तरंग: कोविडबाबत जनतेतील संभ्रम कायमच...

अवित बगळे
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

चीनच्या वुहान शहरातून कोविड १९ चा उदय झाला आणि तिथून निघालेल्या या विषाणूने संपूर्ण जगाला ग्रासले. या विषाणूचा उगम चीनमध्ये झाला असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचे वर्णन ‘चायना व्हायरस’ असे केले होते.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना कोविड १९ विषाणूची लागण झाल्यानंतर समाजमाध्यमांवर ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांची खिल्ली उडवली जात आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी औषधाची शिफारस कोविड १९ साठी प्रतिबंधात्मक म्हणून केलेली आहे. बऱ्याच संस्था अगदी सत्ताधारी भाजपचे कार्यकर्तेही या गोळ्या लोकांना मोफत वाटत आहेत. त्यावर अनेक जण टीकाही करतात तर अनेकजण त्याची स्तुतीही करताना दिसतात. मध्यंतरी ‘हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ या औषधाच्या बाबतीतही असे घडले होते.

मुळात रोग प्रतिकार औषध म्हणजे काय ते या सर्व विषयाच्या मुळाशी जाताना समजून घेतले पाहिजे. कोविडची लागण सार्वत्रिक होऊ लागल्यावर अनेकांनी आपापल्या परीने अशा उपाययोजना करणे सुरू केले आहे. चीनच्या वुहान शहरातून कोविड १९ चा उदय झाला आणि तिथून निघालेल्या या विषाणूने संपूर्ण जगाला ग्रासले. या विषाणूचा उगम चीनमध्ये झाला असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याचे वर्णन ‘चायना व्हायरस’ असे केले होते. महामारीचे स्वरूप धारण केलेल्या कोविड १९ ला दूर ठेवण्याचे देशी उपाय म्हणून गोमुत्र, सुंठ, आयुर्वेदिक औषधे आणि प्राणायामाचा स्वीकार लोकांनी श्रद्धेने किंवा नाईलाजाने केला आहे. केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगभरात अनेकाविध उपाय सुचवले जात आहेत, गेले आहेत.

तुर्कस्तानमध्ये कोविड १९ ला पळवण्यासाठी येनी ओकित नावाच्या वर्तमानपत्रात अब्दुल रहेमान दिलीपाक या स्तंभलेखकांनी लिहिले आहे, की कोविड १९ ची लागण झालेल्या रुग्णांनी गांजा ओढायला हवा. तसेच अस्थमा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांनी बरे होण्यासाठी गांजा घ्यायला हवा. तुर्कस्थानच्या अन्य एका वर्तमानपत्रात हुरीयतमध्ये आहारतज्ज्ञ डेरिया झुनबुल्कान यांनी कोविड १९ ला घालवण्यासाटी मेंढ्याच्या मेंदुचे सूप पिण्याचा सल्ला दिला आहे. मेक्सिकोमधील पुयेब्लॉ राज्याचे राज्यपाल मिगूल बार्बोसा म्हणाले होते, की कोविड १९ वर मात करणारी लस तर आपल्याकडे आधीपासूनच आहे. आपल्या मेक्सिकोमध्ये आपण टर्की पक्षी व चिचुंद्री शिजवून जो पदार्थ बनवतो त्यातच कोविड १९ वरील उपाय दडला आहे. तो पदार्थ आपण खात राहिल्यास कोविड आपल्यापासून दूर राहील.

तुर्कमेमिस्तानचे प्रमुख गुर्बांगुली बर्डीमुखामेडाव यांनी म्हटले होते , कोविड १९ ला घाबरू नका. आपल्या वाळवंटात पेगानुमा हरमाला ही वनस्पती उगवते ती घरी आणून जाळा. त्या वनस्पतीचा धूर श्वसनावाटे घ्या! कोविड १९ पळून जाईल. बेलारुसचे प्रमुख लेक्झांडर लुकाशेंकोव यांनी या महामारीत आपापल्या गावी जा. शेतात रहा, ट्रॅक्टर चालवा आणि कोविड १९ ला दूर ठेवा, असा सल्ला जनतेला दिला आहे. टांझानियाचे प्रमुख जॉन पोम्बे मागुफुली यांनी कोविड १९ पसरण्याच्या सुरवातीच्या काळात म्हटले होते, की देशातील सर्व चर्च खुल्या ठेवा. कोविड १९ सैतानाने पाठवला आहे पण प्रभू येशू ख्रिस्तांच्या शरीरात (चर्च) कसा जिवंत राहील. म्हणून बिनधास्त चर्चमध्ये या आणि प्रार्थना करा. या साऱ्या पार्श्वभूमीवर आपल्या देशात केलेले विविध दावे आपण तपासले पाहिजेत. कोविड १९ वर अद्याप औषध सापडलेले नाही. लोक अशा फसव्या लोकांच्या खोट्या दाव्यांना बळी पडत आहेत.

