‘फ्लाइंग कार’साठी आकाश ठेंगणे

सुरेंद्र पाटसकर
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

वाहतुकीसाठी रस्ते कमी पडायला लागल्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीसाठी `फ्लाइंग कार`च्या पर्यायाची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. या स्पर्धेत जपानने आघाडी घेतली आहे.

सुमारे दीडशे वर्षांपूर्वी, नेमके सांगायचे झाले तर १८८०मध्ये पहिली ऑटोमोबाईल अस्तित्वात आली, त्यानंतर दोन वर्षांनी राईट बंधूंनी विमान उड्डाणाचा प्रयोग करून दाखवला. आता या दोन्ही तंत्रज्ञानांचा विलय करून `फ्लाइंग कार` तयार करण्यातच नव्हे तर, या फ्लाइंग कारची ‘मानवी चाचणी’ करण्यात जपानी कंपनीने यश  मिळविले आहे. वेगवान आणि अचूक वाहतुकीसाठी प्रसिद्ध असलेल्या जपान आता मानवी प्रवासातील पुढचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे. वाहतुकीसाठी रस्ते कमी पडायला लागल्यामुळे शहरांतर्गत वाहतुकीसाठी `फ्लाइंग कार`च्या पर्यायाची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू होती. या स्पर्धेत जपानने आघाडी घेतली आहे. येत्या तीन वर्षांत फ्लाइंग कार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.

गेल्या आठवड्यामध्ये ‘स्काय ड्राइव्ह’ कंपनीने आपल्या फ्लाइंग कारचे प्रात्यक्षिक काही निवडक माध्यमांना दाखविले. भविष्यातील वाहतूक कशी असेल, याची चुणूक त्यामुळे उपस्थितांना मिळाली. ‘स्काय ड्राइव्ह’ कंपनीतील चालकाने (हवे तर कार पायलट म्हणता येईल) आठ मोटर असलेल्या एखाद्या मोठ्या ड्रोन एवढ्या आकाराच्या मोटारीने एका छोट्या मैदानाला चक्कर मारून दाखविली. टोमोहिरो फुकुजावा हे ‘स्काय ड्राइव्ह’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. येत्या काही वर्षांत फ्लाइंग कार या वाहतुकीचे नियमित साधन बनतील, अशा विश्वास त्यांनी या प्रात्यक्षिकावेळी व्यक्त केला. येत्या तीस वर्षांत, म्हणजे २०५० पर्यंत टोकियोमधील कोणत्याही टोकाला दहा मिनिटांत जाता येऊ शकेल, अशी व्यवस्था उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मोटार प्रत्यक्ष अवकाशातून उडविण्यासाठी सध्या अनेक समस्या आहेत. काही समस्या तांत्रिक आहेत, तर काही कायदेशीर आहेत. त्याबरोबर आकाशात मोटार  असताना त्याचा अपघात होऊ नये यासाठीही काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. सर्वांत महत्त्वाचे काम असेल ते १५० फुटांवर आकाशातील वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याचे. वाहतूक नियंत्रणासाठी रस्त्यावर सिग्नल असतात, मात्र आकाशात तशी व्यवस्था नसते. त्यामुळे एका वेळी किती वाहने आकाशात असतील, याबाबत नियम ठरवावे लागणार आहेत. तसेच त्यांचे नियंत्रण मध्यवर्ती कक्षाद्वारे करावे लागू शकेल. तसेच फ्लाइंग कार अधिक अंतरापर्यंत जाण्यासाठी त्यांना ऊर्जा कशी पुरवायची हाही मोठा प्रश्न असणार आहे. सध्याच्या बॅटरींच्या साह्याने काही किलोमीटर अंतरापर्यंत या मोटारी नेता येतील. पण मोठे अंतर कापता येत नाही. याशिवाय आकाशात उडणाऱ्या मोटारींचा आवाज ही सर्वसामान्यांसाठी समस्या होऊ शकते. विमानतळांमुळे होणाऱ्या आवाजाच्या प्रदूषणाबद्दल अनेक देशांत लोकांनी तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.

मोठी स्पर्धा
‘स्काय ड्राइव्ह’ कंपनीला २०४०पर्यंत तब्बल आठ कोटी ऑस्ट्रेलियन डॉलरची मदत विविध कंपन्यांकडून मिळणार आहे. बोइंग आणि एअरबस या विमान क्षेत्रातील मोठ्या कंपन्याही फ्लाइंग कार बनविण्याच्या स्पर्धेत आहेत. त्यांची स्पर्धा जपानी स्काय ड्राइव्ह कंपनीशी असेल. उबरही २०२३ पर्यंत फ्लाइंग टॅक्सी प्रत्यक्षात आणण्याच्या तयारीत आहे. इ-हांग या चिनी कंपनीने फेब्रुवारी २०१८मध्ये सर्वांत पहिल्यांदा फ्लाइंग कारचे प्रतिरुप सर्वांसमोर मांडले होते.

अशी असेल फ्लाइंग कार

  • येत्या तीन वर्षांत फ्लाइंग कार प्रत्यक्षात शक्य
  • एडी-०३ असे मोटारीचे नाव
  • आठ मोटारींचा वापर
  • दोन जणांना बसण्याची क्षमता
  • एकदा चार्ज केल्यानंतर पाच किलोमीटर क्षमता
  • किंमत - तीन लाख ते पाच लाख डॉलर

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या