टंगळ-मंगळ: फोटो

विजय कापडी
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तो फोटोलाही लागू आहे. फोटो काढण्याच्या यंत्रापासून ते थेट फोटोचा अल्बम तयार करण्यापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहण्यात येतात. जुन्या काळातला फोटो काढण्याच्या यंत्राचं धूड आणि ते ठेवण्याचा तीन पायांचा सांगाडा केव्हाच इतिहासजमा झालेला आहे.

फोटो म्हणजे तसबीर वा छायाचित्राबद्दल तुम्हा आम्हा सर्वांना कमालीचं औत्सुक्य असणं स्वाभाविकच म्हणायला हवं. फोटो मग तो स्वतःचा असो वा दुसऱ्याचा म्हणजे अगदी अपरिचिताचाही हाताशी आला तर त्याकडं क्षणभर तरी टक लावून पाहणं होतंच. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या फोटोकडं त्या व्यक्तीला पाहण्यापेक्षाही अधिक वेळ पाहणं होतंच. फार फार वर्षांपूर्वी म्हणजे अगदी बाबा आदमच्या काळी फोटो काढून घेण्याच्या काही अवघ्याच ठराविक घटना असायच्या. लग्नमुंजी सारख्या घरगुती समारंभाचेही काही ठरलेलेच फोटो काढले जायचे. लग्नानंतरच्या दुसऱ्या दिवशी वधू-वरानं गावातल्या फोटो स्टुडिओत जाऊन फोटो काढून घेण्याची आणि तो लगेच फ्रेम करून घरातल्या भिंतीवर टांगण्याची रितच होती. अर्थात, प्रत्यक्षातल्या लग्नाआधी नियोजित वधूचा फोटो काढून तो वराकडच्यांना दाखवला जाण्याचीही पध्दत होती. आधी फोटो पसंत करा आणि नंतर मुलगी असा क्रमच होता. अशावेळी काहीवेळा फोटो आणि प्रत्यक्षातली मुलगी यांच्यात अगदी जमीन-अस्मानाचं नसलं तरी बराच फरक जाणवल्याची तक्रारही आवाजात नोंदवली जायची. अशा प्रसंगी फोटोग्राफरचं कसब वाखाणलं जात असलं तर तो फसवणुकीचा प्रकारही मानला जायचा. नाही तरी लग्न म्हणजे एक प्रकारची फसवणूकच असते असं मानलं तर अशा प्रकारची फसवणूकच असते असं मानलं तर अशा प्रकारची फोटोत आणि प्रत्यक्षातला फरक हा फसवणुकीची पहिली पायरी ठरायचा! 

बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि तो फोटोलाही लागू आहे. फोटो काढण्याच्या यंत्रापासून ते थेट फोटोचा अल्बम तयार करण्यापर्यंत अनेक स्थित्यंतरे पाहण्यात येतात. जुन्या काळातला फोटो काढण्याच्या यंत्राचं धूड आणि ते ठेवण्याचा तीन पायांचा सांगाडा केव्हाच इतिहासजमा झालेला आहे. आता तर मोबाईलच्या मदतीनं, तोंडात चणे-फुटाणे टाकण्याच्या सहजतेनं खटाखट फोटो काढले जातात आणि पुढच्याच क्षणी ते पाहून पुसताही येऊ लागले आहेत. मात्र एका बाबतीत मात्र बदल झालेला नाही. आणि तो म्हणजे आपला फोटो पाहून किंचित नाक मुरडून, ‘आपण काय असे दिसतो?’ काही तरीच काय? हा कुणातरी दुसऱ्याचाच फोटो आपला म्हणून देण्यात आला असावा! असा उद्‌गार स्वतःशीच काढणे. असं म्हणतात की, फोटो काढणं म्हणा वा खेचणं ही देखील एक कला आहे. या कलेच्या आधारे सुंदरातल्या सुंदराला विद्रूप करता येतं आणि कुरुपातल्या कुरुपाला सुंदर! व्यक्तीच्या चेहऱ्यातलं नेमकं सौंदर्य टिपण्यासाठी देखील डोकं हे लागतंच. 

फोटो हा स्वतः एकट्याचा काढून घेता येतो वा आपल्या सोबत इतरांना जमा करूनही सर्वांचा असा ग्रुप फोटो काढून घेता येतो. पण खरी मजा आहे ती एखाद्या सुप्रसिध्द व्यक्तीसोबत फोटो काढून घेण्यात. या सुप्रसिध्द व्यक्तींची कार्यस्थळे म्हणजे राजकारण, चित्रपट, समाजकारण, खेळ, इ. इ. अशा नामांकित व्यक्तींबरोबर फोटो काढता आला तर तो काहींच्या दृष्टीनं आनंदाचाच क्षण असतो. असे फोटो चार लोकांना दाखवून या महनीय व्यक्तींशी आपली लगट असल्याचं दाखवून आपलं थोरपण सिध्द करता येतं... पण अशा नामांकित व्यक्तींचं काय? आपण कुणासोबत फोटो काढून घेत आहोत. याचं भान ठेवणंही कामाच्या धबडग्यात त्या बिचाऱ्यांना शक्य होत नाही. आणि मग विरोधकांना आपली बदनामी करण्याची सुसंधीच प्राप्त होते. धांदल गडबडीच्यावेळी, एखाद्या अपरिचित व्यक्तीसोबत फोटो काढून घेणेही होते आणि पुढं मागं ती व्यक्ती चोर, डाकू, खूनी, अमलीपदार्थ प्रकरणात गुंतलेली असेल तर मग काय त्याबद्दलची सारवासारव करायला घेणे म्हणजे तारेवरची कसरतच ठरते! हल्लीच आपल्याकडच्या राजकारण्यांच्या क्षेत्रातल्या महनियांना, अमलीपदार्थाच्या व्यवहारात पकडल्या गेलेल्या गुन्हेगारानं चांगलंच अडचणीत आणल्याची घटना घडल्याचं आठवत असेल. फोटोसारखी निर्जीव गोष्टसुध्दा आपल्या प्रगतीतली धोंड बनू शकते आणि अशावेळी डोक्याला हात लावून बसण्याव्यतिरिक्त दुसरं काही करणंही सुचेनासं होतं! फोटोलाही उपद्रवमूल्य असतं हे विसरून कसं बरं चालेल?

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या