रोग प्रतिबंधात्मक औषध म्हणजे एखादा रोग होण्याची शक्यता असल्यास तो होऊ नये यासाठी घेण्यात येणारे औषध होय. धर्नुर्वात, पोलिओ वगैरेची लस देण्यात येते. गर्भवतींना लोह व कॅल्शियमच्‍या देण्यात येणाऱ्या गोळ्या याच सदरात मोडतात. कोविड १९ हा विषाणू आहे. त्यावर खरेखुरे प्रतिबंधात्मक औषध म्हणजे लस. ते उपलब्ध नाही. त्यामुळे दुसरा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे तो विषाणू शरीरात घुसू न देणे. यासाठी मुखावरण (मास्क) वापरणे, अंतर पाळणे (सोशल डिस्टन्सिंग) आणि हात धुणे (सॅनिटायझरचा वापर) हे उपाय आहेत. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे हा सध्याच्या घडीला हाती असलेला आणखीन एक उपाय आहे. ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्या रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात म्हणून त्यांची शिफारस होत आहे. या होमिओपॅथीच्या गोळ्या आहेत. होमिओपॅथीचे जनक डॉ. हनिमन यांचा सिद्धांतताहे की आपल्या शरीरात एखाद्या पदार्थामुळे जी लक्षणे दिसतात, तो पदार्थ खूप कमजोर द्रावण करून दिल्यास ती लक्षणे बरी करू शकतो. याचा अर्थ सर्व होमिओपॅथी औषधे फक्त लक्षणांवर काम करतात. जसे पॅरासिटामॉल ताप घालवते. त्यातही रोग प्रतिकार शक्ती आकड्यांत मोजता येत नाही, आधी १० होती व औषध दिल्यावर २० झाली असे काही होत नाही.

एकदा विषाणूने शरीरात प्रवेश केला की तो वाढणारच. जर अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्या प्रतिबंधात्मक आहे, असा दावा करायचा झाल्यास कोविड १९ ची लागण झालेल्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या देऊन त्यांना कोविड १९ ची लागण झाली नाही हे सिद्ध करावे लागणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना कोविड १९ ची लागण झाल्याने याच कारणास्तव ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या औषधाचे हसे झाले आहे. 

मध्यंतरी हायड्रोक्सिक्लोरोक्वीन या औषधाचाही मोठा बोलबाला झाला होता. त्यावेळी अनेक ठिकाणी झालेल्या संशोधनात असे दिसून आले होते, की कोविड १९ हा विषाणू हिवतापाच्या जंतूप्रमाणे हिमोग्लोबीनवर हल्ला करतो. डास चावल्यानंतर हिवतापाचा जंतू तांबड्या पेशीत शिरतो आणि हिमोग्लोबिनला संपवतो. हिमोग्लोबिनमध्ये लोहचा अणू हा पोरफायरिन रिंगमध्ये असतो. ती रिंग तोडून तो हिमोझोईन बनवतो. ज्यात लोह स्वतंत्र असते. त्यानंतर तांबड्या पेशी तुटून हिमोझोईन रक्तात येते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबीन कमी होते व प्राणवायूचा पुरवठा कमी होतो. कोविड १९ याच पद्धतीने हल्ला करतो त्यामुळे हे औषध कोविड १९ वर उपचारासाठी वापरले जात आहे.

त्यानंतर बोलबोला आहे तो रेमडेसिवीर या इंजेक्शनचा. कोविड उपचारांसाठी टोसिलिझुमॅब व रेमडेसिवीर हे इंजेक्‍शन सध्या मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे; मात्र या औषधांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन पुन्हा कोरोना संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो; तसेच यामुळे फुप्फुसावरही परिणाम होतो. त्यामुळे या औषधांच्या सेवनाने बरे झाल्यानंतर रुग्णांनी पुढील १० ते १५ दिवस काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे, असे मत वरळीतील एनएससीआय कोविड केंद्राच्या प्रमुख डॉ. नीता वर्टी यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, टोसिलिझुमॅब आणि रेमडेसिवीर या दोन्ही औषधांचे परिणाम आणि दुष्परिणाम आहेत. यातून कोणताही कोरोना रुग्ण शंभर टक्के बरा होऊ शकत नाही. संसर्गानंतर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते. त्यामुळे फुप्फुसावर परिणाम होऊन व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. अशावेळी ही शक्ती कमी करणे आवश्‍यक असते आणि ते काम टोसिलिझुमॅब करते; मात्र त्यामुळे रुग्ण पुन्हा संसर्गात येण्याचा धोका असल्याने इंजेक्‍शनचा वापर काळजीपूर्वक करायला हवा. टोसिलिझुमॅब गर्भवती महिलांना देतानाही पुरेशी काळजी घेतली पाहिजे. गंभीर प्रकरणातील प्रसुतीत फक्त मातेला वाचवायचे असते तेव्हा टोसिलिझुमॅब किंवा रेमडेसिवीर दिले जाते. या दोन्ही इंजेक्‍शनच्या मानवी क्‍लिनिकल ट्रायलचा अभ्यास नसल्याचेही डॉ. वर्टी यांचे म्हणणे आहे.

ही सारी माहिती प्रसारीत झाल्याने सर्वसामान्य जनता मात्र गोंधळलेली आहे. जीव वाचवण्यासाठी मिळेल तो उपाय ती सध्या करत आहे. यावेळी व्हॉट्सॲपवरील एक संदेश मात्र अकारण का असेना आठवल्याशिवाय राहत नाही, तो संदेश म्हणतो ‘कोरोना आला तेव्हा तो आजार होता आता आहे तो बाजार. सत्य काय ते कधीतरी समोर येईल का?’

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या