टिप्पणी: उत्तर हवे, येणाऱ्या काळासाठी...!

नरेंद्र तारी
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

राज्यात कोरोनासोबतच खून, दरोडे, मारामाऱ्या, अमली पदार्थांचा व्यवहार हे विषय ऐरणीवर आले आहेत. कोरोनाबाधितांबरोबरच बळींची संख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब बनली आहे. त्यामुळेच तर या सर्व अनागोंदीत येणारा काळ हा कसा असेल, हे कुणालाच माहिती नाही.

राज्यात सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणही ढवळून निघाले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेकडेही अंगुलीनिर्देश केला जात आहे. सुशांतसिंह राजपूतची आत्महत्या, त्याअनुषंगाने अमली पदार्थांच्या गोव्यातील व्यवहाराचे कनेक्‍शनही या आत्महत्येशी जोडले गेले आहे. मडगावातील सराफ्याचा खून, तपासकामात नवनवीन येणारे दुवे आणि व्यक्त केल्या जाणाऱ्या शंका, पोलिसांकडून दिली जाणारी उत्तरे, त्याचा संबंध लागो अथवा न लागो, पण शंका कायम उपस्थित होण्यासारखी परिस्थिती आणि विशेष म्हणजे कोरोनाचे वाढते रुग्ण, वाढती बळींची संख्या आणि कारागृहातच अमली पदार्थ पोचवण्यासाठी खुद्द जेलगार्डकडून चाललेले प्रयत्न यामुळे राज्यात हे चाललेय तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे. एक मात्र खरे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह असूनही त्यांनी खून, दरोडे आणि इतर गुन्ह्याच्याबाबतीत आपल्याला काय तो "रिझल्ट'' पाहिजे असल्याचे पोलिस खात्याला सुनावल्याने त्यातल्या त्यात हा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे, तरीपण...!

दोन चार चित्रपट केलेल्या सुशांतसिंह राजपूतचे आत्महत्या प्रकरण आणि त्याला जोडून गोव्यातील अमली पदार्थाचा व्यवहार, चित्रपट क्षेत्रातील नट नट्या आणि इतरांकडून केले जाणारे अमली पदार्थाचे सेवन यामुळे गोवा पुन्हा एकदा तपासाच्या रडारावर आला आहे. चित्रपट क्षेत्रात तुफान पैसा मिळत असल्याने या क्षेत्रातील लोकांकडून शानछोकीचे प्रकार हे अपेक्षित असले तरी कमरेचे सोडून गुढघ्याला बांधण्याचा प्रकारही आता उघडकीस येत आहे. लीव्ह ईन रिलेशनला उत्तेजन देणे, अमली पदार्थांचे सेवन आणि इतर स्वैराचार करण्यासाठी चित्रपट सृष्टीला जसा काही परवाना दिल्यागत ही लोकं वावरताहेत, आणि आपणच या लोकांना डोक्‍यावर घेऊन नाचतो आहोत. काय लायकी आहे या लोकांची, ती अशा प्रकरणांवरून स्पष्ट होते. सुशांतसिंह राजपूत आणि ती कोण रिया यांचे लीव्ह ईन रिलेशन, अमली पदार्थांचे सेवन हे आता जगजाहीर झाले असले तरी या अमली पदार्थ्याच्या रॅकेटमध्ये चित्रपट क्षेत्रातील नवोदित युवा युवती असलेल्या कलाकारांची नावेही समोर आल्याने खऱ्या अर्थाने सीने जगत हादरले आहे. गोव्यातील ड्रग्ज प्रकरण हे केवळ गोव्यापुरते मर्यादित नसल्याचेही त्यामुळेच समोर आले आहे. याबाबतची चौकशी किती आणि कशी होईल, हे देवच जाणे!

