प्रासंगिक: चीनला इशारा नको, दणकाच हवा!

शंभू भाऊ बांदेकर
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

आतापर्यंतच्या इतिहासाने आपले शेजारील राष्ट्र चीन हे महाधूर्त, कावेबाज व भारताच्या दृष्टीने सदैव धोक्याची टांगती तलवार डोक्यावर असलेले राष्ट्र असल्याचे सिद्ध झाले आहे.

भारताचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी संरक्षणमंत्रिपदाचा ताबा घेतल्यानंतर देशातील व देशाबाहेरील दहशतवादाला मुठमाती देण्यासाठी काही कठोर पावले उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी फर्नांडिस म्हणाले होते, पाकिस्तान काहीवेळा भारताशी मित्रत्वाचे संबंध ठेवतो, तर कधी अगदी टोकाची भूमिका घेतो व त्यांचे समर्थनही करतो. 

असे असेल तरी आपण एक गोष्ट मुळीच नजरेआड करून चालणार नाही. ती म्हणजे भारताचा खरा शत्रू हा चीन आहे आणि म्हणून भारताने चीनच्या प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवायला हवे.

माजी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांच्या निवेदनावर आपण बारीक विचार केला तर आपल्याला कुठली माहिती अवगत होते बरे?

आतापर्यंतच्या इतिहासाने आपले शेजारील राष्ट्र चीन हे महाधूर्त, कावेबाज व भारताच्या दृष्टीने सदैव धोक्याची टांगती तलवार डोक्यावर असलेले राष्ट्र असल्याचे सिद्ध झाले आहे. या आमच्या ‘प्यारा दुश्‍मन’चा भारताबाबत आवडता छंद कोणता असेल तर तो म्हणजे दरवेळी भारताशी शांततेची चर्चा करायची, मिळेल त्या मार्गाने भारताशी व्यापार वाढवायचा, भारत-चीन वादग्रस्त भागामध्ये लष्करी व हवाईदल निर्माण करायचे, क्षेपणास्त्रे तैनात करायची, आपल्या लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वेमार्ग सीमेपर्यंत भिडवायचे, आमचा दुसरा ‘प्यारा दुश्‍मन’ पाकिस्तानला फूस देऊन भारतात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या दहशत वाढवायची त्यासाठी पाकला आर्थिक मदती बरोबरच शस्त्रपुरवठा करायचा. आपल्या देशाचे पहिले प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘हिंदी चीनी भाई भाई’ म्हणण्यापूर्वी व नंतरही ते आजतागायत चीनचे हे उपद्व्याप अव्याहतपणे चालू आहेत. हा सगळा पाढा वाचायचे  कारण म्हणजे चीनला भारताने नुकताच दिलेला खणखणीत इशारा होय.

चीनने मागील काही दिवसांपासून भारतात जी घुसखोरी चालवली आहे, ती संपुष्टात आणण्यासाठी उभय देशांमध्ये चर्चा सुरू आहे. अशा एक दोन नव्हे तर अनेक फैऱ्या झालेल्या आहेत. अशावेळी चीनने भारताचा संयम ढळेल असे काही करू नये आणि तशी वर्तणूक चीनने केल्याचे उघडकीस आले तर भारत चीनविरुद्ध लष्करी कारवाई करायला मुळीच मागेपुढे पहणार नाही, असा खणखणीत इशारा नुकताच भारताच्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे. चीनबाबत एक काळ असा होता की, भारताचे खूप सोसले, भोगले, माघार घेतली, शांततेच्या चर्चांचे गुऱ्हाळ चालू ठेवले, पण आता भारताचा संयम सुटत आला आहे. त्यामुळे जे काय भारताविरुद्ध करायचे आहे, ते पूर्ण विचारांती करा नपेक्षा तुमची धडगत नाही, असेच रावत यांनी सांगत चीनच्या अरेरावीला लगाम घालण्याचा प्रयत्न स्पष्ट इशारा देऊन केला आहे.

भारताच्या शांतता, सौहार्द व जगा आणि जगू द्या या तत्त्वांशी सुसंगत असाच हा इशारा आहे. पण चीनची एकूण वर्तणूक पाहता त्याला खणखणीत इशारा देऊन चालणार नाही तर त्याला दणदणीत दणकाच दिला पाहिजे.

