एका छायाचित्राने...

किशोर शां. शेट मांद्रेकर
बुधवार, 19 ऑगस्ट 2020

प्रत्येक राजकीय पक्षातही असे काही कार्यकर्ते असतात की ते प्रमुख नेत्यांच्या पुढे पुढे करतात. छायाचित्रातही उठून दिसेल अशा जागी उभे राहतात. नंतर सत्ता वगैरे मिळाली की या कार्यकर्त्यांचा ‘भाव’ वाढतो. त्याची नेत्याकडे उठबस आहे. त्यामुळे त्याच्यामार्फत नेत्याकडे गेल्यास काम होऊ शकते, अशी खात्रीच अनेकांना वाटते. 

सेलिब्रिटींबरोबर छायाचित्र काढण्याची अनेकांना भारी हौस असते. पूर्वीच्या काळी अशा सेलिब्रिटींची स्वाक्षरी घेण्यासाठी मोठी गर्दी जमायची. आपल्या आवडत्या व्यक्तीची ती स्वाक्षरी मग जिवापाड जपणारेही आहेत. अलिकडच्या काळात आपले छायाचित्र अशा व्यक्तिमत्त्वांसोबत घेणे, सेल्फी काढणे असे भलतेच फॅड आले. काहीजण तर राजकीय नेत्यांचे, त्यातल्या त्यात मंत्रीवगैरे अशासोबत छायाचित्र काढून घेतात आणि मग ‘इम्प्रेशन’ मारण्यासाठी त्याचा उपयोग करतात. यातून असे लोक बरेच काही साध्य करतात. त्या नेत्यांना आपले छायाचित्र घेऊन कोणी काही प्रताप करीत असेल वगैरे याची सुतराम शक्यताही नसते. पण काहीजण अशा गोष्टीला अपवाद असतात. ते छुपे रूस्तम असतात. त्यांना मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, मोठ मोठे नेते, खेळाडू, सिनेकलाकार यांच्यासोबत छायाचित्र काढायची असतात आणि पुढे कधीतरी त्या छायाचित्रातून आपली इमेज वाढवायची किंवा आपली बघा किती ओळख आहे... अशा आविर्भावात राहायचे, असेही काही महाभाग असतात. कलाकारांनाही नेत्यांसोबत छायाचित्रे काढायची हौस कशी काय, असा प्रश्‍न कोणाला पडला असेल तर त्याचे उत्तर कपिल झव्हेरी प्रकरणाने मिळाले असेल, असे समजूया.

प्रत्येक राजकीय पक्षातही असे काही कार्यकर्ते असतात की ते प्रमुख नेत्यांच्या पुढे पुढे करतात. छायाचित्रातही उठून दिसेल अशा जागी उभे राहतात. नंतर सत्ता वगैरे मिळाली की या कार्यकर्त्यांचा ‘भाव’ वाढतो. त्याची नेत्याकडे उठबस आहे. त्यामुळे त्याच्यामार्फत नेत्याकडे गेल्यास काम होऊ शकते, अशी खात्रीच अनेकांना वाटते. राजकीय नेतेमंडळीही आपल्या कार्यकर्त्याला दुसऱ्याच्या पुढ्यात कमी लेखत नाहीत. त्यात तर ते तरबेज असतात. पण काही नेत्यांचा अपवाद आहे. ते आपल्या कार्यकर्त्यालाही तोंडघशी पाडण्यात कमी करीत नाहीत. त्या नेत्यांना नंतर पुढे विरोधाला सामोरे जावे लागते, असा अनुभव सगळीकडेच आहे.

