सत्संग: संत हे नंदन वनीचे वृक्ष...

रमेश सप्रे
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

श्री गजानन महाराज हे कुणाला नि कोणत्या संदर्भात सांगत होते? भौतिक शास्त्र (फिजिक्स) किंवा जड पदार्थाचा अभ्यास करणारी शास्त्रं महत्त्वाची वाटली तरी योगशास्त्र हे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

‘अगणित करावे पुण्य । 
तेव्हाच होते येथे (भारतात) जनन ।
या भौतिक शास्त्राहून ।
योगशास्त्र समर्थ असे ।।
ते योगशास्त्र येते ज्याला । 
तो न माती या भौतिकाला ।
योगशास्त्राहून भला । 
अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ।।`

श्री गजानन महाराज हे कुणाला नि कोणत्या संदर्भात सांगत होते? भौतिक शास्त्र (फिजिक्स) किंवा जड पदार्थाचा अभ्यास करणारी शास्त्रं महत्त्वाची वाटली तरी योगशास्त्र हे त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण योगशास्त्रात जड वस्तूंचा (शरीराचा) चेतनायुक्त मनाशी संयोग होतो. त्यातून पूर्ण स्वास्थ्याचा (आरोग्याचा) लाभ होतो. पुढे श्री महाराज योगशास्त्रापेक्षाही सूक्ष्म अशा अध्यात्म शास्त्राबद्दल सांगतात. त्यांच्यासमोर श्रीधर काळे नावाचा युवक होता, जो विचार करत होता की परदेशात जाऊन पैसा कमवून, स्वदेशात परतून देशाचा उद्धार करायचा. त्याच्या या विचाराला परदेशात जाण्यासाठी आवश्यक तो पैसा नसण्याची मर्यादा होती. त्याच्या मनातलं हे परदेशी जाण्याचं भूत काढून टाकण्यासाठी श्री गजानन महाराजांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं -

‘तो (योग) जमल्यास करून पाही । कोठे न आता जाई येई ।
ऐसे समर्थ बोलता पाही । श्रीधर चित्ती आनंदला ।।
पश्‍चिमेचा मावळला । तोच पूर्वेकडे आला ।
विचारसूर्य त्याचा भला । श्रीधरा सुखी करण्यास ।।’

श्रीधरच्या मनात विलायतेला (इंग्लंडला) जायचा विचार कशामुळे आला? त्याची पार्श्‍वभूमी विलक्षण आहे. पण त्यापेक्षाही श्री महाराजांनी अंतर्ज्ञानानं श्रीधरच्या मनातला विचार ओळखला हे अद्भुत आहे. 

त्या काळात आपल्या देशात राजकारण-तत्त्वज्ञान-शिक्षण-पत्रकारिता अशा विविध ज्ञानशाखांत एक जबरदस्त प्रतिभावंत नेतृत्व होतं ते म्हणजे लोकमान्य टिळक! देशाचे स्वातंत्र्य, सामर्थ्य, संपन्नता वाढीस लागावी या विचारानं लोकमान्यांना झपाटून टाकलं होतं. हाती असलेल्या ‘केसरी’ नावाच्या वृत्तपत्रातून त्यांनी देशाला सर्व बाजूंनी सक्षम करण्याची प्रेरणा मिळावी या उद्देशानं देश-विदेशातील अनेक संशोधकांची, ज्ञानमहर्षींची, साहसी उद्योजकांची चरित्रं प्रकाशित केली होती. त्यातील ओयामा नि टोगो या दोन जपानी वीरांच्या जीवनकार्यानं प्रेरित होऊन अनेक तरुणांच्या मनात असाच पराक्रम करण्याचा विचार तरळून गेला होता. त्यातला एक श्रीधर काळे! 

कोण होते हे वीर - ओयामा नि टोगो?
हे दोन जपानचे त्या काळातले महापुरुष होते. ज्यांनी आपल्या मातृभूमीला (जपानला) सामरिक (युध्दविषयक) सामर्थ्य प्राप्त करून दिलं.

ओयामा इवाओ (सन १८४२ ते १९१६) याला जपानच्या सम्राटानं शस्त्रविद्या अन् युध्दशास्त्र याचं शिक्षण घेण्यासाठी फ्रान्सला पाठवलं होतं. पुढं ओयामानं जिनिव्हामध्ये राहून रशियन भाषेत प्रभुत्व संपादन केलं. परतल्यावर आपल्या मातृभूमीला समर्थ करण्यासाठी राजसैन्यदलाची स्थापना करण्यात भरीव मदत केली.

तोगो हेइहाचिरो (सन १९४८ ते १९३४) - यानं इंग्लंडमध्ये नाविक प्रशिक्षण घेतलं. तो पुढे जपानच्या नौदलाचा प्रमुख बनला. या दोघा महाविरांनी रशियासारख्या युरोपियन सेनेला आशियाई सैन्य पराभूत करू शकतं, हे जगाला दाखवून दिलं.

या दोघांच्या शिस्त, त्याग, मातृभूमी प्रेम अशा गुणांपासून भारतीय तरुणांनी प्रेरणा घ्यावी, या उद्देशानं लो.टिळकांनी त्यांचं चरित्र आपल्या ‘केसरी’ वृत्तपत्रात प्रकाशित केलं होतं.

श्रीधर काळेला त्याच्या परदेशी जाण्यापासून परावृत्त करताना श्री महाराज उद्गारले - ‘अरे, तुझा भाग्योदय आपल्या मायभूमीतच आहे. तिला सोडून कुठंही जाऊ नको. पुढे हे शब्द खरे ठरले. कोल्हापूरला परतून श्रीधर बीए., एम.ए झाले. शिंदे संस्थानच्या शिवपुरी कॉलेजचे प्रिन्सिपल झाले. त्यांचा अभ्युदय (ऐहिक प्रगती) माय-भूमीतच झाला. श्री गजानन महाराजांनी हे भविष्य सांगताना ‘तुझी पत्नी घरी कोल्हापूरला वाट पाहतेय’ हे सांगून त्याला प्रापंचिक कर्तव्याची जाणीवही करून दिली होती.

अशा त्रिकालदर्शी संत श्री गजानन महाराजांसारखे संतच वाल्याचा वाल्मिकी करण्यासारखं अलौकिक सामर्थ्य धारण करून असतात. आपल्या अतीव सुंदर नि सोप्या शैलीत संत दासगणू महाराज 
सांगतात -

एक संतावाचून । विचाराचे परिवर्तन ।
कोणी न करू शके आन । सत्य एक त्यांनाच कळे ।।
पाहा काळे श्रीधराला । दर्शनाचा योग आला ।
म्हणून वृत्तीत फरक पडला । खरे तेच शोधावया ।।
संत साक्षात ईश्वर । चालते बोलते भूमीवर ।
त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ।।

लो. टिळक नि श्री गजानन महाराज अकोला येथील शिवजयंती उत्सव सभेत यापूर्वी एकत्र आले होते. दोघाही महामानवांच कार्य परस्पर पूरक होतं. दोघेही संत वृत्तीचे होते. दासगणू म्हणतात तेच खरं -
 
हे पीक संतांचे । याच देशी यावयाचे ।
वृक्ष नंदन वनीचे । अन्य ठायी न येती हो ।।

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या