जागर: पर्यटक म्हणून येती आणि...

किशोर शां. शेट मांद्रेकर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

अमलीपदार्थांच्या नंगानाच पार्ट्यांमधूनही पोलखोल झालेला आहेच. आता तर जुगारासाठी लोक गोव्यात येतात, असे वाटण्याजोगी स्थिती आहे. दारू पिण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी पर्यटक यायचे एवढे समजण्यासारखे आहे.

गोव्यात देश-विदेशातून लोक केवळ पर्यटनासाठी येतात हा समज आता गैरसमजात बदलणार तर नाही ना, असा प्रश्‍न पडावा, अशी सध्या स्थिती आहे. पर्यटनाच्या नावाने येथे येऊन काही पर्यटक भलतेच धंदे करतात हे अनेकदा उघडकीस आले आहे. गोवा अशा लोकांना आपल्या कारनाम्यांसाठी सुरक्षित वाटतो. 

अमलीपदार्थांच्या नंगानाच पार्ट्यांमधूनही पोलखोल झालेला आहेच. आता तर जुगारासाठी लोक गोव्यात येतात, असे वाटण्याजोगी स्थिती आहे. दारू पिण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी पर्यटक यायचे एवढे समजण्यासारखे आहे. परंतु भलते उद्योग करायला येथे मोकळीक कशी मिळते, हे ज्ञात झाल्यानेच पर्यटकांचे गोव्यात गैरधंदे करण्याचे धाडस होते. एवढी वर्षे पर्यटक म्हणून येणारे गोव्याची मजा लुटून जातात, असा आपण करून घेतलेला समजही खोटा ठरावा. अमलीपदार्थांचे व्यवहार, चोरटी मद्यविक्री, मसाज पार्लरमधून वेश्‍या व्यवसाय असे बरेच काही... मग मोठमोठ्या काही आंतरराष्ट्रीय परिषदांमधून मुलींचा गैरवापर करण्यासाठी ‘एस्कॉर्ट’ही आले. आता तर जुगारालाही काही कमी नाही. नाही म्हटले तरी शेजारील राज्याच्या सिमेवरील जिल्ह्यांमधून काही जण गोव्यातील जवळच्या सीमेलगत जुगार खेळण्यासाठी, जत्रांमधून ‘खेळ’ मांडण्यासाठी येत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. ते कसे येतात आणि कोणाच्या आशीर्वादाने येतात, हे विचारण्याचीही आवश्‍यकता नाही. पोलिसांनी वाईट धंद्यांवर करडी नजर ठेवायची असते. पण तरीही गैरधंदे खुलेआम सुरू असतात. अशा कारनाम्यांना वरदहस्त असल्याशिवाय गोव्यात तरी काहीच शक्य नाही. महाराष्ट्रात जुगार बंद केला की तेथील काही या व्यवसायातील म्होरके गोव्यात ज्यांचे कनेक्शन असते त्यांना हाताशी धरून गोव्यात ठाण मांडतात. अगदी सुरक्षितपणे त्यांना कव्हर मिळते. गावांतील काही छोट्या ‘गाड्यां’वर चालणारा जुगार चक्क कळंगुट येथील पंचतारांकित हॉटेलमध्येही खुलेआम खेळला जातो. ते सुध्दा पर्यटक म्हणून आलेल्यांकडून... ऐकायला, वाचायला विचित्र वाटते पण ही वतुस्थिती आहे. तिथे पोलिसांनी कारवाई केली हे बरे झाले. 