कोणालाही राजकीय नेत्यापर्यंत जाण्यासाठी कोणातरी कार्यकर्त्याची किंवा खास माणसाची मदत हवी असते. अशा ‘मधल्या’ मध्यस्थाशिवाय अनोळखी माणसाला नेता उभा करीत नसतो. एकदा का ओळख झाली की त्याला नेत्यासमोर घेऊन गेलेला कार्यकर्ता राहतो बाजूला आणि मग ‘ते दोघे’ अगदी जवळ आलेले असतात आणि कार्यकर्ता कोठे असतो याचा पत्ता नसतो. सांगायचा मुद्दा हाच की मतदारसंघातील लोकांनाही आपल्या आमदाराला भेटण्यासाठी एखादा कार्यकर्ता लागतो. तसाच बाहेरील लोकांनाही एक कार्यकर्ता किंवा परिचित हवा असतो. राज्याबाहेरील व्यावसायिक वा अन्य धेंडे ही सत्ताधारी आणि विरोधकांशीही जवळीक साधून आपले इप्सित साध्य करण्यासाठी आटापिटा करीत असतात आणि एकदम ‘पोचलेली’ माणसे यात तरबेज असल्याने ते काम फत्ते करूनही घेतात. त्यांची उठबस वाढते आणि अपरिचिताची घट्ट मैत्री होते. त्यांचे संबंध एवढे जुळतात की त्यात बराच ‘अर्थ’ असतो. लोकांना तरी तसे वाटते. नव्हे, लोक संशय घेत असले तरी सगळीकडे जे काही चालले त्यावरून अशी माणसे आणि असे नेते सापडतातच. मग कोणी कितीही साळसुदपणाचा आव आणला तरी त्यावर कोणी विश्‍वास ठेवत नाही. कारण आपल्या नेत्याला लोकांनी ‘मोजलेले’ असते.

वागातोर हणजूण येथील पार्टीवर क्राईम ब्रांचने छापा टाकला आणि बॉलिवूडशी संबंधित कलाकार कपिल झव्हेरीसह २३ जणांना अटक झाली. त्याला अटक होताच राजकारणी चर्चेत आले. सोशल मीडियावर तर नेटिझन्सनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री गोविंद गावडे, पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्यासोबत झव्हेरीचे कनेक्शन असल्याची चर्चा सुरू केली. एवढेच नव्हे तर या सर्वांना झव्हेरी भेटल्याची छायाचित्रेही व्हायरल केली. यामुळे एकच खळबळ माजली. नंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमाकांत खलप यांच्यासोबतचे छायाचित्रही तेवढ्याच गतीने व्हायरल झाले. म्हणजे भाजप नेत्यांसोबतच नव्हे तर विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबतही झव्हेरीचे कनेक्शन आहे, अशी चर्चा सुरू झाली. तोपर्यंत भाजपवर काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो, आप आदी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला. शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री बदलावा, अशी मागणी केली. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही नाराजी व्यक्त केली. दुसऱ्याच दिवशी राज्यपालांची बदली मेघालयात आली. हा योगायोग असावा. राज्यपालांबाबत सरकारचे मत चांगले नसल्याने राज्यपालांना जावे लागेल, अशी चर्चा सुरू झाली होतीच. कपिल झव्हेरीची कनेक्शन कोठे कोठे आहेत याविषयी चर्चेचे बरेच फड रंगले आहेत. पण त्याच्यासोबतच्या छायाचित्रांनी राजकारण्यांना मात्र संशयाच्या घेऱ्यात आणले. मुख्यमंत्री कार्यालयाने तर ते छायाचित्र मागील वर्षीचे आहे. मुख्यमंत्र्यांना भेटायला असे कित्येक लोक येतात, त्यामुळे सर्वांची माहिती कशी ठेवायची, असा प्रश्‍नही त्यात होता. तर गोविंद गावडे यांनी आपल्याला झव्हेरी भेटल्याचे मान्य केले आणि त्याचे कारणही स्पष्ट केले. एका मल्टिपर्पज पतसंस्थेच्या उद्‍घाटनासाठी निमंत्रण घेऊन तो आला होता पण आपण तिथे काही गेलो नाही. पोलिसांना हवे असल्यास माहिती देईन, असे सांगून गावडे यांनी आपल्यावरील धुरळा उडवला आहे. खलप यांनी तर कोणा एकामार्फत तो आला होता आणि छायाचित्रे अनेकजण घेतात, तसाच हा प्रकार आहे, असे सांगून किल्मिष झटकण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासोबतचे कपिल झव्हेरीचे फोटो शोधून काढून दुसऱ्या दिवशी बरेच व्हायरल केले गेले आणि कामत यांनी आता उत्तर द्यावे, असे प्रश्‍न त्यांना करण्यात आले. अर्थात यात भाजपचे कार्यकर्ते आघाडीवर होते, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. भाजपवर शिंतोडे उडवता काय, आता बोला, असे प्रश्‍न काँग्रेसवाल्यांना केले गेले. आता कोण बोलणार..?