कोरोनाची महामारी काही आटोक्‍यात यायला तयार नाही. रुग्ण संख्या तर वाढतच आहे, दुर्दैवाची बाब म्हणजे बळींची संख्याही वाढत आहे. कोरोनाची रुग्ण संख्या दर दिवशी सातशेच्या पार गेली आहे. ही संख्या आटोक्‍यात येणे आवश्‍यक आहे. काही ठिकाणी कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या मर्यादित असली आणि स्थिती दिलासादायक असली तरी ती कायम राहीलच याची शाश्‍वती नाही. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री, आमदारांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. आमदार पॉझिटिव्ह होणे हे अपेक्षित आहे, कारण सातत्याने लोकांकडे आणि कार्यकर्त्यांकडे संपर्क येत असल्याने लोकप्रतिनिधी पॉझिटीव्ह होणे ही काही नवलाची बाब नाही. लोकप्रतिनिधींना उपचारही चांगले मिळत असल्याने चिंतेची तशी बाब नाही, मात्र सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लागण होत असल्याने या वाढत्या संख्येला काबूत आणण्यासाठी इस्पितळेही अपुरी पडत असल्याने ती खरी चिंतेची बाब ठरली आहे. या ठिकाणी दोष कुणाला आणि कसा द्यायचा हाही तेवढाच मोठा प्रश्‍न आहे. कारण सरकार म्हणते, आम्ही प्रयत्न चालवले आहेत, पण आपणही बेजबाबदार आहोत की, सरकार चुकतेय, हे पहायला हवे. अशा प्रकाराला आपणही तेवढेच कारणीभूत ठरत आहोत, हेही मान्य करायला हवे. विशेष म्हणजे चतुर्थीनंतरच कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढली असल्याचे आपल्याला मान्य करायलाच हवे. काय केले आपण चतुर्थीला. गणरायाने आपल्याला सांगितलेय का, आपला उत्सव अमूकच पद्धतीने करा म्हणून, पण आपण अजूनही सुधारत नाही. शेजारच्या घरात कोरोना आलाय ना, माझ्या घरात तर नाही, मग मला कशाला भय, हा विचार आज चालला आहे. कोरोना म्हणजे थंडी, ताप, खोकला, असाही काहीजणांचा समज आहे, पण मरणाऱ्या लोकांचे काय...? राज्यातील कोरोना बळींची संख्या तीनशेच्या वर गेली आहे. कोरोना बाधितांचा आकडा पंचवीस हजारावर पोचला आहे. रोज किमान दहाजणांचा बळी जात आहे. काल सर्वाधिक चौदाजण बळी गेले. हा आकडा असाच वाढत राहिला तर भय म्हणजे काय हे नजीकच्या दिवसात दिसण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. सुरवातीला कोरोनाचे नाविन्य होते, त्यावेळेला एखादा कोरोना रुग्ण सापडल्यावर त्याची "ट्रॅव्हल हिस्ट्री'' तपासली गेली. पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या ठिकाणी घरे, वाडा, गाव सॅनिटाईझ करण्याकडे भर दिला, मात्र हा आकडा वाढतच गेला, आणि प्रशासनही निगरगट्ट झाले आहे. त्यामुळे सॅनिटाईझचे महत्त्वच कमी झाले आहे.  होम आयझोलेशनमुळे बऱ्याच अंशी सरकारला दिलासा मिळाला आहे, मात्र आपण अधिक सजग रहायला हवे, लोकांना दिलासा द्यायला हवा, त्यासाठी राज्य सरकारने काहीही करण्याची तयारी ठेवली पाहिजे, याचा विसर पडता कामा नये. शेवटी आरोग्य हे महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधींसाठी एक उपचार पद्धती आणि सर्वसामान्यांसाठी दुसरी असा भेदभाव होता कामा नये. हीच खरी वेळ आहे. राज्य सरकारकडे जर निधी कमी असेल तर केंद्र सरकारने तिजोरीची दारे खुली केली पाहिजेत, जनतेचा पैसा जनतेच्या आरोग्य सेवेसाठी वापरला गेला नाही तर मग त्याला काही अर्थच राहणार नाही. आता चांगली आरोग्य सेवा उपलब्ध झाली नाही तर मग कधी, हा सवाल त्यामुळेच उपस्थित होत आहे.  

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न हा तसा कायम राहिला आहे. सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे का असेना. खूनाच्या घटना तर होतच राहतात, चोऱ्या, दरोडे हे पडतातच की, फक्त आपण त्याचा तपास कसा लावतो, आणि अशा गुन्ह्यांवर आपले नियंत्रण कसे आणि किती हा खरा प्रश्‍न आहे. सत्तेवर असलेल्या सरकारवर कायदा आणि सुव्यवस्थेचा आरोप करणे हे अपेक्षित आहे. कारण सत्तेवर असलेल्या सरकारची ती जबाबदारीच असते. मात्र गुन्हे कमी झाले, असे चित्र कधी दिसलेच नाही. आपली तपास यंत्रणा, आपली सुरक्षा यंत्रणा तकलादू ठरली आहे काय, याचे आधी मंथन व्हायला हवे. सरकारे येतील आणि जातील, पण प्रशासनाची पद्धत मात्र तीच राहणार ना...! प्रशासनातील गलथानपणा हा कालचा आणि आजचा नाही, हे आपल्या अंगवळणी पडले आहे. कोलवाळच्या तुरुंगात खुद्द रक्षकच जेव्हा अमली पदार्थांचा व्यवहार करतो, त्यावेळेला आणखी अपेक्षा ती काय ठेवायची. असे प्रकार घडतातच तरी कसे, हे आधी पहायला हवे. कुंपणच जेव्हा शेत खाते, त्यावेळेला सुरक्षेची अपेक्षा ती काय धरायची. 

प्रश्‍न कितीतरी पण उत्तरे मात्र शोधण्यासाठी कसरत करावी लागत आहे. खरे म्हणजे गोवा हे इतरांपेक्षा इवलेसे राज्य आहे. आपण इतरांसाठी आदर्श निर्माण करायला हवा, पण तशी कृती होताना दिसत नाही. ही कृती सत्ताधाऱ्यांची असो वा विरोधकांची असो, केवळ गळे काढून चालणार नाही, ठोस कृतीची आवश्‍यकता आहे. ही कृती ज्याने त्याने समजून घ्यावी, एवढीच अपेक्षा.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या