टिप्पणी: ड्रग्ज कनेक्‍शन @ गोवा.कॉम

नरेंद्र तारी
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

इवल्याशा गोव्यात ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असा प्रकार मानल्या जाणाऱ्या गुन्हेगारांकडून आश्रयासाठी आणि मौजमजेसाठी गोव्याचा वापर होत असल्याने ही चिंतेची बाब ठरली आहे.

सुशांतसिंहची आत्महत्या, हणजूणची रेव्ह पार्टी, अमली पदार्थांचा खुलेआम व्यवहार यावरून राज्यातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. एकमेकांवर आरोपाच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे या प्रकरणांशी संबंधित प्रत्येकजण स्कॅनरखाली आला आहे.  

देशाच्या मुकुटात मोरपीस म्हणून शोभणाऱ्या समृद्ध सुंदर गोव्याला गुन्हेगारीचा विळखा पडल्याने एकापरीने या मोरपिसातील रंगच उडून गेल्यासारखे झाले आहे. इवल्याशा गोव्यात ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असा प्रकार मानल्या जाणाऱ्या गुन्हेगारांकडून आश्रयासाठी आणि मौजमजेसाठी गोव्याचा वापर होत असल्याने ही चिंतेची बाब ठरली आहे. गुन्हेगारांनी गोव्यात बिनधास्त आश्रय घेण्याची प्रकरणे ही तशी काल-परवाची नाही. हे फार पूर्वीपासून चालू आहे. गुन्हेगारीचा हा विळखा फार पूर्वीच गोव्याच्या मानगुटीवर पडला आहे, आणि आता तर तो घट्ट होत चालला आहे. सध्या गाजत असलेल्या सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणानंतर त्याचे गोव्यातील अमली पदार्थांचे कनेक्‍शन, हणजूण येथील रेव्ह पार्टी आणि त्यातील राजकारण्यांचा संबंध यामुळे राज्यातील राजकारणही ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, त्यातून गोमंतकीय गोंधळून गेला आहे. या प्रकरणातील सर्वच बाजू जनतेसमोर उघड होणे अत्यंत गरजेचे आहे. गोव्यातील या शांत, सुंदर निसर्गाच्या कुशीत अशाप्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांची मालिकाच लपलेली आहे काय, असा संशयही आता सर्वसामान्य नागरिकाला सतावत आहे. 

देशात अथवा जगात कुठेही गुन्हा करून लपण्याचे सुरक्षित स्थान म्हणून गोव्याकडे पाहिले जाते, हे आतापर्यंतच्या गुन्हेगारी प्रकरणावरून सिद्ध होत आहे. आंतरराष्ट्रीय कुख्यात खुनी गुन्हेगार चार्लस्‌ शोभराज असो वा मुजाहिद्दीनचा कुख्यात दहशतवादी यासीन भटकळ असू दे. गुन्हे केल्यानंतर या लोकांनी गोव्यात आश्रय घेतल्याचे सिद्ध झाले आहे. १९८६ मध्ये जेव्हा दळणवळण आणि संपर्काच्या तेवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, त्याकाळी खून प्रकरणात सात देशांना हवा असलेला कुख्यात गुन्हेगार चार्लस्‌ शोभराजला महाराष्ट्र पोलिसांनी पर्वरीतील एका रेस्टॉरंटमध्ये पकडला होता. देशातील दहशतवादी कृत्यात सामील असलेला पट्टीचा दहशतवादी गुन्हेगार यासीन भटकळ याला गेल्या २०१३ साली जेव्हा भारत-नेपाळ सीमेवर पकडला तेव्हा चौकशीवेळी तो वर्षभर गोव्यात वास्तव्यास होता, हे उघड झाले. अगदी बिनधास्त...! आपल्या गुप्तचर यंत्रणेला त्याची कोणतीच माहिती नव्हती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील असे कितीतरी गुन्हेगार गोव्यात लपण्यासाठी आश्रयाला आले असल्याचेही त्यानंतर अनेकदा सिद्ध झाले असून अशा गुन्हेगारांना आपण ओळखू शकत नाही काय, गुन्हेगारांना लपून राहण्यासाठी गोवा म्हणजे त्यांच्या दृष्टीने एखादे नंदनवन ठरले आहे काय, हा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात अमली पदार्थांचा व्यवहार हा काही लपून राहिलेला नाही. तरीही हणजूण येथील रेव्ह पार्टीवर गोवा पोलिसांनी केलेली कारवाई स्वागतार्ह आहे. ही एकच रेव्ह पार्टी नव्हे तर राज्यातील ड्रग्जची पाळेमुळे खणून काढण्यासाठी अशाप्रकारच्या कारवाईची सातत्याने गरज आहे. आज कुणीही उठतो आणि गोव्यात कसलेही व्यवहार सुरू करतो. झटपट पैसे कमावण्यासाठी गुन्हेगारी स्वरुपाची कृत्ये करताना अशाप्रकारच्या व्यवहारातून कोट्यवधी रुपये कमावतो. अहो, तीस, चाळीस वर्षे प्रामाणिकपणे नोकरी करणारा आपल्या अपेक्षेप्रमाणे किमान सुसह्य आणि आपल्याला हवे तसे जीवन जगू शकत नाही. आयुष्यभर पैसान्‌ पैसा गोळा करताना त्याच्या अपेक्षेप्रमाणे सुख लाभत नाही, मात्र गुन्हेगारी विश्‍वात शिरलेला वर्ष दोन वर्षांतच ड्रग्ज, वेश्‍या व्यवसाय आणि इतर गैरव्यवहारांतून राजेशाही जीवन जगतो, यावरून कामाचे आणि प्रामाणिकपणाचे मोल काय ते स्पष्ट होते. जाऊदे, ज्याचे त्याचे नशिब म्हणून सर्वसामान्य माणूस त्याकडे दुर्लक्ष करतो, पण प्रशासनाने अशा गुन्ह्यांकडे तिऱ्हाईताप्रमाणे पाहता कामा नये. अशा लोकांवर जबर कारवाई ही व्हायलाच हवी.

