तरंग: ‘निसर्ग की विकास?’ यात समतोल हवाच!

अवित बगळे
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

निसर्गाचे संरक्षण झाले पाहिजे हा विषयी कोणाचेही दुमत नाही आणि नसावेही. विकासासाठी थोडी किंमत मोजावी लागली तर ती मोजली गेली पाहिजे. म्हणून वृक्षतोडीस परवानगी देताना वृक्ष लागवडीची अट घातली जाते.

सध्या मोले येथील भगवान महावीर अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान यांच्या संरक्षणाचा मुद्दा कळीचा बनला आहे. गोवा फाऊंडेशनने तो विषय न्यायालयातही नेला आहे. निसर्ग विरुद्ध विकास असे चित्र निर्माण केले जात आहे. गोव्‍यात कोणताही प्रकल्प आणायचा म्हटला की नेमके ते ते लोकच विरोध करत असतात, असे सरकारचे म्हणणे आहे. या लोकांनी विरोध न केलेला प्रकल्प राज्यात नसेल. कोकण रेल्वेला झालेला विरोध अद्याप विस्मृतीत गेलेला नाही. ओझा आयोगासमोर झालेली सुनावणीही सर्वांना लख्ख आठवत असेल. विरोध करणारे नंतर कोकण रेल्वेतून फिरू लागले हा भाग वेगळा. पण प्रकल्प येतो म्हटले की त्याला विरोध करणे हा जन्मसिद्ध अधिकार असल्यागत वागणारे काहीजण आहेत हे खरे आहे.

निसर्गाचे संरक्षण झाले पाहिजे हा विषयी कोणाचेही दुमत नाही आणि नसावेही. विकासासाठी थोडी किंमत मोजावी लागली तर ती मोजली गेली पाहिजे. म्हणून वृक्षतोडीस परवानगी देताना वृक्ष लागवडीची अट घातली जाते. मात्र ज्या हट्टाग्रहाने सरकारी प्रकल्पांना ‘खो’ घालण्याचा प्रयत्न केला जातो तो सगळ्यांच्याच चिंतेचा विषय झाला पाहिजे. प्रकल्पस्थळी असलेल्या जनतेची चिंता समजता येण्यासारखी आहे. मात्र प्रकल्पाशी दुरान्वयेही संबंध नसलेले जेव्हा उभे ठाकतात त्यावेळी शंका कसली व कोणावर घ्यावी. निसर्ग जपणुकीचा ठेका आपणच घेतला आहे अशा भ्रमात आणि मस्तीत वावरणारे प्रत्यक्षात प्रकल्पांना विरोध करण्यापलीकडे निसर्ग संवर्धनासाठी काय करतात हा लाखमोलाचा प्रश्‍न आहे.

जे सुंदर आहे ते माणसाला जवळ ओढून घेते. निसर्ग सुंदर आहे. माणूस निसर्गाकडे आकर्षित होऊन त्याच्याजवळ जातो. निसर्गातील सौंदर्याचा आस्वाद घेत नकळत त्याचा ऱ्हास करतो. निसर्गाकडून आपण भरभरून घेत आहोत. मात्र आपण त्याला काहीच देत नाही. याउलट आपण निसर्गावर मात करण्याची ईर्ष्या बाळगून फरफटत चाललो आहोत. आपण निसर्गाशी एकतर्फी मैत्री करत आहोत. निसर्गातील नैसर्गिक बाबींचा वेगाने विनाश करीत आहोत. जी जंगले आपली फुफ्फुसे मानली आहेत त्यांचा ऱ्हास होत चालला आहे. जंगल नष्ट होणे ही माणसाने निर्माण केलेली समस्या आहे आणि ती माणूसच सोडवू शकतो. जंगलाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी कोणत्याही गोष्टींचा विकास थांबविण्याची गरज नाही. 

