भाष्य: सराफांनी तात्पुरती नव्हे, कायमस्वरूपी दक्षता घ्यावी

यशवंत पाटील
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

मडगावातील सराफी व्यावसायिक स्वप्नील वाळके यांच्या भरदिवसा झालेल्या हत्त्येने एका क्षणात संपूर्ण राज्याला हादरवून टाकले. सराफी दुकान व्यावसायिकावर झालेला खुनी हल्ला हा काही पहिल्यांदाच नाही. अनेकवेळा अशा घटना घडलेल्या आहेत.

राज्यात सध्या कोरोना महामारीने थैमान घातलेले असताना, राज्यातील नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी सरकार आणि आरोग्य यंत्रणा कोविडविरुद्धची लढाई लढत असताना, विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते कोविडविरुद्ध लढाईत उतरून अनेक उपाय सूचवित असतानाच राज्यात खून, मारामारी, दरोडे अशाप्रकारच्या घटना घडत आहेत.

कोविडमुळे प्रत्येकजण आपला जीव वाचविण्यासाठी सुरक्षिततेचे अनेक उपाय शोधत असतानाच एखाद्याला कोणाचा तरी खून करावा, मारामारी करावी, अत्याचार करावा, चोरी करावी असे गैर कृत्य कसे सूचते? याचा अर्थ राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असा जरी होत नसला, तरी गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहिला नाही असा तरी नक्कीच होतो. खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या गुन्हेगारी मनोवृत्तीवर सरकार आणि प्रशासनाचा वचक राहिला नसल्यानेच अशा घटना घडत आहेत हे नाकारता येणार नाही. गृह खात्याचा कारभार सांभाळणारे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे मंत्री नीलेश काब्राल यांनी अशा कायदा मोडणाऱ्या आणि कोणाच्या तरी जीवावर उठणाऱ्या मनोवृत्तीला वेळीच ठेचून अद्दल घडवायला हवी, तरच अशाप्रकारचे गुन्हे करण्याचे कोणीही धाडस करणार नाही.

मडगावातील सराफी व्यावसायिक स्वप्नील वाळके यांच्या भरदिवसा झालेल्या हत्त्येने एका क्षणात संपूर्ण राज्याला हादरवून टाकले. सराफी दुकान व्यावसायिकावर झालेला खुनी हल्ला हा काही पहिल्यांदाच नाही. अनेकवेळा अशा घटना घडलेल्या आहेत. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे अशा घटना घडतात आणि कालपरत्वे त्या विस्मृतीतही जातात. निसर्गाचाच हा नियम असला, तरी अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस उपाय आणि खबरदारी घेणे ही पोलिस यंत्रणेची आणि व्यापाऱ्यांचीही जबाबदारी आहे. पोलिस खात्यातर्फे अनेकवेळा अशा सराफी दुकानदारांना सीसीटीव्ही कॅमेरे आदीसह सुरक्षिततेचे मार्गदर्शन केले जाते, परंतु त्याचे पुढे गांभीर्याने काटेकोर पालन होत नाही. त्यामुळे सराफी व्यापाऱ्यांनी अशा घटना घडल्यानंतर केवळ काही दिवसच प्रासंगिक तत्त्वावर खबरदारी न घेता कायमस्वरूपी दक्षता घ्यायला हवी. तसेच अशा घटना टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेसाठी पोलिस यंत्रणेलाही सहकार्य करायला हवे. त्यादृष्टीने मडगावच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी पोलिसांना आवश्यक ती पायाभूत सुविधा पुरवण्याची तयारी गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनने दाखविली आहे ही चांगली गोष्ट आहे. अशाचप्रकारे राज्यातील सर्व सराफी तसेच इतर व्यापाऱ्यांनीही सुरक्षेच्या बाबतीत पोलिस यंत्रणेला सहकार्य करून दरोडेखोरांना आणि खुनी मनोवृत्तीच्या गुन्हेगारांना आळाबंद घालण्यास हातभार लावायला हवा.

राज्यात अनेकवेळा सराफी दुकानांत किंवा घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी होण्याचे प्रकार घडले आहेत. दहा वर्षांपूर्वी फोंड्यातील एका सराफी दुकानात दरोडेखोरांकडून अठरा लाख रुपयांचे दागिने पळविण्याचा प्रकार घडला होता. मात्र, चोरटे हाती लागले नव्हते. तसेच आठ वर्षांपूर्वी म्हापशातील कोचकर इमारतीतील कामाक्षी ज्वेलर्स या आस्थापनातील सराफाचा खून झाला होता. या घटनेला आठ वर्षे उलटली, तरी अद्याप खुन्याचा शोध लावण्यात गुन्हे खात्याला यश आलेले नाही. खुनासारखे गंभीर गुन्हे घडल्यानंतर पोलिस यंत्रणेकडून तपास सुरू होतो, काही घटनांमधील गुन्हेगार पकडलेही जातात, परंतु विविध कायद्याचा आधार घेऊन पुढे ते सुटतात आणि आणखी गुन्हे करण्यासाठी मोकळेही होतात. याचा परिणाम मात्र ज्यांचे खून झाले, त्यांच्या कुटुंबियांना आयुष्यभर भोगावे लागतात. त्यामुळे अशी गुन्हेगारी ठेचून काढून गुन्हेगारांना अद्दल घडविण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या