पूर्वेतिहास पहता भारताला चर्चेमध्ये गुंतवून ठेवायचे व भारताविरुद्धची आपली गुंतवणूक चालूच ठेवायची अशी फसवणूक चीन करत आलेला आहे. मागील तीन-चार महिन्यातील चर्चेतून काही निष्पन्न झाले नाही किंवा आम्ही आमचे सैन्य माघारी घेताे, असे अनेकदा सांगूनही चीनने सैन्य माघारी घेतलेले नाही. एका बाजूने सैन्य माघारी घेतल्याचा देखावा करायचा व दुसऱ्या बाजूने सैन्य भारताच्या सीमेलगत आणायचे ही त्यांची आगळीक पूर्वीसारखीच चालू आहे. अशा या र्ड्रॅगनला एका फक्त ‘गन’चीच भाषा कळते. हे दाखवून देण्याची संधीच जणू चीन आपल्याला देत आहे. म्हणून आम्ही सैन्य माघारी घेतले आहे, अशी बतावणी करणाऱ्या चीनला हा सूर्य, अन हा जयंद्रथ याची प्रचीती आणून देणे गरजेचे आहे, असे वाटते. 

मागील सहा महिने चीनने कोराेना विषाणूच्या विषवल्लीचा फैलाव करून जगालाच जणू वेठीस धरले आहे. आणि या विषाणूचा संसर्ग चीनच्या ज्या वुहान शहरामधून झाला, तेथे तर हल्लीच चीनने आनंदाेत्सव साजरा केला. आपल्याला या विषाणूचा प्रतिबंध करणारी लस उपलब्ध झाली आहे. औषध लवकरच मिळणार आहे, असे सांगून कोरोनाच्या उद्रेकामुळे त्रस्त झालेल्या जगाला दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे. पण चीनचे खायचे दात व दाखवायचे दात याची पारख जगाने केल्यामुळे त्याला जागतिक व्यापारपेठेला मुकावे लागले आहे. तरीही ‘हम भी कुछ कम नही’, चाल बडेजाव चालू आहे, ही खेदाची गोष्ट म्हणावी लागेल.

अशावेळी आपल्याला शत्रूचा शत्रू तो आपला मित्र असा प्रत्यय येऊ लागला आहे. ही जमेची बाजू म्हणता येईल. सध्या चीन-अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला पोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. याचे कारण म्हणजे अमेरिकेची दोन अत्याधुनिक हेरगिरी विमानांनी काही दिवसांपूर्वी आमच्या हद्दीत शिरून सैन्य सराव टिपल्याचा आरोप चीनने अमेरिकेवर केला आहे. ही घटना उत्तर चीनमध्ये घडली असली तरीही ठावठिकाणाची अचूक माहिती मात्र देण्यात आलेली नाही. याबाबत अमेरिकेने चीनचे आराेप फेटाळून लावले नसेल तरीही कुठल्याच नियमांचे उल्लंघन झाले नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून उलट चीनचीच उत्तरक्रिया करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चीनला जशास तसे उत्तर देणारा अमेरिका आपल्याला जास्त जवळचा वाटणे साहजिक आहे. शिवाय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ‘हाऊडी मोडी’ म्हणणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीस मदत करणार असल्यामुळे निदान निवडणुकीपुरती तरी हा स्नेहबंध कायम राहील, असे म्हणायला हरकत नसावी. पण एक गोष्ट मात्र खरी की विषवल्लीच्या या वाढत्या महासंकटामुळे चीनही महासंकटात पडणार आहे, याची त्यांना जाणीव कशी बरे होत नाही? ‘मर गए फिरभी टांग उपर’ अशीच त्यांची अवस्था तर नाही ना? एक गोष्ट मात्र खरी की चीनने आतापर्यंत भारताच्या विरोधात केलेल्या कुरापती, आगळिक आणि माजवलेला दहशतवाद सारा एकदाच आणि तेही कायमचे प्रत्युत्तर असेच असेल तर आता खणखणीत इशाऱ्यावरच थांबू नका, तर त्याला याद राहील असा दणदणीत दणका द्या, असेच प्रत्येक भारतीय म्हणेल यात संशय नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या