आपल्या चुकीच्या वागण्यामुळेच सध्या निसर्ग दोलायमान बनून आपला लहरीपणा दाखवीत आहे. निसर्गचक्रातील कोणत्याही गोष्टींचा नियमितपणा राहिलेला नाही. यंदा जो भरपूर पाऊस पडत आहे तो यंदा प्रदूषण कमी झाल्यामुळेच हेही आपण लक्षात घेतले पाहिजे. अलीकडे एकाच दिवशी तिन्ही ऋतू आपल्याला अनुभवण्यास मिळत आहेत. तरीही आपल्याला निसर्गाविषयी बेजबाबदारीचे वर्तन मुळाशी घट्ट धरून आहे.

झपाट्याने वाढत चाललेले शहरीकरण, उंच उंच सिमेंटची जंगले, धुळीचे रस्ते, माणसांचा गजबजाट, विषारी वायुंचे प्रदूषण, वाहनांची गर्दी, जागोजागी उभारले जाणारे मोबाईल टॉवर, शेतजमिनीचे बिगरशेती करणे आदी अनैसर्गिक वातावरणात बिचारे पक्षी व वन्यजीव आपले जीव मुठीत धरून जगण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. ज्या प्राणी व पक्ष्यांना आपल्या देवदेवतांचे वाहन मानले आहेत त्यांच्या जिवावर आपण बेतलो आहोत. यातून काहीतरी बोध घेणार की केवळ विकास प्रकल्पांना विरोधात धन्यता मानणार याचा विचार ज्याचा त्याने केला पाहिजे.

आपल्यापैकी बरेच जण निसर्गाच्या विविध माध्यमातून पर्यावरणावर प्रेम करतात. पर्यावरणप्रेमी म्हणवून घेतात. मात्र आपण पर्यावरण बिघडवतो हे त्यांच्या लक्षात येत नाही. पर्यावरणावर प्रेम असल्याचे दाखवत स्वतःच्या ऐशाराम जीवनासाठी आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा विनाश करीत आहोत. त्यामुळे आजच्या घडीला कित्येक वृक्ष नष्ट झाले आहेत. शिवाय अनेक प्रकारच्या पाखरांसह वन्यजीव दुर्मिळ होत चालले आहेत. आपल्या पूर्वजांनी निसर्गाला देवाचे स्थान दिले आहे. भारतीय संस्कृतीत नद्या, डोंगर, झाडे, प्राणी व पक्षी या सगळ्यांना मानाचे स्थान आहे. निसर्गातील या सर्व वंदनीय घटकांना संरक्षण देऊन त्याचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी पर्यावरणवादी म्हणवणाऱ्यांचे योगदान काय ते एकदा जनतेला समजले पाहिजे. प्रकल्पांना विरोध करण्याचा नैतिक अधिकार तरी यांना आहे का? या प्रश्नाचे उत्तरही मिळाले पाहिजे.

माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी व आनंदी जीवनासाठी स्फूर्ती देणाऱ्या निसर्गाला जर योग्य परिस्थितीत टिकवायचे असेल तर त्याला निसर्गाबरोबर चालावे लागेल. तरुणांमध्ये निसर्ग संवर्धनाची क्रेझ आहे. सध्या निसर्गसंवर्धन, निसर्ग भ्रमंती व गिर्यारोहण, अभयारण्य भेटी, वाईल्ड लाइफ फोटोग्राफी, एखादी वेबसाईट तयार करणे एवढ्यापुरते ते मर्यादित राहिले आहे. तरुणांनी निसर्ग संवर्धनाच्या कामात झोकून घेऊन प्रत्यक्षात रमून, निसर्गासाठी घाम गाळण्याची गरज आहे.

आपल्या जीवनामध्ये निसर्गाचे महत्त्व खूप बहुमोल आहे. काही विचारवंतांच्या मते निसर्ग हा आपला गुरू आहे, तर काही लोकांच्या मते निसर्ग हा एक अनमोल ठेवा आहे. तुम्ही जर काही काळ निसर्गाच्या सानिध्यात राहिलात, तर अत्यंत आनंदी व उत्साही बनू शकता व तुमची कार्यक्षमता वाढू शकते. तुम्हाला शक्‍य असेल तेव्हा आठवडा अथवा पंधरा दिवसांतून जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी अवश्‍य जावे.

