाला कोणतेही स्वारस्य नाही. पण परिस्थिती हाताबाहेर तर जाणार नाही ना, असे म्हणण्याजोगी स्थिती दिसून येते. इस्पितळात दाखल होण्यासाठी लोक शेवटपर्यंत का राहतात, असा प्रश्‍न सरकार करीत आहे. परंतु अशी वेळ का येते, हेही एकदा तपासून पाहायला हवे. 

कोरोनाची लक्षणे आढळून आली की सरळ चाचणी करून घ्या, असे सांगितले जाते. परंतु एका दिवसाला किती चाचण्या होतात. बरे चाचण्या जिथे केल्या जातात तेथील गर्दीमुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा चाचणीसाठी उपस्थिती लावण्याची वेळ येते. असे झाल्याने कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. इतरांबरोबर गर्दीत राहिल्याने आपण पॉझिटिव्ह होऊ शकतो, अशी भीती लोकांच्या मनात निर्माण होते. रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्यानंतरही तत्परतेने त्यांना औषधेवगैरे दिली जातात काय, याची सरकारने चौकशी करावी. 

लोकांचे अनुभव ऐकायला मिळतात त्याप्रमाणे, घरातच अलगीकरण करणाऱ्यांना अर्ज भरण्यासाठी कसरत करावी लागते. मग संबंधित डॉक्टरांकडे औषधांसाठी विचारणा करावी लागते. डॉक्टर त्यांना औषधे नेण्यासाठी या, असा निरोप देणार. पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची औषधे आणण्यासाठी कोणी जायचे, असा प्रश्‍न उभा राहतो. आपल्या माणसांसाठी धोका पत्करून लोक जातातही, पण एकटा दुकटा असलेल्याचे काय? एकाच घरातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह असले तर त्यांना औषधे घरात पोचवली जातात काय, याची शहानिशा आरोग्य खात्याने केली आहे काय? सगळीकडे रुग्ण वाढत असल्याने सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष कदाचित होत असेलही, पण हलगर्जीपणा होता कामा नये. 

इस्पितळांमध्ये खाटा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात येते. मग अलीकडे लोक इस्पितळात न जाता घरीच राहणे पसंत का करतात, याचीही कारणे शोधायला हवीत. ज्या रुग्णांनी इस्पितळात जाऊन उपचार घेतले त्यांना आलेले अनुभव खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही ऐकले आहेत. तर जे रुग्ण कोविड इस्पितळ अथवा निगा केंद्रात जाऊन आले त्यांचे अनुभवही काही फारसे चांगले नाहीत. केवळ इएसआय इस्पितळाचा अपवाद काय तो तेथील रुग्ण सांगतात. आता लोक काय सांगतात यावर पूर्ण विश्‍वास ठेवावा असेही नाही. परंतु काहीतरी कमी आहे, सेवेत काहीतरी त्रुटी असाव्यात. सर्व इस्पितळांमध्ये जेवण चांगले मिळते, असा अभिप्रायही द्यायला रुग्ण विसरत नाहीत. म्हणजे चांगले ते चांगले म्हणायला काहीच हरकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आरोग्यसेवेत गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. खासगी इस्पितळात उपचार घेण्यासाठीचे अव्वाच्या सव्वा दर जाहीर केले त्यातून सर्वसामान्यांच्या मनात धस्स झाले. एवढा खर्च खासगी इस्पितळात येत असेल तर सरकार आमच्यावर एवढा खर्च सरकारी इस्पितळात खरेच करेल काय, असाही भीतीवजा प्रश्‍न कोणाच्याही मनात यावा. कारण सरकारी सेवेबाबत अनेकांच्या मनात अढी असते. कोरोनाच्या संक्रमणामुळे गावागावांत रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. आभाळच फाटले तर कुठे कुठे ठिगळं जोडायची, असा हा प्रकार असला तरी सरकारला आवश्‍यक उपाय योजना करणे अजूनही शक्य आहे. 

घरी अलगीकरणात राहणाऱ्या रुग्णांसाठी औषधे तसेच जीवनावश्‍यक वस्तुंचा पुरवठा वेळेत करणे आणि त्यांना सल्ला देण्यासाठी वेळेत डॉक्टर उपलब्ध करणे, शिवाय एखादा रुग्ण घरीही उपचारांना दाद देत नाही तर अशा रुग्णांनाच इस्पितळात हलवणे, असे केले तर इस्पितळे खचाखच भरणार नाहीत आणि लोकही घाबरणार नाहीत. सध्या ज्या पध्दतीने पॉझिटिव्ह रुग्णांना घेऊन जातात, त्याने मोठी दहशत निर्माण झाली आहे. कोरोनाचा सामना सर्वांनाच करायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने लढण्याची तयारी ठेवायला हवी. रुग्ण वाढत आहेत आणि मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असल्याने लोकांच्या मनात भीती दाटली आहे. 

रुग्ण मृत्यूची कारणे अन्यही आहेत. पण सर्वसामान्य त्याविषयी ज्ञात नसतात. कोरोनाने मृत्यूच होतो, असा एक समज दृढ झाला आहे तोसुध्दा दूर करायला हवा. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कितीतरी पटीने आहे. परंतु त्याविषयीची जागृती करण्यात सरकार कमी पडले आहे. दक्षिण गोव्यातील नवीन इस्पितळ तातडीने कोविडसाठी तयार झाले असते तसेच अन्य ठिकाणी कोविड रुग्ण निगा केंद्रे उपलब्ध झाली असती तरीसुध्दा रुग्णांना कोठे ठेवायचा हा प्रश्‍न बऱ्यापैकी सुटला असता. परंतु त्यातही गती येत नाही. लक्षणे नसलेल्या पण कोविड पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांना घरीच सर्व तऱ्हेचे औषधोपचार देण्यासाठीची प्रभावी यंत्रणा कशी राबवता येईल याचाही विचार करायला हवा. सरकार काहीच प्रयत्न करीत नाही, असे कोणीही म्हणत नाही. पण त्या प्रयत्नांमध्ये सुसूत्रता आणि योग्य नियोजन असायला हवे. तसे असेल तर लोकही विश्‍वास ठेवतात आणि सरकार करीत असलेल्या उपाययोजनांवरही लोकांचा भरोसा राहतो. लोकांच्या मनात विश्‍वास तयार करणे आणि लोक भरोसा ठेवतील, अशी स्थिती निर्माण करणे हे दिव्य आहे. सरकारला त्यासाठी खडतर मेहनत घ्यावीच लागेल.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या