प्रासंगिक: शालेय शिक्षण मातृभाषेतूनच का?

डॉ. सीताराम कोरगावकर
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

शिक्षण ही अशी ‘चीज’ आहे की त्याची जीवनातील प्रत्येक स्तरावर जाणीव होत असते व शिक्षण नाही तर उणीव भासते. बघा ना, मूल जन्माला येण्यापूर्वी गर्भशिक्षण, जन्मल्यानंतर किमान तीन वर्षापर्यंत फक्त आई-बाबांकडून शिक्षण. त्यानंतर परत शिक्षणाच्या नावाखाली शिक्षण रचनेत झोकून दिले जाते. या रचनेतून बाहेर आल्यावर पुढच्या आयुष्याची वाटचाल सुरू होते.

या वाटचालीत मूल बेकारीपासून नोकरीपर्यंत किंवा एक प्रतिष्ठीत, प्रसिध्द व्यक्ती म्हणून समाजात आपले स्थान मिळविते. कोणी कोणी या वाटचालीत वाईट मार्गाने जाऊन आपले शिक्षित जीवन फुकट घालवतात. मग आपल्या मनात प्रश्‍न पडतो की, माणसाची ओळख शिक्षणामुळे होते की शिक्षण माणसाची ओळख करून देते? नेमके उत्तर काय असू शकते हे शोधण्याचा हा प्रयास आहे. शिक्षणात मातृभाषेला अव्वल स्थान आहे. हे कोणीच नाकारू शकत नाही. मातृभाषेलाही ‘प्रथम भाषा’ मला अभिप्रेत आहे. यामागची मुलतः कारणे कोणती आहेत? हे प्रत्येक पालकाने व नागरिकाने समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भाषा हा शिक्षणाचा मुख्य घटक आहे. शिक्षणास सुरवात करण्यापुर्वी शैक्षणिक भाषा विचारपूर्वक निवडणे खूप महत्त्वाचे आहे. अश्‍यामुळे आई-वडिलांनी भाषेला विचारात न घेता फक्त इतर सुविधा मुलाला दिल्या तर त्या व्यर्थ ठरू शकतात.

भाषा जी घरात सर्रासपणे बोलताना वापरतात ती मातृभाषा असते. अथवा ‘प्रथम भाषा’ असते. ही भाषा तोंडात, मनात, हातात, मेंदूत व हृदयात जाऊन पूर्णपणे बसलेली असते. साहजिकच नवजात बाळाला प्रथम आपल्या मातृभाषेची सवय होते व त्यातच त्याचे बालपण सुरू होते. अशावेळी बाळाला जर मातृभाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेच्या शाळेत जावे लागले तर त्याचा बाळाला जबरदस्त धक्का बसतो. हा धक्का त्या बाळासाठी खूप हानीकारक असतो. या विषयीचे संशोधन सांगते की, मुलांना मातृभाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेला शिक्षणासाठी पाठविण्यापासून पालकांनी सावध रहाण्याची गरज आहे.

मूल आपल्याला सवय असलेल्या भाषेनुसार बोलते, वागते. म्हणजे त्या मुलाच्या मनात कोरलेली भाषा व त्यानुसार बोलण्याची किंवा व्यक्त करण्याची भाषा एकच असते. त्यामुळे मूल सतत प्रगतीशील बनते. जेव्हा मनात कोरलेली भाषा एक असते. परंतु बोलण्याची किंवा व्यक्त करण्याची भाषा निराळी असते. दोन निराळ्या भाषांमुळे मुले गोंधळून जातात. त्यांच्या बुध्दीवर/ मेंदूवर ताण येतो. सहाजिकच त्याचा परिणाम म्हणून मुलाची प्रगती होण्याच्या क्रियेत अडथळे येतात. त्या मुलाला मागे जावे लागते. त्यांची प्रगती खुंटते.

मुलांची प्रथम भाषा किंवा मातृभाषा व वर्गात शिकविण्याची भाषा एक असली म्हणजे मुलांच्या मनाचे व भाषेचे एकीकरण होते व मुले शिक्षणात एकमय होतात, रमतात.

मातृभाषेचा जसजसा विकास होत जातो, तसतसे मुलांमध्ये कलाकौशल्ये उत्पन्न होतात व त्यांचाही विकास होत जातो. ही कलाकौशल्ये मुलांमध्ये रुजणे व त्यांची वाढ होणे हे मातृभाषेच्या विकासाशी जोडलेले असते. या कलाकौशल्याचे बळ मुलांना भावी शिक्षणाकडे घेऊन जात असते. या दोन मुख्य कलाकौशल्यांना ‘साक्षरता कौशल्य’ व ‘तर्कशुध्द विचार करून निर्णय घेण्याचे कौशल्य’ म्हणून ओळखतात. या कलाकौशल्यांना जीवनभरच्या ‘दोन शिदोऱ्या’ म्हणून नाव दिले तर ते योग्यच ठरेल.