शक्‍य झाल्यास आपल्या कुटुंबीयांना अथवा मित्र-मैत्रिणींना घेऊन जावे. अशा ठिकाणी गेल्यावर आपले पद, प्रतिष्ठा, व्यवसाय इत्यादी गोष्टी विसरून जाऊन स्वतःला मुक्‍तपणे निसर्गाशी एकरूप होऊ द्या व निसर्गातील विविध गोष्टींचा आस्वाद घ्या. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या क्रियाशीलतेमध्ये निश्‍चितच वाढ होत असते. निसर्गाकडून आपल्याला खूप काही शिकता येते. उदाहरणार्थ, वाहणाऱ्या नदीकडून आपण सातत्याचा गुरुमंत्र घेऊ शकतो, तर समुद्राकडून धीरगंभीरता व सामर्थ्य हे गुण घेऊन शकतो. झाडे जशी ऊन, पाऊस, वारा या तिन्ही ऋतूंमध्ये स्थिर राहतात व कोणत्याही प्रकारे विचलित होत नाहीत हे त्यांचे गुण आपण आत्मसात करायला हवेत. फुले जशी इतरांना सुगंध देतात व आपल्या सहवासाने आनंदित करतात हे आपण त्यांच्यापासून शिकायला हवे. अशा प्रकारे निसर्गाला गुरू मानून आपण आपल्या जीवनात चौफेर प्रगती करू शकतो. मात्र निसर्गावर प्रेम करणे याचा सरळ अर्थ विकासाला विरोध करणे असा होत नाही हेही समजून घेतले पाहिजे.

जणूकाही निसर्गाने आपल्याला काहीच दिले नाही.असे समजून कुठलीही सहल काढायची म्हटले की, आपल्या तोंडातून सह्याद्रीच्या पायथ्याखालील कुठल्यातरी एखाद्या ठिकाणाचे नाव निघते. एवढे भरभरून निसर्ग सौंदर्य आपल्याकडे असताना दुसरीकडेच आपण धाव घेतो. निसर्गाची ही सर्व रूपे पर्यटकांसाठी तर आकर्षणाचा बिंदू आहेतच, पण त्याही पुढे जाऊन त्या ठिकाणच्या स्थानिक जैवविविधतेसाठी अधिवास म्हणून त्यांचे महत्त्व अधिक आहे. निसर्गाचे संतुलन कायम राखण्यामधे या घटकांचा वाटा फार मोठा आहे. एखाद्या पर्यटनस्थळी जाताना फक्त मौजमजा करायला न जाता, तेथील निसर्ग अभ्यासपूर्वक जाणून घेतला तर त्याचा खरा आस्वाद आपल्याला घेता येईल. आपल्या कोणत्याही कृतीमुळे स्थानिक पर्यटनास बाधा पोहोचणार नाही, पर्यटन स्थळी स्वच्छता राहील व तेथील सौंदर्य अबाधित राहील याची दक्षता पर्यटकांनी घेतली पाहिजे. पर्यटनाचा आनंद घेताना तेथील पर्यावरणाची काळजी घेणे तेवढेच आवश्‍यक आहे. पण सद्यपरिस्थितीत चालू असलेल्या पर्यटनावर एक नजर फिरवली तर तेथील पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होताना दिसून येते. त्यामुळे पर्यटनाच्या प्रगतीबरोबरच स्थानिक पर्यावरणाची काळजी घेणेही गरजेचे झाले आहे. आणि ही जबाबदारी प्रत्येकाची आहे, हे विसरून चालणार नाही. यासाठी पर्यावरण प्रेमी काही प्रयत्न करणार का?

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या