सीमा मोकळ्या झाल्या तरी...

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

कोरोनाने काही पिच्छा सोडलेला नाही. असे असताना आणखी किती काळ बंधनात राहायचे? लोकही कंटाळले आणि सरकारने बंधनातून मुक्त करण्याची मागणी करू लागले. पण ही मोकळीक जिवावर उठणार नाही, याची सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे...

तब्बल १६१ दिवसांनंतर राज्याच्या सीमा मोकळ्या झाल्या आहेत. कोरोनाच्या सावटामुळे लोक भयभीत झालेले आहेत आणि त्रासलेही आहेत. कुठे जाता येत नाही की काही करता येत नाही, अशी स्थिती आहे. घरी बसून राहिले तर खायचे काय, असा प्रश्‍न. २१ मार्चपासून बहुतेकजण घरातच अडकले आहेत. रोजीरोटीचा प्रश्‍न अनेकांना भेडसावत आहे. कामाला गेलो नाही तर पैसे मिळणार नाहीत. ज्यांना नोकरी आहे, त्यांचे एकवेळ ठीक आहे. कमी पगारातही खर्च भागवण्यासाठी धडपड करावी लागली तरी खस्ता खात ही लोकं जगताहेत. पण ज्यांचे हातावर पोट आहे त्यांनी कसे जगायचे, असा प्रश्‍न आहे. 

बांधकाम व्यवसायही ठप्प आहे, त्यामुळे मजुरांना काम नाही. अशा मजुरांना हलाखीत जीवन जगावे लागत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांचेही असेच हाल होत आहेत. कोरोना जिवावर उठला आहे. कामधंदा नाही, मिळकत नाही यामुळे उपाशीपोटी, एकवेळ खाऊन जीव मेटाकुटीस आला आहे, अशा कष्टकरी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. कोरोनाने दहशत माजवल्याने लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सरकारने अनेक बंधने घातली. लोकांना कुठेही जायला मिळेना. ऑगस्ट संपला तरीही स्थितीत काही बदल झाला नाही. सुरवातीला कोरानाचा तेवढा प्रभाव जाणवला नाही. परंतु आता राज्यात सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. दिवसागणीक त्यात वाढ होत आहे. १८ हजारच्यावर रुग्ण सापडले. गेल्या महिन्याभरात शंभरच्यावर लोकांचा कोविडने बळी घेतला. यामुळे घराबाहेर पडायचे कसे, असा प्रश्‍न लोकांच्या मनात असला तरी आता घरात राहून जगायचे कसे, असा गहन प्रश्‍नही मनात घर करून राहिला आहे. कोरोनावर लस येईल, औषध येईल तेव्हा येईल, आता मात्र घरात बसून चालणार नाही, याची पक्की खुणगाठ लोकांनी बांधली आहे. आपल्याला कोरोनासोबत जगायचे आहे. त्याचा प्रतिकार करत पुढे जायचे आहे, हे एव्हाना सर्वांना समजले आहे. 

जगभरात दहशत माजवलेल्या कोरोनाने लाखो लोकांचे प्राण घेतले. अशा स्थितीत कोणत्याही देशाला जास्तवेळ थांबून चालणार नाही. अर्थचक्र फिरते राहायला हवे तर जीवनचक्र सुरू व्हायला हवे. यामुळेच अमेरिका, चीन, ब्रिटन आदी देशांनीही आपल्या देशातील उद्योगधंदे, कार्यालये खुली केली. कोरोना काही थांबलेला नाही. त्यामुळे परिस्थितीला सामोरे जात प्रत्येक जण जगत आहे. आणखी दुसरा कोणता पर्यायही समोर नाही. नाईलाज असला तरी हेच आता पुढील काही काळ वास्तव राहणार आहे. केंद्र सरकारने देशात सुरवातीच्या काळात लॉकडाऊन काही महिने करून पाहिले. टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन वाढवले खरे पण कोरोना काही नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉकही केले. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यात काही अपवाद वगळता सर्व काही खुले केले. मेट्रो ट्रेनही सुरू केल्या. पन्नास लोकांची उपस्थिती वाढवून शंभरवर नेली. आता शाळा, महाविद्यालयांबाबत तेवढा विचार व्हायचा आहे. गोव्यात तर गेले अनेक दिवस सर्व काही राज्य सरकारने सुरू करण्याची मागणी होत होती. पर्यटन हंगाम जवळ आल्याने हॉटेल्स खुली करण्याचीही मागणी झाली. काही मर्यादा घालून ती सुरूही झाली. आता तर मद्यालयेही खुली केली गेली. गोव्याच्या सीमा खुल्या कराव्यात म्हणून माजाळी कारवार येथे कर्नाटकच्या लोकांनी आंदोलनही केले.

कर्नाटकने केंद्र सरकारची नवी ‘एसओपी’ येताच लागलीच अंमलबजावणीदेखील केली. गोव्याच्या शेजारील सिंधुदुर्गमधील सातार्ड्यातील लोकांनीही महाराष्ट्राने सीमा खुली करावी म्हणून आंदोलन केले. महाराष्ट्राने सीमा खुल्या केल्या तरी जे कोणी त्यांच्या हद्दीत येतील त्यांना ‘अलगीकरणा’ची सक्ती कायम ठेवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व काही खुले करण्याचा घेतलेला निर्णय येथे तरी लाभदायक होत नाही. परिणामी गोव्यातून आरोंदा, सातार्डा, बांदा, दोडामार्ग आदी भागात जाऊ इच्छिणाऱ्यांची अडचण तशीच आहे. त्या भागातील शेकडो लोक जे कामाधंद्यानिमित्त गोव्यात आहेत त्यांना यंदा चतुर्थीलाही जायला मिळालेले नाही. पितृपक्षातही घरी जाऊन येणेही यामुळे मुश्‍किल बनले आहे. राज्यात आता सारे काही खुले झाले तरी कोरोना काही थांबलेला नाही. आपण कोठेही मुक्तपणे फिरू शकत असलो तरी कोरोनाची धास्ती ही आहेच. 

सरकारने लोकांवर आता सोडून दिलेले आहे. कोरोनाचे रुग्ण वाढले तर लोकांनी सुरक्षिततेचे नियम पाळले नाहीत, दक्षता घेतली नाही म्हणून दोष द्यायला सरकार मोकळे. राज्याच्या सीमा खुल्या झाल्याने आणि परराज्यातील कोणीही आता गोव्यात येऊ शकत असल्याने कोण कधी येतो, कुठे जातो यावर नियंत्रण कसे राहणार? त्यासाठीची यंत्रणाही नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढला आहे. एवढे दिवस बंधने होती म्हणून तरी त्यामानाने आपण सुरक्षित होतो. पुढे काय? आपण कोरोनाला दूर कसे ठेवणार हे लोकांनीच आता ठरवण्याची गरज आहे. घराघरांत कोरोना पोहचला तर फार कठीण होऊन जाईल. आधीच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी इस्पितळे कमी पडू लागली आहेत. लोक आपल्या भागात कोविड निगा केंद्र सुरू करण्यास विरोध करीत आहेत. कोविड रुग्णांच्या वैद्यकीय कचऱ्याचा प्रश्‍नही जटील बनत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीही सरकारी यंत्रणांना बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. आपण बाहेर फिरताना आपल्यासोबत कोरोना घरात घेऊन येणार नाही, याची पुरेपूर काळजी प्रत्येकाला घ्यावी लागणार आहे. आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य आता प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणूनच सर्वांनी योग्य ती दक्षता बाळगायलाच हवी.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या