साक्षरता कौशल्य काय असते? बाळाला जन्मतः आवाज हे माध्यम ओळखण्याची क्षमता असते. आवाजाच्या भाषेमार्फत हळूहळू बोबडे बोल बोलायला सुरवात होते. सभोवताच्या गोष्टीची ओळख होते. नंतर कलेकलेने शब्द, वाक्य अक्षर ओळख, लिहिणे इ.इ. होत असते व हा विकास नैसर्गिकपणे होत असतो. कालांतराने या कौशल्याचे रुपांतर साक्षरतेत होते.

तर्कशुध्द विचार व निर्णय घेणे कौशल्य, या कौशल्यामुळे मूल मिळालेल्या माहितीचा काळजीपूर्वक विचार करणे, स्वतःचे मत तयार करणे किंवा त्यासंबंधीत योग्य-अयोग्य निर्णय घेणे ही कला आत्मसात होते.

बाळाला कान, डोळे मेंदूचा विकलांगपणा असला तर ही कौशल्ये कमी जास्त प्रमाणात विकसीत होतात, मातृभाषेचा पाया जेवढा खोल व भक्कम असेल तेवढ्या प्रबळ रुपात मूळे ही कौशल्ये आत्मसात करतात. याचा एक उत्तमात उत्तम फायदा पुढे दुसऱ्या भाषेतून शिकताना होतो. ही आत्मसात केलेली कलकौशल्ये मुलांना दुसरी नविन भाषा शिकावी लागत नाही मुलांना दुसरी नविन भाषा शिकायला सोपी जाते. हे सर्व घडत असताना, मुलांची वैयक्तिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्राशी जडणघडण होते. स्वतःची ओळख येते, समाजात स्थान मिळते, मातृभाषेचा त्यांना अभिमान वाटतो, शाळेविषयी संस्कारात्मक भावना उत्पन्न होते, आत्मविश्वास वाढतो. हे सर्व गुण त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीत झिरपतात, गौरवास प्राप्त मुले बनतात. म्हणून मी म्हणेन की शिक्षणपध्दतीत मातृभाषा बळकटीवर भर देणे खूप महत्त्वाचे आहे. शाळांनी त्यासाठी निरनिराळे कार्यक्रम आखण्याची गरज आहे. मातृभाषा जास्तीत जास्त बळकट करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. मातृभाषेचे महत्त्व पटवून देण्यासाठी शिक्षण पध्दतीने कार्यशाळा घडवून आणणे, पालकांचे प्रबोधन करणे, पालकांचे सहकार्य या क्षेत्रातील महत्त्वाचे आहे.

पालक यासाठी खूप काही करू शकतात. पालकांत एक मुख्य गैरसमज असतो की, मुले जी भाषा शाळेत शिकतात त्या भाषेतून मुलाशी बोलणे. पण असे करण्यामुळे मूल दोन्हीपैकी एकही भाषा नीट बोलू शकत नाही. मातृभाषा अपुरी शिकली जाते व अन्य भाषाही अपुरी होते. मुलांना मातृभाषा अस्खलीत, ओघवती, बोलायला, वाचायला शिकण्यासाठी पुरेसा कालावधी लागतो म्हणून इयत्ता पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण हा योग्यच निर्णय आहे.

आज आंतरराष्ट्रीय पातळीवर गरज आहे ती दर्जेदार भाषा व एका विशिष्ट क्षेत्रातील स्पेशालिटीची. येथे इंग्लिश भाषेच्या दर्जेदार ज्ञानाची आवश्यकता आहे. हे जरी असले, तरी आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेणे, मातृभाषेचा सांभाळ करणे, त्याला प्रोत्साहन देणे हेही खूप आवश्यक आहे. भावी पिढीला हितावह आहे याचा विसर पडू देता कामा नये.

आज पालकांचा कल सगळ्यात जास्त बोलणारी, जास्त वापरात असलेली भाषा आहे, त्या भाषेच्या दिशेन झुकलेला आढळतो. त्यामुळे ज्या भाषांचा वापर कमी होत चालला आहे. त्या भाषा नामोनिशाण होतील अशी परिस्थिती आहे. वाईट परिणाम म्हणजे भाषेबरोबर चालत आलेली संस्कृती लोप होत आहे. सर्वांनी आता जागे होण्याची गरज आहे. नाहीतर भावी पिढी आपल्याला दोष दिल्याशिवाय रहाणार नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या