बंडोबा आणि थंडोबा!

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

राजस्थानातील तरुण आणि तडफदार नेते सचिन पायलट यांनी जवळपास महिनाभर परजत ठेवलेली तलवार अखेर म्यानबंद केली आणि त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला तूर्तास जीवदान मिळाले आहे!

राजस्थानातील तरुण आणि तडफदार नेते सचिन पायलट यांनी जवळपास महिनाभर परजत ठेवलेली तलवार अखेर म्यानबंद केली आणि त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला तूर्तास जीवदान मिळाले आहे! राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या गांधी कुटुंबियांबरोबर एकाच दिवशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर पायलट यांना ‘आपण संयम पाळायला हवा आणि त्याचबरोबर नम्रतेनेही वागायला हवे!’ असा साक्षात्कार झाला. त्याचवेळी काँग्रेसवरील आपला कब्जा सोडायला नसलेल्या गांधी कुटुंबालाही त्याच दिवशी पायलट यांच्या तक्रारीची दखल घ्यायला पाहिजे, असे वाटले आणि त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोनिया गांधी यांच्याच नेतृत्वाखाली त्रिसदस्य समिती नेमण्याचा निर्णय झाला. मात्र, हा दिवस उजाडण्यात महिनाभराचा काळ लागल्यामुळे काँग्रेसची लक्‍तरे चव्हाट्यावर आली आहेत. गेल्या महिन्यात पायलट यांनी गेहलोत यांच्या विरोधात ही तलवार उपसली खरी; मात्र पायलट हेच राजस्थान काँग्रेसमधील ‘असंतोषाचे जनक’ ठरणार, हे त्याआधीच्या काही महिन्यांत झालेल्या राज्यसभा निवडणुकांच्या वेळीच स्पष्ट झाले होते. यामुळे पायलट हे कधी ना कधी आपल्या विरोधात थेट मैदानात उतरणार, हे गृहीत धरूनच गेहलोत यांनी पूर्ण नाकाबंदी केली होती. अर्थात, बंडाच्या सुरुवातीच्या काळात केल्या गेलेल्या दाव्याप्रमाणे पायलट यांना ३० आमदारांची कुमक मिळाली असती, तर पायलट यांना हा ‘संयम आणि नम्रता’ यांचा साक्षात्कार झाला नसता, हे सत्य आहे. पायलट यांची ताकद जेमतेम १८ आमदार जमा करण्याइतपतच मर्यादित आहे, हे पहिल्या चार दिवसांतच स्पष्ट झाले होते. त्यामुळेच अखेर हे ‘बंडोबा थंडोबा’ झाले आहेत. बाकी ‘संयम आणि नम्रता’ हे सारे केवळ देखाव्यापुरतेच आहे, हे गेहलोत तसेच पायलटही जाणून आहेत.

 

खरे तर आपण हे सरकार पाडू शकत नाही, हे लक्षात आल्यापासून पायलट यांनी ‘आपण काँग्रेसमध्येच आहोत आणि भारतीय जनता पक्षात जाणार नाही!’ असा जप प्रसारमाध्यमांमार्फत सुरू केला होता. मात्र, त्याचवेळी हरयाणातील भाजप सरकारचा पुख्खा झोडत पायलट हे भाजप बंडखोरांच्या छावणीत आणखी कुमक आणू शकेल काय, याचीही वाट बघत होती. मात्र, गेहलोत यांची तटबंदी मजबूत होती आणि त्यांच्या या राजनीतिचातुर्यावर विश्‍वास ठेवूनच काँग्रेसश्रेष्ठी म्हणजेच गांधी कुटुंबीय आणि अहमद पटेल हेही निवांत होते. दरम्यान, प्रकरण कोर्टाच्या चावडीवर जाऊनही त्यातून फार काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळेच पायलट यांना माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. मात्र, या जवळपास महिनाभराच्या काळात काँग्रेसश्रेष्ठींचे वर्तनही फार काही मुत्सद्देगिरीचे होते, असे म्हणता येणार नाही. दिल्लीत बसून केवळ दरबारी राजकारण करणारे नेते केवळ गेहलोत यांच्या शब्दावर भरवसा ठेवून स्वस्थचित्त होते. खरे तर ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा मोहरा आणि त्यापाठोपाठ मध्य प्रदेशातील सरकारही गमावल्यानंतर काही धडा घेऊन तातडीने हालचाली करायला हव्या होत्या. मात्र, सुस्तावलेल्या काँग्रेसश्रेष्ठींनी हातावर हात ठेवून शांत बसणे पसंत केले. तरीही केवळ भाजपला काँग्रेसचे आणखी आमदार फोडण्यात अपयश आल्याने राजस्थानातील काँग्रेसची सत्ता कायम राहिली आहे. अर्थात, त्या जोरावर आता या काँग्रेसश्रेष्ठींना आणि विशेषत: गांधी कुटुंबियांना अधिकच मांद्य आले तर त्यात नवल वाटण्याजोगे ते काहीच नाही!

 

मात्र, आता सरकार टिकले असले तरी त्यामुळे राजस्थानात सारेच काही आलबेल आहे, अशा भ्रमात काँग्रेसला राहून चालणार नाही. सरकार पडत नाही, हे लक्षात येताच पायलट यांची संभावना ‘निकम्मा और निकारा’ (म्हणजेच बिनकामाचा आणि आळशी) या शब्दांत करण्यापर्यंत गेहलोत यांची मजल गेली होती. पायलट यांना धडा शिकवण्याचा विडाच त्यांनी उचलला होता आणि त्यामुळेच पायलट यांची ‘मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष’ ही दोन्ही पदे काढून घेण्यास त्यांनीच पक्षश्रेष्ठींना भाग पाडले. जनतेशी पुरती नाळ तुटलेले हे तथाकथित श्रेष्ठीही मग गेहलोत यांच्या ‘हो’ला ‘हो’ करत होते. त्यामुळे आता हे ‘बंडोबा थंडोबा‘ झाले असले, तरी हा अपमान पायलट विसरणे शक्‍य नाही. शिवाय, पायलट यांच्याबरोबर जाण्यास राजस्थानात बडे प्रस्थ असलेल्या भाजप नेत्या वसुंधरा राजे यांचाही कडवा विरोध होता. त्याचे कारण म्हणजे गेहलोत असोत की वसुंधरा राजे या दोहोंनाही आपल्या पुढच्या पिढीच्या राजकारणात पायलट हेच मुख्य अडसर असणार, हे कळून चुकले आहे. त्यामुळे आता अन्य मार्ग न उरल्यामुळे पांढऱ्या शेल्यात हात बांधून शरण आलेल्या पायलट यांना सन्मानाने न वागल्यास पुन्हा ते तलवार उपसण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळेच राजस्थानात झालेला हा तह कायम टिकवण्याची जबाबदारी गांधी कुटुंबाला स्वीकारावी लागणार आहे. अन्यथा, मध्य प्रदेशची पुनरावृत्ती राजस्थानात कधीही होऊ शकेल.

संबंधित बातम्या