पोलिसांच्या हाती जे घबाड लागले तेही थोडेथोडके नव्हते तर तब्बल दहा लाख रुपये रोकड, ५७ लाखांच्या चिप्स, ५७ मोबाईल आणि दोन एटीएम कार्ड स्विपिंग मशीन. ४२ जणांना या प्रकरणात अटक झाली. दोन खोल्यांमध्ये या सर्वांनी डाव मांडला होता. पण पोलिसांनी हा डाव मोडला. सध्या कोरोनाने महामारी आणली आहे. अशा स्थितीत एका खोलीत २२ जण आणि दुसऱ्या खोलीत २० जण... अतीच झाले... कोरोनाशी यांचे काहीच देणेघेणे नाही. सामाजिक अंतर राखणे वगैरे हे जणू इतरांसाठीच... हॉटेलमध्ये जुगाराचा अड्डा सुरू असल्याचे कोणीतरी कळवले आणि पोलिसांनीही तत्परता दाखवली. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाब, तेलगंणा, मध्यप्रदेश येथील २५ ते ४५ वयोगटातील पर्यटक या जुगारात सामील होते. पर्यटक म्हणून आले आणि ते जुगारात रमले. पाच सहा राज्यांतील हे तथाकथित पर्यटक एकत्र कसे येऊ शकतात? जुगाराचा अड्डा येथे असतो हे त्यांना कसे माहीत असते, याविषयीचे अनेक प्रश्‍न एव्हाना गोव्यातील सूज्ञ लोकांना पडलेले असतील. पण ‘दृष्टीआडची सृष्टी’ वेगळी असते. आपल्याला गोव्यात राहून काय चालले हे माहीत नसते पण जगातील लोकांना त्याविषयीची बरीच माहिती असते. असे अनेक धंदे याठिकाणी आहेत. यात ‘रॅकेट’ असल्याशिवाय आणि कोणीतरी बोलविता धनी असल्याशिवाय अशी थेरं करणे शक्य नाही. या छापा प्रकरणानंतर दोन वर्षांपूर्वी आगॅस्टमध्ये कळंगुटमध्ये क्राईम ब्रांचने असाच छापा टाकून मटका अड्डा उद्‍ध्वस्त केला होता त्याची आठवण ताजी झाली. तेव्हाही २९ जणांना अटक झाली होती. गोव्यात कोणीही यायचे आणि खुलेआम काहीही करायचे, असा जो एक समज झाला आहे तो अशा कारवायांमुळे दूर होईलही. पण मुळात असे गैरधंदे येथे परराज्यातून येऊन करण्याचे धाडस या तथाकथित पर्यटकांना कसे होते. कसिनोवर तरी अधिकृतपणे पैसे उडवता येतात. सरकारच्या कृपेने कसिनोवरील जुगाराला मान्यता आहे. त्यामुळे तिथे काय चालते याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. पण कसिनोवर ‘खेळ’ खेळतानाही अनेक गोष्टींचा लाभ पदरात पाडून घेता येतो आणि आनंद उपभागेता येतो, अशी चर्चा अनेकजण रंगात येऊन करीत असतात. कोरोनाच्या सावटामुळे कसिनोंना बंदी आहे. त्यामुळे जुगाऱ्यांनी आपली हौस कळंगुटमध्ये भागवून घ्यायचे ठरवले, असे म्हणायचे तर तिथे म्हणे असा जुगार चालायचा, असे लोक बोलतात. म्हणजे जुगार सुरू होताच, कोणीतरी शिकारी पाहिजे होते ते हे पर्यटक शिकार झाले... तेथेही साटेलोटे असल्याशिवाय असा ‘खेळ’ मांडणे शक्यच नाही. 

