बिंब-प्रतिबिंब: ‘प्रश्‍नोत्तरां’वर विरोधकांचा सवाल

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

‘कोरोना’चा देशातील वाढता संसर्ग, घसरलेली अर्थव्यवस्था, ‘पीएम केअर फंडा’मधील निधीचा विनियोग, वाढती बेरोजगारी, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाचे प्रयत्न आदी विविध मुद्दे या अधिवेशनात चर्चेला येणार होते.

संसदेचे पावसाळी अधिवेशन १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर अधिवेशन कशा पद्धतीने होणार? फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी बैठक व्यवस्था कशी असणार? याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात होते. त्यावर उपाययोजना म्हणून लोकसभा आणि राज्यसभेचे सत्र वेगवेगळ्या वेळेत भरवण्यात येणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी ९ ते दुपारी १ आणि लोकसभेचे दुपारी ३ ते ७ या वेळेत कामकाज होईल. मात्र, राज्यसभा सचिवालयाच्या परिपत्रकानुसार, अधिवेशनातील प्रश्‍नोत्तरांचा तास रद्द करण्यात आला आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच प्रश्‍नोत्तरांचा तास रद्द केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ‘कोरोना’चा देशातील वाढता संसर्ग, घसरलेली अर्थव्यवस्था, ‘पीएम केअर फंडा’मधील निधीचा विनियोग, वाढती बेरोजगारी, उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाचे प्रयत्न आदी विविध मुद्दे या अधिवेशनात चर्चेला येणार होते. त्याबाबत विरोधकांनीही तयारीही केली होती. मात्र, प्रश्‍नोत्तरांचा तास रद्द झाल्याने अधिवेशनाला अर्थच राहिला नसल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच अनेक नेटकऱ्यांनी या सरकारवर ताशेरे ओढले. त्यानिमित्त #Parliament हा हॅशटॅग चर्चेत होता.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी आता रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात अमली पदार्थ पुरवणाऱ्या ‘ड्रग पेडलर्स’ची नावे समोर येत आहेत. त्यामुळे ‘सीबीआय’कडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना आता त्यात ‘नार्कोटिक्‍स कन्ट्रोल ब्युरो’नेही उडी घेतली आहे. दरम्यान, रणबीर कपूर, रणवीर सिंग, अयान मुखर्जी, विकी कौशल यांच्यावर निशाणा साधत त्यांनी त्यांच्या रक्‍ताचे नमुने तपासणीसाठी द्यावेत आणि ते अमली पदार्थांचे सेवन करत नसल्याचे सिद्ध करावे, अशी विनंती अभिनेत्री कंगना राणौतने ‘ट्‌विटर’वरून केली. त्यावरून बॉलिवूडमध्ये अमली पदार्थांचा वाढलेला वापर हा पुन्हा चर्चेचा विषय झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘ट्विटर’वर #Drugs हा हॅशटॅग ट्रेंड करत होता.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या