हवामानबदल: जलस्त्रोतांवर प्रतिकूल परिणाम

संतोष शिंत्रे
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

२०२५मध्ये भारताची पाण्याची गरज तर वाढणार आहेच, पण जगभरातील एकूण सिंचनासाठीच्या पाण्याची गरज, हवामानबदल अस्तित्वातच नसता तर जितकी असती, त्याच्या तुलनेत २०२५पर्यन्त ३.५ ते ५ टक्‍क्‍यांनी वाढणार आहे आणि २०७५पर्यंत ती ६ ते ८ टक्‍क्‍यांनी वाढणार आहे.

भौगोलिक वैविध्य मुबलक असलेल्या आपल्या खंडप्राय देशात हवामानबदलाचे परिणाम प्रदेशागणिक, नदीखोऱ्यागणिक बदलते असतात. सरसकट एकाच मोजपट्टीने ते मापता येत नाहीत. पाण्याच्या स्त्रोतांवर हवामानबदल परिणाम करतो, असे म्हणताना हेच पाणी हवामानातील एक महत्त्वाचा घटक आहे, हेही लक्षात घ्यावे लागते. जलचक्रातील बाष्पीभवन, पाऊस पडणे अशा अनेक प्रक्रियांवर हे परिणाम मोठ्या प्रमाणावर होतात;आणि त्याचे परिणाम पेयजल, जिरायती शेती, भूजलाचे पुनर्भरण, जंगले, जैववैविध्य, समुद्राची पातळी, हिमनद्यांचे वितळणे अशा अनेक गोष्टींवर होतात. तसेच खारफुटी, पाणथळी आक्रसत जातात.  

२०२५मध्ये भारताची पाण्याची गरज तर वाढणार आहेच, पण जगभरातील एकूण सिंचनासाठीच्या पाण्याची गरज, हवामानबदल अस्तित्वातच नसता तर जितकी असती, त्याच्या तुलनेत २०२५पर्यन्त ३.५ ते ५ टक्‍क्‍यांनी वाढणार आहे आणि २०७५पर्यंत ती ६ ते ८ टक्‍क्‍यांनी वाढणार आहे. इथे हेही लक्षात घ्यावे लागते, की जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १६ टक्के भारतात आहे, पण जगातील एकूण जलस्त्रोतांपैकी फक्त चार टक्के आपले आहेत आणि त्यातलेही ३८.५ टक्के भूजल आहे. तसेच जगातील शेतीयोग्य जमिनीच्या नऊ टक्के आपली असली, तरी त्यामधली ५६ टक्के जिरायती आहे. तसेच आपल्या शहरांमधील प्रति व्यक्ती प्रतिदिन पाण्याची उपलब्धता केवळ ६९ लिटर आहे.(अमेरिकेची हीच ३१० लिटर अशी आहे ! ) अशा उपलब्धतेत जगात आपला १३२ वा क्रमांक आहे. मुबलक पाणी असणारा देश इथपासून पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेला देश ही वाटचाल आपण फार वेगाने केली आहे.  

टोकाच्या हवामानाशी संबंधित घटनांमध्ये वाढ होणे, पर्जन्यमान विस्कळित होणे आणि समुद्राची पातळी वाढून नव्या आपत्तींना तोंड द्यावे लागणे हे प्रमुख परिणाम शास्त्रज्ञ वर्तवतात. या गोष्टी होऊ लागल्या आहेतच. ‘सीडब्ल्यूजी’च्या २०१८-१९च्या  आर्थिक सर्वेक्षणात नमूद केले आहे की हवामानबदलामुळे १९७० -२०१५ या वर्षांमध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा १०० मिलिमीटरने कमी झाले; शेतकऱ्यांचे उत्पन्न खरीप हंगामात १५ टक्के आणि रब्बीमध्ये ७ टक्के इतके कमी झाले. त्यात असेही म्हटले आहे, की या बदलांमुळे कृषी उत्पन्नात यापुढे साधारण १५ ते १८ टक्के घट अपेक्षित आहे आणि सिंचन नसलेल्या प्रदेशांमध्ये ती २० ते २५ टक्के होण्याची शक्‍यता आहे. 

पर्जन्यमानाचे बदलते आकृतीबंध असे सांगतात की वायव्येकडील भागात आणि पठारी प्रदेशांमध्ये पाऊस अनैसर्गिकरीत्या काहीसा वाढेल. एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत तीन मोठ्या नद्या-गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना यांच्या पृष्ठभागावरून वाहत्या पाण्यात (रन ऑफ) दीर्घकालीन स्वरूपाची वाढ अनुक्रमे ३३ .१ टक्के, १६.२ टक्के आणि ३९.७ टक्के इतकी होईल. मुळात प्रति नदी पाण्याची उपलब्धता आपल्या नद्यांमध्ये खूप विषम स्वरूपाची आहे. प्रति व्यक्ती उपलब्ध पाणी ब्रह्मपुत्रेमध्ये आहे १७ हजार घनमीटर, तर हेच साबरमतीमध्ये आहे केवळ २४० घनमीटर.

हिमनद्यांचीही परिस्थिती पाहू. आपल्याकडे ९०४० हिमनद्या १८५२८ चौ. कि. मी. भागाद्वारे गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू यांची खोरी सांभाळतात. या नद्या आक्रसण्याचा दर वर्षाकाठी ०.२ ते ०.७ टक्के इतका आहे आणि त्यामुळे ११ नद्यांच्या खोऱ्यांवर परिणाम झाले आहेत. त्यांच्या वितळण्यामुळे गंगेच्या खोऱ्यात पाण्याचा वाढीव विसर्ग २०३०पर्यन्त होईल आणि नंतर मात्र तो आक्रसत जाईल. या परिस्थितीशी जुळवून घेणे, काही गोष्टींचे निराकरण करणे हे करण्यात आपल्याकडचा मोठा अडथळा म्हणजे पाण्याशी संबंधित विविध गोष्टी सांभाळणारे तब्बल वीस वेगवेगळे विभाग आणि त्यांच्यात सुसंवादाचा पूर्ण अभाव.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या