पत्रादेवी चेकनाक्यावरही परवा तब्बल साडेअकरा लाखांची दारू अबकारी खात्याने पकडली. अलीकडील काळातील चेकनाक्यावरील ही तशी मोठी कारवाई आहे. नाहीतरी सिमेवरील चेकनाक्यावर काय ‘चेक’ होते हे तेथील राखणदारांनाच माहीत. लॉकडाऊनच्या काळात तर या चेकनाक्यांवर कोणाला ड्युटीही नकोशी व्हायची म्हणे... पण लॉकडाऊन शिथील केले आणि चेकनाक्यांचे महत्त्वही वाढले. इतके दिवस गोव्यातून सिंधुदुर्गाच्या हद्दीत गोवा बनावटीची दारू पकडल्याच्या बातम्या यायच्या. पण गोव्याच्या हद्दीत दारू पकडली जाणे हे विरळाच. म्हणून तेथील अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही कौतुक करायला हवे. पोलिसांनी कळंगुटमध्ये केलेली कारवाईही अशीच कौतुकास्पद. मात्र हा सुखद अनुभव नियमितपणे मिळत असेल तर गोमंतकीय धन्य होतील. नाहीतर ‘सौ चुँहे खाके बिल्ली चली हाज’, असे काहीबाही कुठेतरी जोडत लोक टोमणे मारू लागतात. कोणती म्हण कशाशी खातात, असे म्हणता येणार नाही, पण तिथे जुळवून घेण्यासाठी असे तोडफोड करीत काहीतरी भागवून घेतले जाते, असा अनेकांचा अनुभव. आता तर गोव्यात बोगस नोटाही काहीजण चलनात आणू पाहत आहेत. पणजी पोलिसांनी धडक कारवाई करीत पाच पर्यटकांना अटक केली. हा छापाही कळंगुटमध्येच टाकण्यात आला. तब्बल २ लाख ९६ हजार चारशे रुपयांच्या नोटा हाती लागल्या. गोव्यात कुठे कुठे त्यांनी अशा नोटा खपवल्या असतील कोण जाणे. या रॅकेटचाही पर्दाफाश झाला म्हणजे लोक आपल्या खिशातील पैसा हा असली आहे म्हणून मोकळा श्‍वास घ्यायला मोकळे. गोव्यात काय काय चालते याचा विचार करायला गेलो तर डोके सुन्न व्हायची वेळ आल्यावाचून राहणार नाही. यासाठी आपण सजग असायला हवे. कुठे काही गैर घडत आहे. वाईट धंदे सुरू आहेत तर ते पोलिसांच्या आणि सरकारच्याही नजरेस आणून द्यायला हवे. सध्या अशा बारीकमोठ्या कारवाया सुरू आहेत. पण पर्यटन हंगाम ऐन रंगात आला की म्युझिक पार्ट्या आणि तथाकथित ड्रग्जपार्ट्यांवर कोण अंकुश ठेवणार की कारवाई करण्यास पुढे येणार हेही तेव्हा पाहायला मिळेल. मडगावातील सराफ स्वप्नील वाळके याच्या भरदिवसा झालेल्या खुनानंतर पोलिस खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्यापूर्वीही मेरशीतील प्रकाश नाईक मृत्यू प्रकरण आणि नंतर त्याच भागात झालेला गोळीबार या तपासाबाबत गोमंतकीयांच्या मनात शंका असताना पोलिस काहीतरी धागेदोरे मिळवत आहेत ही चांगली गोष्ट आहे. पोलिसांनी ‘सिंघम’ बनून गोमंतकीयांचा विश्‍वास संपादन करायला हवा, गोव्याचा लौकिक वाढेल अशी कामगिरी केली पाहिजे. तसे झाले तर पर्यटक म्हणून येताना हजारवेळा विचार करून असे भामटे पर्यटक येथे येतील. गोव्याच्या दृष्टीने हे व्हायलाच हवे आणि ते पोलिसांच्याच हाती आहे. पोलिसांनी गेल्या दोन-तीन दिवसांत चांगली कामगिरी केली आहे. जागतिक स्तरावर कळंगुट किनाऱ्याने नाव मिळवले आहे. पण गेले काही दिवस हा भाग बदनाम होत आहे. पोलिसांनी अशा गैरधंद्यांची पाळेमुळे खणून काढायलाच हवी. गोवा हा गैरधंदे करण्यासाठीचे सुरक्षित राज्य म्हणून ओळख तयार होण्याआधीच दृष्टप्रवृत्तींना ठेचून काढायला हवे. राजकारण्यांनी यात हस्तक्षेप अजिबात करता कामा नये. सरकारने पोलिसांना मोकळीक दिली तर निश्‍चितच गुन्हेगारी कमी झालेली दिसून येईल. पोलिसांची तेवढी क्षमता आहे. पण कुणे हस्तक्षेप करीत पोलिसांचा वापर करू लागला तर ते शक्य होणार नाही. लोकांनीही पर्यटकांना ओळखायला शिकायला हवे. केवळ चार पैसे अधिकचे मिळतात म्हणून सगळेच सोडून देऊ नये. आपण सतर्क राहिलो तर पर्यटकच काय, कोणीही वाईट काम करू शकणार नाही. त्यासाठी प्रामाणिकपणा हवा आणि तशी इच्छाशक्तीही हवी.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या