सध्या गाजत असलेल्या सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाचे एक टोक गोव्यापर्यंत पोचले आहे. सुशांत सिंहचे गोव्यातील वास्तव्य, ड्रग्जशी आलेला संबंध यामुळे गोव्याचे नावही पुढे आले आहे. दोन-चार चित्रपट केलेला एक माणूस, कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करतो काय, पोरींना नाचवतो काय, आणि आता त्याच्या आत्महत्येवरून चाललेला विशेषतः प्रसार माध्यमांतील गदारोळ डोकेखाऊ ठरला आहे. सुशांतच्या आत्महत्येची चौकशी ही व्हायलाच हवी. त्यासाठी सीबीआयकडे हे प्रकरणही सोपवण्यात आले आहे, पण ज्या तऱ्हेने आज मीडिया हे प्रकरण लावून धरत आहे. छोट्या पडद्यावर कोंबड्या झुंजवल्या जात आहेत, त्यावरून इतर गंभीर विषयांकडे आपण काणाडोळा करतोय की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. देश आज कोणत्या परिस्थितीतून पुढे जात आहे, कोरोनाचे संक्रमण संपत नाही, उलट ते वाढले आहे, बळींची संख्या वाढतच आहे, रोजगाराचा विषय गंभीर झाला आहे, इतर अनेक  विषय देशवासीयांना सतावत आहेत. मात्र, सुशांतच्या प्रकरणामुळे हे सर्व मागे पडले आहे. ‘टीआरपी’ की काय तो हाच प्रकार आहे वाटते...!

गोव्यातील पर्यटन हे केवळ देशापुरते मर्यादित नाही, विदेशापर्यंत पोचले आहे. पर्यटनासाठी कुठे जायचे तर ते गोव्यात असा जेव्हा पर्यटक विचार करतात, त्यावेळेला आपण या पर्यटकांना कोणत्या चांगल्या सुविधा उपलब्ध करू शकतो, गोव्यात येणाऱ्यांना मग ती मौजमजा असू दे की निवांतपणा असू दे, शांत गोव्याची सुरक्षा अशा लोकांना कशी काय देऊ शकतो, यावर आधी विचार व्हायला हवा. राज्य सरकारमधील किनारपट्टी भागातील एका मंत्र्याने तर राज्यातील ड्रग्ज व्यवहार पूर्णपणे बंद करण्याची आणि कठोर कारवाईची आवश्‍यकता व्यक्त केली आहे. हा केवळ विचार नव्हे तर सरकारकडून त्यासाठी अपेक्षित कृती व्हायला हवी. देशातील इतर राज्यात दारूचा महापूर गोव्यासारखा कुठे वाहत नाही. इतर राज्यातील मुलींना गोव्यात आणून वेश्‍या व्यवसायात गुंतवण्याचे प्रकारही कमी होत नाहीत. हे कुठे तरी थांबले पाहिजे. सुंदर गोव्याची प्रतिमा अबाधित राखताना ज्याप्रमाणे सुंदर निसर्गाचा चेहरा गोव्याला लाभला आहे, अध्यात्म आणि मनःशांतीसाठी ज्याप्रमाणे राज्यातील विविध भागातील सुबक सुंदर मंदिरे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत, सुंदर निसर्ग पर्यटकांना खुणावत आहे. त्याचप्रमाणे केवळ सोनेरी किनाऱ्यावरील रेतीत हातात दारुच्या बाटल्या घेऊन नंगानाच करणारी गोव्याची ही भूमी नाही, येथे स्वैराचाराला थारा नाही, हे आधी आमच्या राज्यकर्त्यांनी मनात ठसवून घेतले पाहिजे आणि त्यादृष्टीने कार्यवाही सुरू व्हायला हवी. विदेशी युवती स्कार्लेट किलिंगसारखी प्रकरणे गोव्यात सातत्याने घडत आहेत. सुंदर सोनेरी किनारा अशा प्रकरणांमुळे दूषित होऊन जातो. देशांतर्गत सोडून द्या, पण विदेशातील एखाद्या पर्यटकाचा राज्यात संशयास्पद मृत्यू होतो, आणि आपण अशा प्रकरणातील सत्यासत्यता पडताळून पाहू शकत नाही, त्यामुळे आपल्या सुरक्षा यंत्रणेचे आंतरराष्ट्रीय स्तरावर हसे होते, याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. 

एखादा विषय ‘डायल्यूट’ करण्यासाठी सरणारा काळ हेच औषध असते. आताही सुशांतची आत्महत्या, रेव्ह पार्ट्या आणि इतर प्रकरणांचे गांभीर्य हळूहळू कमीही होत जाईल. पण पर्यटनाची मखमली झालर लाभलेल्या गोव्यात गुन्हेगारी आणि अमली पदार्थांचा खुलेआम व्यवहार हे खरे म्हणजे एक काळा डाग ठरला आहे. हा काळा डाग नजिकच्या काळात पुसून टाकला नाही तर पुढे काही गोव्याचे खरे नाही...

हे निश्‍चित!

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या