कोणाही नेत्याला असे ‘अभ्यागत’ भेटतात त्यांना कोणीतरी घेऊन येत असतो. त्यामुळे अपरिचित माणसे सहज भेटू शकत नाहीत, हेही तेवढेच खरे. इतके दिवस झव्हेरी चर्चेत आला नाही. त्याचा पार्टीशी संबंध आला आणि गहजब झाला. सिने कलाकार असल्याने सेलिब्रिटी म्हणून त्याची उठबस झाली असेल तर त्याला कोणाचा आक्षेप नाही. पण संशयास्पद पार्टीत त्याचा संबंध आल्याने आणि गेली काही वर्षे अशा पार्ट्यांवरून संताप व्यक्त होत असल्याने लोकांत आणखी चीड निर्माण झाली. कोरोनाचा कहर असतानाही खुलेआम पार्ट्या होतात, त्यात झव्हेरी असतो, तो अनेक राजकराण्यांना भेटलेला असतो. यावरून त्या बदनाम पार्टीशी संबंध जोडले गेले. मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी तर मोठा गौप्यस्फोट केला आहे. झव्हेरीला कोण कोण नेते पणजीतील विवांता हॉटेलमध्ये भेटले होते, राज्यसभा खासदार तेंडुलकर तिथे काय करीत होते, याची चौकशी झाल्यास सारे पितळ उघडे होईल, असे ढवळीकर म्हणतात. विवांताची सीसीटिव्ही फुटेज पाहिली तर कोण एकत्र आले होते त्याचा भांडाफोड होईल, असा विश्‍वासही त्यांना आहे. म्हणजे अजून संशयाला वाव... सरकारने अशा प्रकरणाच्या मुळाशी जायलाच हवे, नाहीतर बदनामी होणार आहे.

अशी छायाचित्र प्रकरणे यापूर्वीही कित्येकदा बाहेर पडली आहेत. राजकारणीही अशी छायाचित्रे व्हयरल करतात. गुप्त भेटीची छायाचित्रे व्हायरल करून काहीजणांना बदनाम करणे आणि आपले राजकीय गणित चुकते करण्याचा प्रकारही काहीजणांनी यापूर्वी केलेला आहे. स्मार्ट फोनच्या जमान्यात ऑडिओ रेकॉर्डिग करूनही काहीजणांचा पोलखोल केला गेलेला आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या विरोधात त्यांचेच काही कार्यकर्ते कसे बोलले याचे रेकॉर्डिंग पार्सेकरांच्या हाती लागले तेव्हा ‘त्या’ कार्यकर्त्यांचे काय झाले, नंतर ते विरोधात कसे गेले याची चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्याशी केलेले भाष्य कसे होते याबाबतचे विश्‍वजित राणे यांचे कथित रेकॉर्डिंगही बरेच चर्चेत होते. अजूनही कितीतरी उदाहरणे देता येतील.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी संसदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांना दिलेल्या पाहुणचाराची छायाचित्रेही त्यावेळी राणे यांच्या पक्षांतर्गत हितशत्रूंनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे कशी पाठवली होती आणि त्यावरून किती गहजब झाला होता, याचीही अनेकांना आठवण असेल. म्हणजेच छायाचित्र ओळखीतील मान्यवराचे असेल किंवा अनोळखी मान्यवराचे असेल, ते कधीतरी वादाचे ठरू शकते हे राजकारण्यांनी लक्षात ठेवायला हवे. कोण, कोणत्या हेतूने येतो आणि छायाचित्र घेण्यामागे त्याचा उद्देश काय असतो, कुटिल डाव वगैरे असतो का, याची शहानिशा करत कधी बसणार? पण अशा अभ्यागतांना घेऊन येणारा हा मंत्री, आमदाराचा जवळचाच कोणीतरी असतो हे मात्र शंभर टक्के नाकारता येणार नाही. कधीतरी मंत्री, आमदाराच्या परिचयातील कोणीतरी संपर्क करून अशा अनोळखी माणसांना पाठवत असतो. एखादा अपवाद असू शकेल. आतातरी राजकारण्यांनी शहाणे व्हायला हवे. आपल्या पदाचा फायदा कोणी एैरागैरा घेणार नाही, याची खात्री केलेली बरी. नाहीतर भविष्यातही असाच कपिल झव्हेरी पुढे येईल आणि उरलीसुरली पत घालवून बसण्याची वेळ राजकीय मंडळींवर येईल. म्हणूनच सावधान... छायाचित्र काढू देणे धोकादायक आहे. छायाचित्रे कोणा अपरिचिताबरोबर काढूच नयेत ती अशासाठी. उगाच बदनामी का म्हणून? तसे व्हयला नको ना, मग घ्या काळजी...

संबंधित बातम्या